चित्र भारती लघु फिल्मोत्सवासाठी १ सप्टेंबर पासून प्रवेशप्रक्रिया सुरु
भोपाळ, दि. २६ ऑगस्ट : भारतीय चित्र साधनाचा प्रतिष्ठित ‘चित्र भारती लघु फिल्मोत्सव २०२२’ साठी येत्या १ सप्टेंबर पासून प्रवेशप्रक्रिया सुरु होणार आहेत. हा फिल्मोत्सव १८ ते २० फेब्रुवारी २०२२ या दरम्यान भोपाळ येथे होणार आहे. लघु चित्रपटाकरिता भारतीय स्वातंत्र्य संघर्ष, स्वतंत्र भारताची ७५ वर्षे, अनलॉक-लॉकडाऊन, वोकल फॉर लोकल, गाव सुखी-देश सुखी, भारतीय संस्कृती आणि मूल्य, नावीन्य-रचनात्मक कार्य, पर्यावरण आणि ऊर्जा, शिक्षण आणि कौशल्य विकास हे विषय ठरविण्यात आले आहेत. याविषयी अधिक माहिती www.chitrabharati.org वेबसाइट वर उपलब्ध असून इच्छुक उमेदवार filmfreeway.com संकेतस्थळावर जाऊन नोंदणीअर्ज भरू शकतात.
इच्छुक उमेदवार सदर विषयांवर आधारीत लघुपट, माहितीपट, ऍनिमेशन फिल्म किंवा कॅम्पस फिल्म पाठवू शकतात. या फिल्मोत्सवात विभिन्न श्रेणीकरिता चित्रपटांना पुरस्कार देण्यात येणार असून प्रथम लघुचित्रपटाला १० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
भोपाळ येथे होणाऱ्या फिल्मोत्सवात देशभरातील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकार सहभागी होणार असून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यास इच्छुक असलेल्या नव्या पिढीला मार्गदर्शनही करणार आहेत.
भारतीय चित्र साधना चित्रपट क्षेत्रात भारतीय विचारधारेला प्रोत्साहन देणारी संस्था आहे असून भारतीय चित्र साधनाचे यंदाचे हे चौथे आयोजन आहे. भारतीय चित्र साधनाच्या वतीने प्रत्येक दोन वर्षानंतर फिल्मोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याचबरोबर वर्षभर स्थानिक पातळीवर चित्रपट परीक्षण, चित्रपट प्रदर्शन, विमर्श, प्रशिक्षण आणि लघु उत्सवांचे आयोजनही केले जाते.