News

बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ले म्हणजे हिंदू समाजाच्या निर्मुलनाचा योजनाबद्ध प्रयत्न – सहसरकार्यवाह अरूण कुमार

धारवाड, दि. २९ ऑक्टोबर : बांगलादेशात हिंदू समाजावर झालेले आक्रमण ही अचानक घडलेली घटना नाही. खोट्या बातमीच्या आधारावर सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा हिंदू समाजाच्या निर्मूलनाचा योजनाबद्ध प्रयत्न होता. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह अरुण कुमारजी यांनी रा.स्व. संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत व्यक्त केले. यावेळी बांगलादेशात हिंदुंवर झालेल्या नृशंस हल्ल्याच्या घटनेवर प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

अरुण कुमार यांनी धारवाड (कर्नाटक) येथे आयोजित रा.स्व. संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीविषयी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
प्रस्तावात हिंदुंवर झालेल्या हिंसक आक्रमणांवर खेद व्यक्त करण्यात आला आणि तेथील हिंदू अल्पसंख्यांकावर वारंवार होत असलेल्या क्रूर हिंसा आणि बांगलादेशाच्या व्यापक इस्लामीकरणाच्या जिहादी संघटनांच्या षडयंत्राचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

प्रस्तावात असे म्हटले आहे, की हिंदू समाजाला लक्ष्य करुन वारंवार होत असलेल्या हिंसेचा वास्तविक उद्देश बांगलादेशातून हिंदू समाजाचे संपूर्णपणे निर्मूलन करणे, हे आहे, परिणामी फाळणीच्या काळापासूनच हिंदू समाजाची लोकसंख्या निरंतर लोप पावत आहे. फाळणीच्या वेळी पूर्व बंगालमध्ये हिंदुंची लोकसंख्या जवळपास २८ टक्के होते, ती कमी होऊन आता जेमतेम ८ टक्के झाली आहे. जमात – ए – इस्लामी (बांगलादेश) सारख्या कट्टरपंथी इस्लामी समूहांद्वारा होत असलेल्या अत्याचारांमुळे फाळणीपासून, विशेषत: १९७१ च्या युद्धावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाजाला भारतात पलायन करावे लागले.

संघाने मानवाधिकाराच्या तथाकथित प्रहरी संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघाशी संबंधित संस्थांच्या मौनावर चिंता व्यक्त केली असून आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे की या हिंसेचा निषेध करण्यासाठी पुढे यावे. तसेच बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि अन्य अल्पसंख्यांक समाजाच्या बचाव व सुरक्षेसाठी आवाज उठवावा. बांगलादेश किंवा जगातील कोणत्याही अन्य भागात कट्टरपंथी इस्लामिक शक्तीचा उदय जगातील शांतताप्रिय देशांच्या लोकशाही व्यवस्था आणि मानवाधिकाराकरिता गंभीर धोका उत्पन्न करेल.

प्रस्तावात अत्याचारग्रस्त कुटुंबांच्या मदतीकरिता पुढे आलेल्या इस्कॉन, रामकृष्ण मिशन, भारत सेवाश्रम संघ, विश्व हिंदू परिषद तसेच अनेक हिंदू संघटना आदि संस्थांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यकारी मंडळाने भारत सरकारला निवेदन केले आहे, की उपलब्ध सर्व राजनैतिक माध्यमांचा उपयोग करुन बांगलादेशात होत असलेल्या आक्रमण आणि मानवाधिकारांच्या अध:पतनाविषयी जगभरातील हिंदू समाज आणि संस्था यांना असणाऱ्या काळजीच्या बाबतीत बांगलादेश सरकारला अवगत करावे, जेणेकरून तेथील हिंदू आणि बौद्ध समाजाची सुरक्षा सुनिश्चित होऊ शकेल.
श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानात धन मिळवणे हा संघाचा मुख्य उद्देश नव्हता. न्यासाच्या आवाहनाला नागरीक प्रतिसाद देतीलच,आंदोलनाप्रमाणेच या अभियानात संपूर्ण समाजाचा सहभाग असेल, त्यामुळे यावेळेससुद्धा समाजातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित केले गेले. देशातील ६.५ लाख (अंदाजित आकडा) गावांपैकी ५.३४ लाख गावांपर्यंत कार्यकर्ते पोहोचले, सर्व नगरांच्या सर्व वस्त्यांपर्यंत पोहोचले. अभियानामध्ये १२.७३ कोटी कुटुंबांपर्यंत कार्यकर्ते पोहोचले. अभियानात केवळ संघाच्या कार्यकर्त्यांनी काम केले असे नव्हे, तर समाजामध्ये स्वयंप्रेरणेने खूप मोठ्या संख्येने नागरीक जमले. अभियानात २५ ते ३० लाख महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे, कोरोनाकाळात आव्हानेसुद्धा वाढली होती. सर्व नागरिकांनी मिळून काम केले. अनेक स्वयंसेवक आमच्यासोबत जोडले गेले आणि संघासोबत काम करू इच्छित होते.त्यांनाया लोकांना स्थायी रूपात आपल्या कामाशी जोडावे, असा विचार मार्चच्या बैठकीत झाला होता. या बैठकीत कार्य विस्ताराच्या दृष्टीने याचीसुद्धा समीक्षा झाली. असेही ते म्हणले.


मार्च महिन्यातील बैठकीत या सर्वांना पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, समरसता, सामाजिक सद्भाव या कार्यासोबत जोडण्याविषयी विचार झाला होता. हे चारही समाजाचे उपक्रम होतील, यादृष्टीने काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते. आत्तापर्यंत झालेले प्रयत्न आणि अनुभवांची समीक्षा बैठकीत झाली आहे. तसेच, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त काय-काय करता येईल, आणि काय करायला हवे, याविषयी सुद्धा बैठकीत चर्चा आणि समीक्षा करण्यात आली आहे.
प्रतिनिधी सभा ही संघाची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. वर्षातून एक वेळा बैठक मार्चमध्ये होते. दुसरी संविधानिक संस्था ही, कार्यकारी मंडळ असून या मंडळाची बैठक आत्ता कर्नाटकातील धारवाड येथे सुरु आहे. मार्चमध्ये होणाऱ्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत वर्षभराचे कॅलेंडर बनवले जाते आणि अखिल भारतीय कार्यकर्त्यांचा प्रवाससुद्धा निश्चित करण्यात येतो. ऑक्टोबरच्या बैठकीत वर्षभरातील आत्तापर्यंतच्या कार्याची समीक्षा केली जाते.


यावेळी मंजूर करण्यात आलेले महत्त्वाचे प्रस्ताव


बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या इस्लामी आक्रमणाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये निषेध करण्यात आला. बैठकीत याविषयी प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
अखिल भारतीय कार्यकारी मंडळ बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हिंसक आक्रमणाबाबत खेद व्यक्त करीत आहे. तेथील हिंदू अल्पसंख्यांकांवर सतत होणारी क्रूर हिंसा आणि बांगलादेशाच्या व्यापक इस्लामीकरणाच्या जिहादी संघटनांच्या षड्यंत्रांचा तीव्र निषेध करत आहे.
कट्टरपंथी इस्लामिक शक्तींचा उदय शांतताप्रिय देशांच्या लोकशाही व्यवस्थेस गंभीर धोका.
संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत बांगलादेश हिंसेबद्दल निषेध प्रस्ताव मंजूर
निधी समर्पण अभियानात ५.३४ लाख गावांत १२.७३ कोटी कुटुंबांपर्यंत कार्यकर्ते पोहोचले.

Back to top button