लंडन : ब्रिटन सरकार ने यावर्षी दिवाळीच्या औचित्याने देवी लक्ष्मीचे चित्र असलेले सोन्याचे बिस्कीट खरेदी करण्याची सुवर्णसंधी आपल्या नागरिकांना दिली आहे. येथील सुप्रसिद्ध रॉयल मिंट ने देवी लक्ष्मीचे चित्र असलेले सोन्याचे बिस्कीट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या सोन्याच्या बिस्कीटाचे वजन 20 ग्रॅम असून त्याची किंमत एक लाख रुपये आहे.
उल्लेखनीय बाब अशी कि, हिंदूंचा सर्वात मोठा सण अर्थात दिवाळी यावर्षी ४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धन आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानून तिची पूजा केली जाते. म्हणूनच देवी लक्ष्मीचे चित्र या सोन्याच्या बिस्किटावर साकारण्यात आले आहे. दिवाळीत धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर भारतीय नागरिक सोने खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी करणे हे शुभ आणि भरभराट करणारे मानले जाते. ही भारतीय संस्कृती डोळ्यासमोर ठेवूनच रॉयल मिंटने हे नवे बिस्किट बाजारात आणले आहे.
दिवाळीच्या दिवसांत हे सोन्याचे बिस्कीट येथील स्थानिक स्वामिनारायण मंदिरात ठेवण्यात येणार आहे. सौंदर्य आणि परपंरा याचबरोबर आधुनिकता असा तिन्हींचा परिपाक असलेले उत्पादन तयार करण्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानुसार देवी लक्ष्मीचे चित्र सोन्याच्या बिस्किटावर मुद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रॉयल मिंटचे संचालक अँड्र्यू डिकी यांनी सांगितले.