गणेश चतुर्थी. गोव्यात साजरा होणार सगळ्यात मोठा उत्सव. देशभरात हा उत्सवाला वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. विविध रूढी, परंपरा आणि विविधतेने नटलेल्या ह्या उत्सवाची रूपं वेगवेगळी आहे. सर्वसाधारण पणे महाराष्ट्रात ह्या उत्सवाला सामाजिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उंच-उंच मुर्त्या, आकर्षक भव्य दिव्य देखावे आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते अनंतचतुर्दशी पर्यंत वाजत गाजत चाललेला उत्सव अशी सर्वसाधारण संकल्पना ह्या उत्सवाची असते. पण गोव्यात हा उत्सव कौटुंबिक स्वरूपात जास्त साजरा केला जातो आणि ह्या उत्सवाचे एक वेगळे स्वरूप पाहायला मिळते.
जसा वेळ काळ आणि समाज बदलत जातो तसेच त्याचे प्रतिबिंब समाजातील उत्सांवावर पाहायला मिळते. काही वेळा याची नकारात्मक बाजू पाहायला मिळते उदा. सजावट आणि रोषणाई यावर अवाढव्य खर्च, फटाके वगैरे वगैरे आपण जर यादी काढू तर खूप लांबलचक होईल पण, परंपरागत चालत आलेल्या अनेक गोष्टी ज्यांचा सहभाग अनेक हिंदू उत्सवांमध्ये आहे त्यांच्या मागे तर्कशुद्धता व निसर्गसमावेशक भावना अत्यंत खोलवर रुतलेली आहे.
गोव्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात अनेक वशिष्टये आपणाला पाहायला मिळतात. खरं तर प्रत्येक गावाची आपली अशी एक वेगळी रूढी किंवा परंपरा असते. पण त्यातल्या त्यात एक परंपरा जी सगळीकडे सर्वसामान्य आहे ती म्हणजे “माटोळी”. सर्वसाधारण पणे भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आदल्या रात्री हि माटोळी जिथे गणपती बसवणार त्याच्या समोर वरच्या बाजूने बांधली जाते. तरी विविध भागात गेल्यावर या संबधी वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा प्रचलित आहे पण साधारण पणे सगळीकडे चतुर्थीच्या आदल्या रात्रीच बांधली जाते.
चतुर्थी गोवेकरांसाठी हा कौटुंबिक सण असल्याने कामानिमित्त सर्वदूर असलेली घरची मंडळी त्या वेळी घरी येतात आणि सर्वजण मिळून हा उत्सव साजरा करतात. घरच्या सर्वांनी मिळून माटोळी बांधणे हा एक वेगळाच अनुभव असतो. साधारण पणे घरात गणपती कुठे बसवला जातो याची जागा नक्की व राखीव केलेली असते व त्या जागेच्या वर चौकोनाकृती अथवा आयताकृती लाकडाची चौकट बसवलेली असते.
चतुर्थीला ह्या चौकटीत त्या जागेतील त्या मोसमात पिकणारी, पिकवली जाणारी किव्वा तयार होणारी फळे, भाज्या व औषधी पाने, फुले ह्या गोष्टी बांधल्या जातात. प्रत्येक हिंदू उत्सव हा निसर्गसमावेशक असतोच ह्याचे एक उदाहरण म्हणजे हि माटोळी. मुळात ह्या मागची संकल्पना अशी असते कि घरातील मंडळी माटोळी साठी लागणारे साहित्य गोळा करण्या निमित्त रानावनात, आपल्या गावात फिरणार. जेव्हा लहान थोर यासाठी जाणार तेव्हा वयस्क मंडळी रानात एखादे झाड, फळ, फुल, औषधी वनस्पती कुठे मिळते, त्याचा उपयोग काय ह्या सारखी माहिती छोट्यांना म्हणजेच नवीन पिढीला देते. काही फळे फुले त्याच मोसमात फुलतात तेव्हा त्यांची माहिती हि अश्या उत्सवातील विविध परंपरे द्वारे नवीन पिढीपर्यंत सर्जनशीलपणे पोचवली जाते. त्याच निमित्ताने निसर्गाची निगा राखणे, झाडे ओळखणे, कुठले झाड न कापणे, झाडांचे औषधी गुणधर्म ह्या सारख्या छोट्या छोट्या गोष्टी सहजपणे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवल्या जातात.
आपल्या परिसरातील कंद मुळे आणि फळे फुले, औषधी वनस्पती जमवून माटोळी बांधली जाते. साधारण पणे २५-४० पर्यंत संख्या असलेले नग माटोळीवर बांधले जातात. सर्वप्रथम श्रीफळ बांधून नंतर सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी सारखी फळे बांधून नंतर आपल्या परिसरात पिकवली जाणारी फळे फुले भाज्या उदा. कणसे, सुपारी, काकडी, दोडगी, टरबूज, भेंडी, वाल, मावळींग, तोरिंग ई. त्याच बरोबर रानातील औषधी पाने फुले उदा. पत्री, कांगला, कात्रे, आवळा, फागला ई. सारखी अनेक नग मिळून हि माटोळी बांधली जाते आणि हि माटोळी परंपरेसोबत सजावटीचा सुद्धा एक भाग असतो.
माटोळी हा विषय ध्यानात घेऊन अनेक वर्षांपासून गोवा राज्य कला व सांस्कृतिक खाते माटोळी सजविण्याची स्पर्धा घेते. ह्यातून प्रेरणा घेऊन अनेक स्थानिक संस्थांनी सुद्धा ह्या परंपरेला प्रोत्साहन द्यायला अश्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली, आणि ह्याचे एक वेगळे चित्र समाजात पाहायला मिळाले. फोंडा तालुका हा गोव्यातील सांस्कृतिक वारसेचा गाभा आहे. गोव्यातील कला आणि सांस्कृतिक परंपरेचे केंद्र आहे आणि इथल्या अनेक तरुणांनी पुढाकार घेऊन ह्या स्पर्धेनिमित्त आकर्षक माटोळ्या करून अनेक पारितोषके हि पटकावली आणि नंतर गोव्यातून विविध ठिकाणी अश्या प्रकारच्या माटोळ्या सजू लागल्या.
पण, जिथे संस्कृती आणि संस्कार रुजतात तिथे समाजात सकारात्मक बदल बघायला मिळतात. कोविड मुळे मागील दोन वर्षात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करता आले नाही. तेव्हा माटोळी सजावट सारख्या स्पर्धा झाल्या नाही तरीसुद्धा अनेक जणांनी हि परंपरा चालू ठेवली. फोंड्यातील कुर्टी गावातील विशांत गावडे आणि कुटुंबीय ह्यात समाविष्ट आहे. गेली अनेक वर्षे गोवा सरकारने व अनेक संस्थांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत अनेकदा विजेते झालेले आहेत. या वर्षी त्यांनी चक्क २७५ विविध नग वापरून गोवर्धनधारी श्रीकृष्णांची प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या साठी लागणारी सगळे साहित्य त्यांनी गोव्यातील विविध भागात जाऊन एकत्रित केले. प्रामुख्याने हे सगळे करताना त्यांना त्यांच्या प्रत्येक कुटुंबियांकडून प्रोत्साहन व मदत मिळाली. गोव्यातील जवळ जवळ सर्व वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल नि त्यांच्या कामाची दखल घेतली. समाज माध्यमाद्वारे माटोळी चे फोटो वायरल होताच माटोळी बघायला गोव्यातील कानाकोपऱ्यातून लोकं त्यांच्या घरी आले.
त्यांच्या बरोबर फोंडा तालुक्यातील अनेक लोकांनी साकारलेल्या माटोळ्या सुद्धा प्रकाशझोतात आल्या. तृप्ती पालकर यांनी मारुतीची प्रतिकृती साकारली आणि हि माटोळी सजवायला त्यांना सुद्धा २०० पेक्षा जास्त फळे, फुले व भाज्यांचा वापर केला. श्रीकांत गावडे यांनी तर जवळ जवळ ३०० नग वापरून विठ्ठलाची प्रतिकृती साकारली.
सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्यांना प्रोत्साहन दिले तर समाजात गरज असलेले अमूलाग्र बदल आपोआप घडतात याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे गोव्यातील माटोळीची परंपरा, आणि काळानुसार सकारात्मक बदल घडवून कल्पकता, सर्जनशीलता आणि कलेचा उत्कृष्ट मेळ घालत तिला जोपासणारी आजची युवा पिढी. कदाचित वर नमूद केलेली तरुण मंडळी काही लोकांप्रमाणे फटाके जाळून उत्सव साजरा करू शकली असती पण त्यांनी तसे न करता उत्सव व परंपरेतील तर्क आणि संस्कार आत्मसात करून आवश्यक असलेली बाजू आणि हिंदू संस्कृती आणि परंपरा समाजासमोर उभी केली.
जेव्हा टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हा “घरातले देव रस्त्यावर आणले” अश्या प्रकारची टीका अनेकांनी त्यावेळी केली असेल. पण त्यामागचा हेतू समजून अखेरीस समाजाने ते स्वीकार केले आणि त्याचे चांगले परिणाम बघायला मिळाले. पण, काळाप्रमाणे त्यात झालेले बदल हे सकारात्मक आहेत का हा प्रश्न, फक्त प्रश्नच राहिलेला दिसतोय. पण त्याचबरोबर समाजातील अनेक घटक समाज परिवर्तनास सक्षम आहे. तेव्हा अश्या सज्जन शक्तींना प्रोत्साहन दिले तर समाजाचे चित्र पालटून जाईल यात शंका नाही. गोव्यातील माटोळी परंपरा पिढ्यानुपिढ्या सांभाळणारे, साकारणारे आणि पुढच्या पिढीपर्यंत संस्कृतीची मुळे सांभाळून नव्याने हस्तांतर करणारे ह्याच बदलाचे एक उदाहरण आहे.
सौजन्य : विश्व संवाद केंद्र, गोवा