CultureOpinion

गोसेवा गतिविधीचा गोमय गणेशमूर्तीचा ‘श्रीगणेशा’

‘गोमय वसते लक्ष्मी’ म्हणजेच गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास असतो, यावर आपली अढळ श्रद्धा आहे. याला कारणही तसेच आहे म्हणा. गोमयामुळे शेतकऱ्यांना अर्थार्जन प्राप्त होत असतो. विषमुक्त आणि प्रदूषणमुक्त करणाऱ्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या पौरोहित्यासाठी यज्ञ, होमहवन करण्यासाठी जाळल्या जातात. त्यातून येणाऱ्या धुरातून हानिकारक जंतू नाहीसे होतात. अशा सर्वगुणसंपन्न आणि पर्यावरणरक्षक गोमय आता गणेशमूर्ती बनवण्याकरिताही उपयोगात येत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोसेवा गतिविधी, कोकण प्रांताच्या वतीने यावर्षी प्रथमच पर्यावरण जतन आणि संवर्धनाचा नवा ‘श्रीगणेशा’ करण्यात आला आहे. १०० टक्के गाईचे शेण, आणि गोमूत्रापासून बनवण्यात आलेल्या पर्यावरणस्नेही गणपतीची मूर्ती गुजरात प्रांतातून आणून त्यांना रंगरंगोटी केली जात आहे.आतापर्यंत संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील एकंदरीतपणे २०० गोमय गणेशमूर्तीची विक्री करण्यात आली आहे. तयार करण्यात आलेल्या या मूर्ती दहा ते २४ इंचांच्या आणि वजनाने अगदी हलक्या आहेत. गोमय गणेशमूर्ती तयार करण्यासाठी ६ महिन्यांपासून सुरुवात केली जाते. सुकलेल्या शेणाची पावडर करून त्यात राईचे तेल आणि गोमूत्राचे मिश्रण करून ते गणपती मूर्तीच्या साच्यात भरून गणेशाची मूर्ती तयार होते. साच्यातून काढलेली ओलसर मूर्ती पूर्णपणे सुकण्यास २४ तासाचा अवधी लागतो.

पूर्वीच्या काळी मातीचा वापर करून गणेश मूर्ती तयार केल्या जात. पण आता गणपतीच्या मूर्तीसाठी लागणारी माती दुर्मिळ होत चालली आहे. त्याला पर्याय म्हणून गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी गेल्या काही वर्षांत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर भरमसाट प्रमाणात वाढला. या मूर्तींच्या विसर्जनानंतर निसर्ग, समुद्र, विहिरी, नद्या आणि एकूणच पर्यावरणासाठी तो चिंतेचा विषय ठरला आहे. याला पर्याय म्हणून ‘गोमय गणेश’ करण्याची कल्पना अंमलात आणण्याचे ठरविण्यात आले. या गोमय गणेशामुळे पाणी, शेती आणि निसर्गावर होणारे दुष्परिणाम टाळणे शक्य होणार आहे. गोवंशरक्षण आणि गोशाळा आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकणार आहे. .

आज अनेक ठिकाणी गोशाळा आहेत. त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आणि गायी पाळणाऱ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी लाभेल. जास्तीत जास्त लोकांमध्ये याविषयी जागरूकता येणे गरजेचे आहे. गोमय गणेशमूर्तींमुळे पर्यावरणाचे रक्षण, गोधन वाचवणे, शेतकऱ्याची समृद्धता आणि गोमयाला अपेक्षित मूल्य मिळावे, अशा प्रकारचे अनेक फायदे आहेत. तसेच या मूर्तीचे घरीही विसर्जन करता येते. विशेष म्हणजे विसर्जनानंतर २४ तासांत विरघळणारे मूर्तीचे गोमय अवशेष घरातल्या बगिच्यातील झाडांना खत म्हणून उपयोगाला येते.

नागरिकांमध्येही पर्यावरण जतन आणि संवर्धनाबाबत जागृती निर्माण होणे आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने याचा गांभीर्यांने विचार करायला हवा. गोमय गणेशाची प्रतिष्ठापना करून सण-उत्सवाचा आनंद लुटुया; पर्यावरणाचे संवर्धन करूया.

Back to top button