
श्री. शंकर श्रीकृष्ण देव – अध्यात्माच्या मार्गावरील, विशेषत: रामदासी संप्रदायाच्या साधकांना, दासबोधाच्या अभ्यासकांना सुपरिचित नाव. शंकर श्रीकृष्ण देव, म्हणजे महाराष्ट्राच्या जीवनातील लोकमान्य युगाची एक अनमोल देणगी. पेशाने वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी, सक्रिय राजकारणी, रामदासी तत्त्वबोधाचा चिकित्सक, संशोधक अभ्यासक, श्रीसमर्थ रामदासांचा चरित्र लेखक आणि निस्सीम भक्त, सिद्धहस्त लेखक, ओजस्वी वक्ता,आणि एक यशस्वी उद्योजक! इतके विविध पैलू आणि परस्पर विरोधी वाटणाऱ्या कार्यक्षेत्रात आपला न मिटणारा ठसा ऊमटविणारे अजब रसायन !
रामदासी संप्रदायात, श्रीसमर्थपर वाङ्मयात श्री शंकर देवांचे लिखाण म्हणजे अंतिम शब्द असे मानले जाते. याला कारणही तसेच आहे.ते म्हणजे समर्थ तत्त्वबोधाशी सतत अनुसंधान ठेवत पन्नास वर्षांहून अधिक काळ रामदासी ग्रंथमाला आणि रामदासी मासिक यात केलेले सातत्यपूर्ण लेखन, रामदासी ग्रंथमालेतील सारभूत प्रस्तावना, सांप्रदायिक विविध विषय, तत्त्वचर्चा, रामदासी संशोधन करुन श्री समर्थचरणी अर्पिलेले रामदासी तत्वबोधी लिखाणाचे ११ ग्रंथ सुमनहार आणि या सर्व समर्थसाहित्य लिखाणाचा कळस म्हणजे श्रीसमर्थ रामदासांचे त्रिखंडी विस्तृत चरित्र – श्री समर्थ अवतार, श्री समर्थ ह्रदय आणि श्रीसमर्थ संप्रदाय इतके विपुल अभ्यासपूर्ण लिखाण!
या एवढ्या विस्तृत लिखाणाचा पाया तर त्याहूनही जास्त विस्तृत ! खरं तर देवांनी स्वत:च
म्हंटल्याप्रमाणे श्रीसमर्थ चरित्र लिहावे, हा त्यांचा मूळ हेतू नव्हताच. देवांची समर्थभक्ती ही त्यांच्या कट्टर राष्ट्रनिष्ठेतून निर्माण झाली होती. देशाचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्यलढा आणि त्यातील सहभाग हा त्यांचा श्वास होता. आपल्या देशाचे स्वातंत्र्य हा त्यांच्या आयुष्यासाठी मार्गदर्शक ध्रुवतारा होता – नॉर्थ पोल स्टार ! त्या प्रकाशातच त्यांना रामदास भेटले! कारण समर्थ हे केवळ आध्यात्मिक सत्पुरुष नव्हते तर ते एक लोकशिक्षक, लोकनेता, नीतिशिक्षक, राष्ट्रचिंतक, सुसंवादक , संघटक, समुपदेशक अशा विविध भूमिकेतून समाजमनाची त्या काळात मशागत करत होते. आणि देवांच्या मते भारतीय समाजमनाची अशी मशागत करणं, भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठीची प्राथमिकता होती. (आणि भारताच्या एक संपन्न, समर्थ राष्ट्रउभारणीसाठी आज ही आहे).
दासबोधच नव्हे तर समर्थांचे एकूणच वाङ्मय महाराष्ट्राच्या कर्तबगारीला पुन्हा उधाण आणेल आणि ‘महाराष्ट्र धर्म’ जागवून भारतीय संस्कृतीला, राष्ट्राला भाग्याचे दिवस आणेल, अशी त्यांची धारणा होती. देवांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे ‘‘समर्थांचे अंतरंग जाणावे, तत्त्वबोध समजावून घ्यावा आणि त्यांची कृपादृष्टी पुनरपि महाराष्ट्राकडे आणि पर्यायाने देशाकडे कशी वळवता येइल, ते पहावे आणि असे काही करावे !’’ असा त्यांचा हेतु होता. देश ही त्यांची प्राथमिकता होती. स्वा. सावरकर म्हणत असत की “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो’’ श्री शंकर देवांच्या बाबतीत हा क्रम थोडा वेगळा झाला. त्यांना देहाकडून देशाकडे जाताना मध्ये देव भेटला !
परंतु एकदा का एखादे कार्य हाती घेतले की त्याच्या मुळापर्यंत जायचे,त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी बेहत्तर अशा त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी रामदास संप्रदायातील मठ आणि मठ पालथे घातले, हजारो हस्तलिखिते गोळा केली. समर्थांनी स्वत: लिहिलेली वाल्मिकी रामायणाची पोथी, अनेक शिष्यमंडळींची, मठाधिपतींची हस्तलिखिते, त्यांचा श्रीसमर्थरामदास किंवा त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांच्याबरोबर झालेला संवादबोध, श्रीसमर्थांच्या हस्ताक्षरातील एकमेव गद्य पत्र, श्री समर्थवाङमयाची अशी अनेक बाडं, दस्तऐवज त्यांनी स्वत: जमविले, प्रत्येक बाडाची चिकित्सात्मक माहिती रामदासी संशोधनाच्या दोन खंडात लिहून ग्रथित केली आणि ही नुसती नीरस सूची अशा स्वरूपात नसून, त्यात समर्थसंप्रदायाचे अनेक अंगांनी दर्शन करुन दिले आहे. पुढच्या पिढीला संशोधनासाठी, साधकाला अभ्यासासाठी मार्ग प्रशस्त करुन दिला. अतिशय भावनाप्रधान आणि मृदू व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री. देवांचे लिखाण चिकित्सेत कुठेही उणे नाही कारण त्यामागचा त्यांचा अभ्यास ! श्री. देवांनी चिकित्सापूर्वक अभ्यासून, संशोधनपूर्वक पद्धतीने छाननी करुन थोड्या थोडक्या नाही तर तब्बल २६ हजार पृष्ठांचे छापून पुनर्मुद्रण केले. दीड वर्ष अतिसूक्ष्म अभ्यासाअंती दासबोधाची प्रस्तावना लिहिली. ही प्रस्तावना इतकी प्रासादिक, अर्थगर्भ आणि प्रेरक होती की त्या काळच्या तरुण राष्ट्रभक्तांचे नित्यपाठाचे स्तोत्र झाली होती. गांधीवादी देशभक्त विनोबा भावे यांना ती शब्दश: तोंडपाठ होती. प्रख्यात साहित्यिक श्री.म.माटे शंकर देवांना मराठी वाङमयातील कौस्तुभ म्हणत तर मराठीतील एक भाषाप्रभू कृ.पां.कुलकर्णी यांच्या मते, ‘‘देवांच्या भाषेसारखी स्वच्छ, स्पष्ट आणि झुळझुळीत भाषा आता दुर्मिळ झाली आहे!’’ प्रसिद्ध पत्रकार श्री. आप्पा पेंडसे यांच्या मते देव विशेष शैलीचे सिद्धहस्त लेखक होते. देवांच्या कार्याचा, समर्थ साहित्याचा, त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या सत्शील वृत्तीचा आचार्य विनोबा भावे यांच्यावर इतका प्रभाव होता की जेव्हा विनोबाजींचे वडील, जे स्वत: रामदास भक्त आणि रामदासी संप्रदायाचे साधक होते, निवर्तले त्यावेळी विनोबाजींनी देवांना विनंती केली की, तुम्हीच त्यांचे अध्यात्मिक पुत्र आहात आणि म्हणून तुमच्याच हस्ते सर्व विधी व्हावेत, इतका आदर विनोबाजींच्या मनात शंकर देवांप्रती होता.
तसं म्हटलं तर, भारतभर भ्रमण करून, श्रीसमर्थ रामदासांनी जागोजाही स्थापलेल्या मठामठांतून विखुरलेले समर्थांचे लिखाण, संप्रदायातील जेष्ठ शिष्य, मठाधिपती यांचे लिखाण जमविणे, त्याची छाननी करणे आणि केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या अध्यात्मिक संचिताचा हा अमूल्य ठेवा जतन करणे, हे एखाद्याच्या संपूर्ण आयुष्याचे जीवितकार्य होऊ शकते. परंतु श्री. देवांची झेप त्याच्याही पलीकडची. या ठेव्याचे योग्य जतन होऊन, तो पुढील पिढ्यांना उपलब्ध व्हावा, म्हणून, त्यांनी त्यांच्या मूळगावी, धुळे येथे, श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर स्थापन केले. ‘श्रीसमर्थांचे विस्मरण म्हणजे महाराष्ट्राचे मरण’ असा त्यांचा ठाम विश्वास असल्यामुळे, त्यांचे अखंड स्मरण रहावे आणि रामदासी बाण्याचा अंगीकार केलेले समर्थसेवक कार्यकर्ते निर्माण व्हावेत, म्हणून त्यांनी श्रीसमर्थ संघाची स्थापना केली, गावोगावी त्याच्या शाखा काढण्यात पुढाकार घेतला. या समर्थसेवक, समर्थसंघाचे अध्यक्ष होते, पुढे स्वतंत्र भारताच्या पहिल्या संसदेचे सभापती झालेले, ग. वा. मावळणकर. या समर्थ संघाचा प्रसार करण्यासाठी देवांनी भारतभर दौरे केले.
देवांच्या कार्याची व्यापकता, अभ्यासाची सखोलता पहिली की, आपण स्तिमित होतो. श्रीसमर्थ रामदासांचे चरित्र लिहिण्याचा विचार जेव्हा त्यांच्या मनात आला, तेव्हा, श्री. देवांनीच त्यांच्या श्रीसमर्थ अवतार या पहिल्या खंडाच्या ‘ग्रंथारंभ’ या पहिल्या ‘उल्हासात’, म्हणजे प्रकरणात म्हटल्याप्रमाणे, “ज्या कोणाचे चरित्र आपणास जाणायचे असेल, त्याच्या काळाच्या परिस्थितीची जर आपणास बरोबर कल्पना आलेली नसेल, तर त्या व्यक्तीच्या चरित्राचे पूर्ण व यथार्थ आकलन होणार नाही.” त्यामुळे श्रीसमर्थाच्या कार्याशी, लिखाणाशी समरस होता यावे, त्यांच्या हृदयीची कळकळ, व्याकूळता जाणून घेण्यासाठी व तो काळ आपण निदान मनाने, बुद्धीने अनुभवावा म्हणून त्या काळात येऊन गेलेल्या प्रवाशांची प्रवासवर्णने, बखरी, इतिहासकारांचे संशोधन लिखाण या सर्व साहित्याचा अभ्यास करून देवांनी श्रीसमर्थकालीन व समर्थपूर्वकालीन देशस्थिती समजून घेतली. त्यांनी विशेष अभ्यास केलेले इतिहासकार, परदेशी प्रवासी, यांची नुसती यादी जरी बघितली, तरी थक्क व्हायला होत. नुकतच माझ्या वाचनात एक पुस्तक आलं, “Rebel Sultans : The Deccan from Khilji to Shivaji” – लेखक आहेत, श्री. मनू पिल्लई. तो संदर्भ इथे देण्याची दोन कारणं : एक म्हणजे, श्री. देवांनी उल्लेखलेले इतिहासकार व प्रवासवर्णनं त्या पुस्तकातही दाखले म्हणून उद्धृत केली आहेत आणि दुसरं, त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे श्री. देवांनीच या उल्हासात नमूद केल्याप्रमाणे ‘या प्रवाशांची तर धन्य आहे, यात शंकाच नाही, त्यांची प्रवासवर्णने आज माझ्या उपयोगी येत आहेत, हे ही ठीक. पण, पर्यायाने हेच प्रवासी बहुधा या राष्ट्राच्या अवनतीला कारणीभूत झाले असावेत का ?….. हे प्रवासी आपापल्या देशात परत गेले की, तिकडे या देशाच्या वैभवाची तसेच दुर्बलतेची, गुणांची आणि दोषांचीही वर्णने, मर्मस्थाने इथंभूत माहितीसकट लिहून प्रकाशित करीत ती युरोपमधील विविध भाषांमध्ये प्रकाशित, अनुवादित होत… या देशाचं बळ आणि मरण ही दोन्ही कशात आहेत, हे त्यांना कळून चुके. या ग्रंथांत तिकडच्या लोकांना, सरदार दरकदारांना प्रोत्साहनही असे आणि मार्गही सुचवलेले असत. (भारतात येण्याचे / आक्रमण करून पादाक्रांत करण्याचे)” आणि हाच विचार पिल्लई यांच्या पुस्तकातही आढळतो. म्हणजे, जो अंदाज, अनुमान देवांनी १९५० मध्ये मांडला, तोच २०२१ मध्येही मांडला गेला. यावरूनही श्री. देवांचा ऐतिहासिक लिखाणाचा अभ्यास, व्यासंग किती विस्तृत होता, त्यावरील चिंतन, त्या आधारित तर्क आणि अनुमान किती अचूक होते आणि अध्यात्माच्या मार्गावरील त्यांची दृष्टी किती चिकित्सक, अभ्यासक होती, हे लक्षात येते.
त्यांची इतिहासातील रुची, अध्यात्मिक, ऐतिहासिक दस्तऐवज जतन करण्याचं त्यांनी जाणलेलं महत्त्व याची परिणती म्हणजे देवांच्या पुढाकाराने त्यांच्या गावी धुळे येथे उभारण्यात आलेले राजवाडे इतिहास संशोधन केंद्र. इतिहासाचार्य राजवाडेंच्या साहचर्यातून देवांनी एकनाथपूर्वकालीन ज्ञानेश्वरी, तिच्या भाषेचे व्याकरण, ऐतिहासिक सूच्या, समर्थपूर्वकालीन काही काव्यरचना, ज्ञानेश्वरी कोश, इ.अभ्यासून छापली. व्यासंग तरी किती ! महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाचे केंद्र पुण्याहून धुळ्याला श्री. देवांमुळेच हलले, असे म्हणतात. १९२६ मध्ये इतिहासकार राजवाड्यांचे निधन झाल्यावर त्यांचे स्मारक म्हणून हे केंद्र देवांच्याच पुढाकाराने धुळे येथे उभे राहिले.
मी खरे म्हणजे अर्थशास्त्राची विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका. अर्थशास्त्रातच PhD केलेली. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक असणारा Research methodology पेपर शिकवणारी. संशोधनात त्या विषयावरील साहित्याचे अवलोकन / परामर्श – review of literature घेण्याची गरज, तो कसा घ्यावा, वगैरे आम्ही शिकवतो आणि दाखले देतो नेहमी पाश्चिमात्य लेखक, संशोधकांचे परंतु श्री. देवांनी त्यांच्या ‘श्रीसमर्थ अवतार’ या समर्थचरित्राच्या पहिल्या खंडात घेतलेल्या, समर्थवाङ्मयावर भाष्य करणाऱ्या ग्रंथांचा आणि ग्रंथकर्त्यांच्या लिखाणाचा परामर्श म्हणजे review of literature चा एक आदर्श नमुना म्हटलं पाहिजे आणि खर तर ज्या विद्यार्थ्यांना मराठी समजतं त्यांनी, मग ते कुठल्याही विषयात संशोधन करत असोत, पण अवश्य वाचावा असा आहे.
याहूनही अचंबित करणारी गोष्ट म्हणजे रामदासी संप्रदायाचे इतके भरीव कार्य, संशोधन, जतन, लिखाण, प्रसार, श्रीसमर्थांचे त्रिखंडी चरित्र, हे ‘सिद्ध’ असावे, यासाठी घेतलेले अपार परिश्रम! जिथे-जिथे रामदास राहिले, ध्यानधारणा केली, त्या सर्व निर्जन, अवघड ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या, तिथल्या घळी पालथ्या घातल्या. श्रीसमर्थांच्या ध्यानधारणेचे सर्वांत आवडते ठिकाण म्हणजे शिवथर घळ. ही घळ शंकर देवांनीच प्रथम शोधून काढली, असे म्हणतात. अशा अनेक घळी त्यांनी शोधल्या, झाडून साफ करून, जिथेजिथे रामदास स्वामी निश्चितपणे राहिले होते, असा ऐतिहासिक ठोस पुरावा होता, तिथेतिथे समर्थांचे स्मारक उभारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तो पूर्णपणे नाही पण बऱ्याच अंशी सफल झाला. समर्थांच्या जन्मगावी, मराठवाड्यातील जांब येथे श्रीसमर्थ मंदिर उभारण्यात देवांचा सिंहाचा वाटा होता. विचार करा, त्या काळी निजामाच्या राज्यात, जिथे जुन्या देवळांचीही धडगत नव्हती, तिथे मंदिर बांधायला शासनाची अनुमती मिळवणे किती दुरापास्त होते; परंतु ज्या ज्या पातळ्यांवर प्रयत्न करता आला, तसा करत, अखेर ही अनुमती त्यांनी मिळवली. या सर्व कार्यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी आसेतुहिमाचल आणि क्वेट्टापासून कलकत्त्यापर्यंत आगगाडी, बैलगाडी आणि प्रसंगी पायी प्रवास करून बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनतेचे व इतरांचेही सहाय्य्य मिळवले आणि तरीही हे सर्व कार्य म्हणजे शंकर देवांनी केलेल्या एकूण कार्याच्या दृष्टीने फक्त एक हिमनगाचे टोकच! हिमनगाचा जसा १/१० भागच फक्त पाण्यावर असतो आणि आपल्याला दिसतो पण त्याचा ९/१० भाग पाण्याखाली असतो, तद्वतच !
समर्थभक्ती हा देवांचा प्राण होता; परंतु, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रकार्य हा त्यांचा श्वास होता. विद्यार्थीदशेपासूनच ते लोकमान्य टिळकांच्या विचाराने भारावून गेले होते. पुढे शिक्षणासाठी पुण्याला गेल्यावर, त्यांचे महाविद्यालयीन आयुष्य लोकमान्यांच्या छायेत विकसित झाले, इतके की ते टिळकांचे अन्तेवासी -पट्टशिष्य म्हणून गणले जात. टिळकांच्या चळवळीची ओळख उत्तर महाराष्ट्राला करून देण्याचे, तिथे ती रुजवण्याचे आणि फोफावण्याचे श्रेय श्री. देवांचे आहे. म्हणूनच त्यांना खानदेशचे टिळक म्हणत.
विद्यार्थीदशेतच आपल्या काही सहाध्यायी आणि साथीदारांच्या मदतीने देवांनी सत्कार्योत्तेजक सभेची स्थापना केली आणि महाराष्ट्र वैदिक विद्यालयाची स्थापना, सार्वजनिक गणेशोत्सव, श्रीशिवजन्मोत्सव वगैरे कार्य धूमधडाक्याने नुसतेच सुरु नाही केले, तर सातत्याने आणि उपक्रमशीलतेने राबविले, त्यातून ज्ञानप्रबोधन, समाजप्रबोधन केले. लोकमान्यांनी सुरू केलेल्या साराबंदीच्या शेतकरी चळवळीचा संपूर्ण खानदेशभर त्यांनी इतका परिणामकारक प्रचार केला की, त्या चळवळीला मिळालेला जनाधार पाहून, तेथील युरोपीय जिल्हाधिकाऱ्याने वैतागून उद्गार काढले, “ह्या भागात ब्रिटिशांचे राज्य आहे की आणखी कोणाचे?” अशी नोंद श्री. अनंत भालचंद्र चितळे यांनी श्री. देवांच्या ‘समर्थहृदय’ या समर्थचरित्राच्या दुसऱ्या खंडाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने लिहिलेल्या श्री. देवांच्या परिचयात केली आहे.
१९१३ ते १९१८ या सहा वर्षांत नानासाहेब धुळे नगरपालिकेचे नगरसेवक होते.
श्री. देव हे काँग्रेसमधील लोकमान्यप्रणीत जहाल गटाचे सक्रिय कार्यकर्ते तर होतेच परंतु लोकमान्यांच्या पश्चात ते गांधीजींच्या चळवळीतही सहभागी झाले. खरेतर, त्यांचा पिंड तसा बलोपासकाचा ! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत सोसायटी आणि सुरवातीच्या मित्रमेळ्याला मार्गदर्शन करायला ते मधून-मधून नाशिकलाही जात असत; परंतु १९२० ला टिळकांच्या मृत्यूनंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याची सूत्र म. गांधींकडे आली, तेव्हा गांधींच्या नेतृत्वाखाली देवही त्यात सहभागी झाले; कारण त्यांचे अंतिम ध्येय हे भारतीय स्वातंत्र्याचे होते. तेव्हा भले आपली वैयक्तिक धारणा काहीही असो, परंतु शत्रूशी लढताना आम्ही ‘शंभर अधिक पाच’ या पांडवांच्या धोरणानुसार ब्रिटिशांविरुद्ध लढा चालू ठेवण्यासाठी देवांनी गांधींच्या नेतृत्वाखाली काम चालूच ठेवले. पण असे जरी असले तरी योग्य तिथे स्वतःचा करारीपणा आणि नम्रता यांचा सुरेख मेळ घालत स्वतः: चे स्वातंत्र्य मात्र राखले. म. गांधींचा १९२१ सालचा कौन्सिल (मुंबई इलाखा कायदे मंडळ) निवडणुकांवरील बहिष्कार देवांना मान्य नव्हता. टिळकवाद्यांचं मत होतं की, आपण कायद्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन देशहिताचे कायदे करण्यामध्ये सहभाग आणि प्रभाव राखला पाहिजे. तर, गांधींच्या ‘असहकार’ तत्त्वानुसार त्यांनी या निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. हा वाद तेव्हा ‘फेरवादी’ आणि ‘नाफेरवादी’ म्हणून गाजला होता. फेरवादी म्हणजे टिळकांच्या १९२० पर्यंतच्या धोरणात फेरबदल करणारे आणि नाफेरवादी म्हणजे असा फेरबदल मान्य नसणारे – थोडक्यात टिळकांच्या विचारसरणीचे देव अर्थातच ‘नाफेरवादी’. त्यांचं असं ठाम मत होत की, आपण कायदेमंडळात सामील होऊन जास्त प्रभावीपणे स्वातंत्र्यलढा पुढे नेऊ शकतो. तेव्हा म. गांधींच्या विरोधात जाऊन देवांनी निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत देव कमीत कमी निवडणूक खर्चात घवघवीत बहुमताने मुंबई इलाखा कायदे मंडळावर निवडून आले. ही देवांच्या खान्देशातील कामांची पावती होती. विधिमंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी त्यांचे कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडले. निःस्पृहता आणि जबाबदारीची भान आणि जाणीव इतकी, की प्रत्येक अधिवेशनानंतर ते अधिवेशनाची माहिती आणि अधिवेशन भत्त्यांचा हिशोब जाहीर सभेद्वारे जनतेला देत.
गांधींच्या मताविरुद्ध जाऊन स्वतःच्या मताशी प्रामाणिक राहणाऱ्या देवांनीच म. गांधींचा १९२८ चा खान्देश दौरा अगदी मिनिट अन् मिनिट सविस्तरपणे आखून यशस्वीपणे पार पाडला होता आणि गांधीजींची कौतुकाची पावतीही मिळवली. कदाचित नानासाहेब देव हे एकच व्यक्तिमत्त्व असे आहे, की ज्यांनी श्रद्धाभावाने लोकमान्यांना २४ वर्षे मानले व त्याच उमेदीत पुढे महात्मा गांधींचे नेतृत्वही स्वीकारले. केवळ अंतिम लक्ष्य देशाचे स्वातंत्र्य या कडे नजर ठेवून .
पुढे पुढे म्हणजे साधारण १९४० नंतर कॉंग्रेसच्या अति बोटचेपेपणाच्या धोरणाशी जमवून घेणं देवाना कठीण जाऊ लागल आणि त्यांनी सक्रिय राजकारणातला आपला सहभाग कमी केला.
असं म्हणतात की ,
‘शतेषु जायते शूरः, सहस्रेषु च पण्डितः l
वक्ता दशसहस्रेषु, दाता भवति वा न वा l l ‘
हे अस दहा हजारांत एक असण्याचं भाग्य देव याना लाभलं होतं. खरंतर महाराष्ट्राचं हे एक संचित आहे की, अनेक उत्तमोत्तम वक्त्यांची मांदियाळी आपल्याला लाभली. गेल्या शतकाच्या पूर्वार्धात देव अमोघ वाणीचे गाजलेले वक्ते होते. प्रसिद्ध पत्रकार श्री. पेंडसे यांनी म्हटल्याप्रमाणे “ओज आणि आर्जव, सौजन्य आणि शालीनता, कळकळ आणि आवेश, भाषेची प्रतिष्ठा आणि विचारांची ऋजुता, लाघव आणि करारीपणा अशा परस्पर विरोधाभासी गुणांचे मनोज्ञ एकत्रित दर्शन त्यांच्या वक्तृत्वात सापडते. ते फार नादमधुर आणि लयबद्ध वाक्ये उच्चारत.” १९४०-५० च्या दशकात श्री. पाटणकर लिखित एक पुस्तक प्रकाशित झाले होते, “मी व माझे वक्तृत्व”. यामध्ये महाराष्ट्रातील त्या वेळच्या अतिशय नावाजलेल्या, ओजस्वी, शैलीदार अभ्यासू वक्त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यापैकी एक होते, अर्थातच स्वा. सावरकर. या सगळ्या वक्त्यांना त्यांचा आवडता वक्ता कोण असा एक प्रश्न होता. (आजच्या शब्दांत सांगायचं तर rapid fire प्रश्न). तेव्हा सावरकर म्हणाले, “माझा सर्वांत आवडता वक्ता म्हणजे धुळ्याचे शंकर श्रीकृष्ण देव!
तर असे हे शंकर श्रीकृष्ण देव, महाराष्ट्राच्या जीवनातील लोकमान्य युगाची एक अनमोल देणगी. अशा ह्या ताकदीच्या बहुआयामी व्यक्तीचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची उद्योजकता. सांप्रदायिक वाङ्मयाची त्यांनी छाननी केलेल्या २६ हजार पृष्ठांच्या पुनर्मुद्रणासाठी तसेच इतिहासकार राजवाडेंच्यासह छाननी संशोधन केलेल्या एकनाथकालीन, समर्थपूर्वकालीन सर्व दस्तावेज पुनर्मुद्रित करण्यासाठी त्यांनी स्वतः:च आत्माराम नावाचा एक छापखाना सुरु करून, हयातभर चालवला. तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी धुळे येथे एक हातमाग केंद्र सुरु केले. काही काळ ते महाराष्ट्र खादी मंडळाचे अध्यक्षही होते आणि गांधीजींच्या प्रेरणेनुसार आणि धोरणानुसार खादी उद्योगाला सक्षम करण्यात पुढाकार घेतला.
खरंच, किती कर्तृत्ववान माणसे होती ही ! त्यांच्या कार्याची नुसती माहिती लिहिताना, वाचताना आपण थकतो, त्यांनी तर ही हिमालयाएवढी अनेक कार्य पार पाडली आणि हे सगळं करताना श्रीसमर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे त्यांची धारणा –
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे,
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’,
अशी होती.
देशकार्य हेच देवकार्य, आणि देवकार्य हेच राष्ट्रकार्य ! हाच अनुभव आपल्याला श्री. अरविंद घोष, स्वामी विवेकानंद, यांचे जीवनकार्य वाचताना येतो. भारताच्या प्रत्येक राज्याराज्यांत शंकर देवांसारखी अशी अनेक नररत्ने विखुरली आहेत…. नव्हे, आज दुर्दैवाने धुळीत पडली आहेत. आता आवश्यकता आहे, ही धूळ बाजूला करण्याची, जमीन थोडी खरवडण्याची, मग अशी अनेक रत्ने स्वयंप्रकाशाने आपल्यापुढचा मार्ग प्रशस्त करतील.
भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षात आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, एक स्वातंत्र्यलढा अजूनही बाकी आहे – आर्थिक स्वातंत्र्याचा, संपन्नतेचा, समर्थ भारताचा ! संपूर्ण विजय अजून मिळवायचा आहे. ‘शुभास्ते पन्थान: सन्तु!
या वर्षी श्री. शंकर देव यांची १५० वी जयंती आहे, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
– सुनीती नागपूरकर