नवरात्रोत्सव… उत्सव मातृत्वाचा
भाद्रपदातील गणेशोत्सवानंतर सुरु होणारा नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात स्त्रीच्या ‘स्त्रीत्वाचा’ चा, तिच्या सृजनशीलतेचा, मातृत्वाचा उत्सव… संबंध देशात साजरा होणारा नवरात्राचा नऊ दिवसांचा सोहळा म्हणजे स्त्रीच्या गर्भारपणाच्या नऊ महिन्यांचे पूजन. त्या नऊ ,महिन्यांची पूजा या नऊ दिवसांत आपल्या संपूर्ण देशात केली जाते. . नवरात्रोत्सव दुर्गा, भवानी, लक्ष्मी, सरस्वती आदी देवींच्या पूजनाचा सोहळा असला, तरी तो पृथ्वीतलावरच्या तमाम ‘स्त्रीत्वा’ च्या गौरवाचा आणि पूजनाचा सोहळा आहे. ‘स्त्री’ च्या ठायी असलेल्या ‘प्रसव’ क्षमतेची, ‘मातृत्वा’ ची ही महापूजा आहे. सृष्टीतील सर्वच सजीवांचे अस्तित्व अवलंबून असलेल्या सृजनाच्या उत्सवाचा हा सोहळा आहे.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी ‘घटस्थापना’ केली जाते. या दिवशी एका कलशात धान्य आणि पाणी भरून त्यामध्ये सुपारी, एक हळकुंड, अक्षता, पैसे ठेवले जातात. या कलशावर आंब्याचे पान ठेऊन त्यावर नारळ ठेवतात. काही ठिकाणी मातीच्या घटात दिवा लावला जातो व हा दिवा नऊ दिवस सतत तेवत ठेवला जातो. मुंबईत परातीत माती घेऊन वेगवेगळे धान्य पेरले जाते व नऊ दिवस ते पाण्याने शिंपले जाते. याला ‘रुजवण’ असे म्हणतात. कलशाला नऊ दिवसाच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पाना-फुलांनी पुजले जाते. यात प्रांताप्रांतानुसार फरक असला, तरी भावना तिच – वंश सातत्याची, मातृत्वाच्या पूजनाची असते. घरी स्थापन केलेला कलश आणि मातीचा ‘घट’ म्हणजे स्त्रीच्या ‘गर्भाशया’ चे प्रतीक आणि त्यात नऊ दिवस सातत्याने मंदपणे तेवत असलेला दिवा म्हणजे त्या ‘गर्भाशयात’ फुंकला गेलेला ‘प्राण’. आपल्या संस्कृतीत दिवा हे प्राणाचं प्रतीक मानले गेले आहे. परातीत रुजत घातलेले धान्य आणि शेजारच्या मातीच्या घटात तेवत असलेला दिवा, मातीच्या उदरातून वर येणारे धान्य आणि स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेला गर्भ यातील साम्य दर्शवतात.
नऊ दिवसांचा ‘नवरात्रोत्सव’ म्हणजे स्त्रीच्या नऊ महिन्यांचा गर्भार अवस्थेचा सन्मान आहे. दहाव्या दिवशी साजरा होणारा दसरा नवजात बाळाचे गर्भाशयातून या जगात होणाऱ्या ‘सीमोल्लंघनाचे प्रतीक आहे. नऊ ,महिन्यांचे गर्भारपण संपून बाळाचा होणारा जन्म, मातीच्या उदरातून तरारून येणाऱ्या पिकापेक्षा वेगळा नाही.
नवरात्रीतल्या प्रत्येक माळेचे वैशिष्ट्य वेगवेगळे असले तर आठव्या माळेला म्हणजे ‘अष्टमी’ ला विशेष महत्व आहे. ‘आठव्या महिन्यात बाळंतपण म्हणजे कठीण’ असे म्हटले जाते. म्हणजे आठव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाची जगण्याची शक्यता थोडी कमी असते आठव्या महिन्यात जन्म घेतलेल्या बाळाने जीव धरावा यासाठी अष्टपुजनाला महत्व दिले गेले आहे. नवमी तर साक्षात बाळ जन्माचा दिवस आणि दसऱ्याला आईच्या उदरातून सिमोल्लंघन करून जगात आलेल्या बाळाच्या आगमनाचा आनंद सोहळा. असा हा नवरात्रोस्तव मातृत्वाचा उत्सव आहे. स्त्रीची ओळख ‘माता’ म्हणूनच आहे. म्हणूनच
‘या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता। .
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥’
असे म्हणून सर्व चराचर व्यापून राहिलेल्या स्त्रीच्या सृजन शक्तीला, आपल्या संस्कृतीने ‘मातृ’ रूपात गौरविलेले आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गामातेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्री ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान साजरी केली जाईल. सणाच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे रंग असतात जे देवीला समर्पित असतात. या नऊ दिवसांसाठी नऊ रंगांचे खूप महत्त्व असते. नवरात्रीत नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना साधारण दहा-पंधरा वर्षांपासून सुरू झाल्याचे खगोलशास्त्राचे अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. नवरात्र हा निर्मितीचा उत्सव आहे. नऊ दिवसांत या रंगांमुळे साऱ्याजणी एकसारख्याच दिसतात. त्यांच्यामध्ये समानता दिसते. या दिवसात गरीब- श्रीमंत अशी दरी दिसत नाही. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते. हे रंग एकमेकींना बांधून ठेवतात. म्हणून एकोपा, समानता यावी यासाठी नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली. यानिमित्ताने नवरात्रीच्या नऊ दिवसांबद्दल जाणून घेऊ .
पहिला दिवस – घटस्थापना / प्रतिपदा
पहिली देवी – शैलपुत्री
रंग – पिवळा
नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीचा मानण्यात येतो. शैलपुत्री देवी दुर्गाचे पहिले रूप आहे. नवदुर्गेतील ही पहिली दुर्गा असल्याने या देवीची पूजा पहिल्या दिवशी करण्यात येते. पर्वतराज हिमालयच्या पोटी जन्म घेतल्यामुळे हिचे नाव शैलपुत्री असे ठेवण्यात आले. प्रतिपदेचा पहिला दिवस गुरुवारी येतो, या दिवसाचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग मंगलकार्यात शुभ मानला आहे. शुभकार्यात कुंकवाबरोबर पिवळी हळदही वापरतात. पिवळा रंग हा सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो. महाराष्ट्रात पिवळी हळद हीच खंडोबाची प्रिय वस्तू आहे. भंडारा म्हणून तीच देवभक्तांवर उधळतात. वधूची अष्टपुत्री नावाची साडी पिवळ्या रंगाची असते.
दुसरा दिवस – द्वितिया
दुसरी देवी – ब्रम्हचारिणी
रंग – हिरवा
नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारी अशी ही देवी. या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. तप, संयम आणि त्यागासाठी ही देवी प्रसिद्ध आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस द्वितीया आहे. हा दिवस हिरवा रंग घालून साजरा केला जातो जो निसर्गाचा आणि समृद्धीचा, नववधूच्या हिरव्या चुड्याचा रंग आहे.
तिसरा दिवस -तृतीया
देवी – चंद्रघंटा
रंग – राखाडी
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीची उपासना करतात. डोक्यावर घंटेप्रमाणे चंद्र धारण करणारी. शुभ राखाडी रंग नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला घातला जाईल. सूक्ष्मतेच्या दृष्टिकोनातून हा राखाडी रंग देखील एक अद्वितीय रंग आहे. स्थिरतेचा, सुरक्षतेचा, कौशल्याचा, शिस्तबद्ध्तेचा असा हा करडा रंग आहे.
चौथा दिवस – चतुर्थी
देवी – कुष्मांडा
रंग – नारंगी
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते. आपल्या मंद हास्यातून विश्वाची निर्मिती करणारी कुष्मांडा देवी. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीने ब्रम्हांडाची रचना केली अशी आख्यायिका आहे. चौथ्या दिवसाचा रंग नारंगी आहे. हा रंग क्रियाशक्ती, उत्साह, अभिमान आणि भरभराट याचे द्योतक आहे.
पाचवा दिवस – पंचमी
देवी – स्कंदमाता
रंग – पांढरा
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पुजन केले जाते. पंचमीच्या पाचव्या दिवशी पांढरा रंग आहे. पांढरा रंग शुद्धता आणि निरागसपणाचे प्रतीक आहे. शीतल प्रकाश देणार्या चंद्राचा, शांततेचा पांढरा रंग संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि शांततेचा प्रतीक म्हणून पांढरा रंग ओळखला जातो. पांढरा रंग हा कोमल आणि पारदर्शक असतो
सहावा दिवस – षष्ठी
देवी – कात्यायिनी
रंग – लाल
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायिनी देवीची पुजा केली जाते. असुरांच्या वधासाठी हाती चंद्रहास तलवार धारण करणारी काव्ययन ऋषींची पुत्री. षष्ठीच्या दिवशी या देवीची पुजा केली जाते. षष्ठीच्या दिवशी लाल रंग आहे. लाल रंग हा आरोग्य, जीवन, अनंत धैर्य आणि तीव्र उत्कटतेचे प्रतीक आहे. ऊर्जेचा, प्रेरणेचा, सुवासिनीच्या कुंकवाचा. लाल रंग आयुष्यात आनंद आणि उत्साही राहण्यासाठी लाल रंगाचे विशेष महत्त्व आहे. लाल रंग हा पराक्रमाचे प्रतीक आहे.
सातवा दिवस – सप्तमी
देवी – कालरात्रि
रंग – निळा
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रि देवीची पुजा केली जाते. रौद्र स्वरूप. उग्र संहारक अशी तामसी शक्ती असलेली ही देवी आहे. ही देवी दिसायला भयानक असली तरी तिला नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. सप्तमीला बुधवार असून या दिवशी निळा रंग आहे. निळा रंग उत्तम आरोग्य आणि समृद्धी आणतो. विश्वासाचे, श्रद्धेचे, सुस्वभावाचे, आत्मीयतेचे प्रतिक म्हणजे निळा रंग. भारताच्या राष्ट्रीय ध्वजात मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे म्हणजेच २४ तास प्रगतीकडे वाटचाल करणारा निळा रंग. शांततेचा प्रतीक, शीतलता आणि स्निग्धता ही या रंगाची खास वैशिष्टे.
आठवा दिवस – अष्टमी
देवी – महागौरी
रंग – गुलाबी
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते. आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावे म्हणून अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते. महागौरी हे दुर्गेचे आठवे रूप. महागौरीने भगवान शिव पती मिळावे म्हणून कठोर तपस्या केली होती. आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावे म्हणून अष्टमीच्या दिवशी या देवीची महिला आराधना आणि पूजा करतात. तसेच या दिवशी लहान मुलींचीही पूजा करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी गुलाबी रंग असून गुलाबी हे सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि स्त्री आकर्षणाचे प्रतीक आहे. हा सुसंवाद आणि दयाळूपणाचा रंग आहे. गुलाबी : प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, सुखद स्वप्नांचा रंग आहे.
नववा दिवस – नवमी
देवी – सिद्धिदात्री
रंग – जांभळा
नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पुजा केली जाते. आपल्या भक्तांना सिद्धी प्राप्त करून देणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. या नवव्या आणि शेवटच्या दिवशी जांभळा रंग असून हा रंग संयमाचा, क्षोभ आणि शांतता यांच्या अजब मिलाफाचा, शांती आणि समाधानाचे प्रतीक मानला जाणारा आहे.
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आणि प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी-देवतांचा, त्यावरून हे रंग ठरवले जातात..उदा. सोमवार महादेवांचा वार. भगवान महादेवांना पांढरा रंग आवडतो म्हणून पांढरा तसेच मंगळवार गणपतीचा वार.बाप्पाला लाल जास्वंद आवडते म्हणून लाल रंग..इ. अशाचप्रकारे संपूर्णआठवड्यातील रंग ठरविले जातात.प्रत्येक रंगाला एक विशिष्ट महत्त्व आहे आणि त्या रंगातून आपल्याला एक ऊर्जा मिळत असते. प्रत्येक रंग कशाचे ना कशाचे तरी प्रतीक असतो आपल्याला एक संदेश देत असतो.
हे असे रंग आपल्या आयुष्यात भरून राहिले आहेत. रंग आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत. नवरात्रीच्या नवरंगात रंगून जाताना आपण प्रत्येकाने मग ते महिला, पुरुष, अबालवृद्ध कोणीही असोत, आदिमायेची उपासना करताना आपल्या समाजातील मातृशक्तीचा आदरही करायला हवा. स्त्रीभ्रूण हत्या थांबवून, मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानून, आपल्या मुलीकडे जबाबदारी म्हणून न पाहाता तिच्याकडे संपत्ती म्हणून पाहण्याची वृत्ती वाढवायला हवी. मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करण्याची मानसिकता वाढवायला हवी. महिलांवरचे वाईट आणि आकसयुक्त विनोद बंद करायला हवेत. पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला प्रोत्साहन द्यायला हवा. स्त्री ही अनेक बाबतीत श्रेष्ठ असलेली ‘माणूस’ आहे हे लक्षात घ्यायला हवे. विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजाती’ल नराधमांच्या मनात भीती निर्माण करायला हवी. ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर फक्त भाषणे न करता, कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करायला हवा. .
आज महिला चूल आणि मूल या परिघात न राहता उंबरठ्याच्या बाहेर असलेली आपली स्वप्ने पाहण्यास आणि ती पूर्ण करण्यास सामर्थ्यवान ठरल्या आहेत. प्रत्येक स्त्री स्वत: च्या सन्मानासाठी स्वाभिमानाने जगण्यास धडपड करीत आहे. आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करत स्वत:ला सिद्ध करीत आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गामातेच्या आशीर्वादाने तमाम मातृशक्तीचा आदर करूया, त्यांना सन्मानाने जगू देऊया.
**