विज्ञान, तंत्रज्ञानाचे शिक्षण भारतीय भाषांतूनच द्यावे : डॉ. विजय भटकर यांचे प्रतिपादन : डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान प्रदान

पुणे: दि ९ – विज्ञान व विशेषत: तत्रज्ञानाचे शिक्षण बारतीय भाषांतून देण्याची तरतूद केंद्राने नव्या शैक्षणिक धोरणात केली असून, ती स्तुत्य आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण भारतीय भाषांतूनच दिले जावे, असे माझे स्पष्ट मत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे केले.
कोलकत्यातील श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालयातर्फे दिला जाणारा डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान पुरस्कार डॉ. भटकर यांना भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. भटकर बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समरसता गुरुकुलमचे संस्थापक अध्यक्ष गिरीश प्रभुणे, बडाबाजार कुमारसभा पुस्तकालयाचे सचिव महावीर बजाज प्रत्यक्ष, तर संघाचे सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधर, कुमारसभा बडाबाजार पुस्तकालयाचे अध्यक्ष डॉ. प्रेमशंकर त्रिपाठी व संस्थेचे पदाधिकारी आभासी पद्धतीने उपस्थित होते.
परम संगणकाच्या निर्मितीवेळी आम्ही विविध भाषांचा अभ्यास केला. त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे कोणत्याही भाषेच्या विकासासाठी, ती भाषा तगून राहण्यासाठी तिला तंत्रज्ञानाचे पाठबळ देणे आवश्यक आहे. देशात आज अशाही अनेक भाषा आहेत, की त्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, तर अनेक भाषा लुप्तही झाल्या आहेत. त्यामुळेच कोणतीही भाषा टिकणे, ती बहरणे व तिच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातूनच आम्ही पुढे वाटचाल करत गेलो. आमच्या या विचारांचे प्रतिबिंबच नव्या शैक्षणिक धोरणात उमटले आहे, असे मला वाटते. विज्ञान, तंत्रज्ञानाचे शिक्षण भारतीय भाषांतून दिले गेले, तर ते आपल्या सर्व भाषांना उपकारकच ठरेल आणि हे ज्ञान सर्वसामान्य विद्यार्थ्यापर्यंत सहजतेने पोहोचेल, असे डॉ. भटकर म्हणाले.
देशावर अनेक आक्रमणे झाली. ब्रिटिशांनी देशाच्या प्रज्ञेवर आक्रमण केले. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्यातील स्वत्वाची जाणीव आपल्याला होणे गरजेचे आहे. प्रज्ञेच्या गुलामगिरीतून आपण बाहेर पडणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात आपल्याला अद्याप पुरेसे स्वातंत्र्य मिळालेले नाही. शिक्षण क्षेत्रासह भाषेतही आपल्याला स्व जागृती करणे व राष्ट्रभक्तीभाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे चक्रधर यांनी सांगितले.
परम संगणकाची यशस्वी निर्मिती करून डॉ. भटकर यांनी देशाला आधुनिक युगात आणून ठेवले, असे प्रभुणे यांनी सांगितले. वंजारवाडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. त्रिपाठी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वैद्य आशुतोष जातेगावकर यांनी गीतगायन केले. महावीर बजाज यांनी मानपत्राचे वाचन केले. तसेच, आभार मानले. डॉ. तारा दुगड यांनी सूत्रसंचालन केले.