माथेरानच्या मिनी ट्रेनचे ‘युनेस्को’साठी नामांकन
नेरळ, दि. २३ ऑगस्ट : प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमधील मिनी ट्रेन युनेस्कोच्या यादीत येण्यास सज्ज झाली आहे. युनेस्को ग्रीस मेलिना मर्कोरी’ या पुरस्कारासाठी माथेरानच्या मिनी ट्रेनचे मध्य रेल्वेकडून नामांकन पाठवण्यात आले आहे. युनेस्कोने त्यासंदर्भात काही माहिती मागविली आहे. ती देण्याचे काम सध्या मध्य रेल्वेकडून सुरू आहे
जागतिक वारसा स्थळांचे सांस्कृतिक संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी १९९५पासून हे पारितोषिक प्रदान करण्यास युनेस्कोने सुरुवात केली. २४ जून रोजी मध्य रेल्वेने इंडियन नॅशनल कमिशन फॉर कोऑपरेशन विथ युनेस्को यांच्या माध्यमाने मिनी ट्रेनचा अर्ज दाखल केला. ९ ऑगस्ट रोजी माथेरानचे नामांकन मंजूर केल्याचे पत्र युनेस्कोकडून केंद्र सरकारला प्राप्त झाले. १३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या पर्यावरण आणि गृहव्यवस्थापक विभागाने माथेरान नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार करून अंतिम टप्प्यातील माहिती केंद्र सरकारकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अंतिम फेरीसाठी माथेरानमधील सांस्कृतिक जीवन, जैवविविधता, मिनी ट्रेनमुळे आदिवासी जीवनावर होणारे परिणाम, माथेरान बायोगॅस प्रकल्प, वीज आणि जंगलसंवर्धनाचे धोरण, स्थानिकांचे जीवनमान, स्थानिक परंपरा आणि उत्सवांबाबत माहिती मागवण्यात आली आहे.