अशी कुटं चड्डी अस्तीय व्हय !
असं म्हणून हसणारा सातवीतला मुलगा तिथल्या संघ स्वयंसेवका बरोबर गुरुजी जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी लातूरला येतो आणि बरीच मोठ्ठी मोठ्ठी दाढीमिशावली माणसं अशीच चड्डी घालतात हे पाहून हरकून जातो. छानसा कार्यक्रम बघतो आणि त्यावेळी पिशवीत ठेवलेली हाफ पॅंट घालतो. आता घातलेली हाफ पॅंट जन्मभर काढायची नाही अशी मनोमन ठरवून टाकतो.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नागरसोगा या लहानशा गावातील एक मुलगा ज्याला आपल्या शाळेच्या पाटी पेन्सिलीचा खर्च भागवण्यासाठी हॉटेलात काम करावं लागायचं. त्या दिवसभराच्या कामाचे त्याला दहा रुपये मिळायचे. गावातले दहावीचे शिक्षण संपले. पुढे औशाला जावून शिकण्याची ज्याची घरची आर्थिक स्थिति नसल्याने मध्येच शिक्षण थांबवावे लागले. ‘त्याच’ स्वयंसेवकच्या शब्दाखातर औरंगाबादमधील मोठमोठे डॉक्टर आपला सण, सुट्टी न बघता रुग्णाला बघायला धावत येतात. ही किमया आहे सुनील कोळी या कार्यकर्त्याची.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यानंतर ह्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात जो बदल झाला तो त्याच्या शब्दातून एकण्यासारखा आहे. शुद्ध प्रमाणभाषेला टेबलाच्या एका कोपर्यात ठेवून अस्सल मराठवाडी आणि तेही लातूरी लेहेजा ठेवून बोलायला लागला की समोरच्या माणसाच्या डोळ्यात हसता हसता कधी पाणी येईल हे सांगता येणार नाही. कारण त्याच्याकडे अनुभवच असे आहेत की अंगावर काटा येतो.
सुनीलच्या घरची अत्यंत गरीबी. संघाच्या शाखेत जायला लागल्यापासून मोठ्या लोकांशी कसं बोलावे हे समजायला लागले. हळूहळू तो गावातला प्रमुख कार्यकर्ता झाला. गावात नियमित ८०/८५ तरुणांची शाखा लागू लागली. गावात पहिल्यांदाच दसर्याचे संचलन निघाले त्यातील गणवेशधारी तरुण स्वयंसेवकांची संख्या अडीचशेच्या पुढे होती. उत्सवाला गावच्या सरपंचाला बोलावले होते. त्यांनी आल्या आल्या ध्वजाला आणि मुख्य शिक्षकाला प्रणाम केला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटले. नंतरच्या गप्पात कळले की सरपंच तृतीय वर्ष शिक्षित आहे. तळजाईच्या विराट सम्मेलनात जावून आलेले आहेत. पण मध्यंतरीच्या काळात त्यांच्या व त्यांच्या घरादारासाठी संघात जातो म्हणून बहिष्काराची भाषा बोलली गेली होती.
सुनीलने प्रचारकाची झोळी खांद्यावर घेतली. संघ रचनेतून त्याला रुग्णसेवेचे दायित्व मिळाले. लातूर सारख्या शहरात पुरेसा न रुळलेला सुनील थेट संभाजीनगर मध्ये आला आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयापासून सुरवात केली. रुग्ण असतात म्हणजे काय ? त्यांची नेमकी काय गरज असते ? त्यांना मदत करायची म्हणजे काय करायचे ? कामाला सुरवात झाली. पायाला भिंगरी लागली. त्याच्या बोलण्यातला ग्रामीण बाज खेड्यातुन येणार्या रुग्णांना आपलेसे करण्यासाठी महत्वाचा ठरला. हळूहळू शहरातल्या अन्य रुग्णालयात जायची गरज वाढली.
सुरवातीला सुनीलला उपेक्षा मिळाली. कोणी त्याला दलाल समजत, कोणी असाच पैसे घेवून काम करणारा समजत होते. पैसे न घेता, कुठलाही स्वार्थ न ठेवता रूग्णाला कोणी मदत करतोय हे लोकांच्या पचनीच पडत नव्हते.
शहरातल्या एका नामवंत रुग्णालयात आपल्या रूग्णाला मदत केली म्हणून, रुग्णाच्या नातेवाइकांनी सुनीलला पैसे देवू केले. त्याने नम्रपणे नाकारले. त्याची ही कृती पाहून त्याच रुग्णालयाच्या वरिष्ठांनी त्याला केबिन मध्ये बोलावून घेतले. त्याचे काम समजावून घेतले. केवळ संघाने सांगितले म्हणून ही व्यक्ती जिच्या घरची आर्थिक स्थिति फारशी बरी नसतांनाही एक पैशाचा मोह न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे काम करते हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत सन्मानाचा विषय ठरला.
आज सुनीलला त्या रुग्णालयात आणि तिथल्या कुठल्याही वरिष्ठ लोकांना भेटण्यासाठी वेळ मागून घ्यावी लागत नाही. हीच स्थिति इतर रुग्णालयांच्या बाबतीत झाली आहे. संभाजीनगर मधील सरकारी रुग्णालयात सुद्धा सुनील याच पद्धतीने काम करतो. तो तिथेही कुठल्याही विभागात मोकळेपणाने जावू शकतो. संपर्क आणि निस्वार्थ भावनेने जोडली गेलेली माणसे, स्टाफ, डॉक्टर्स सुनीलच्या एका हाकेवर रुग्णाच्या मदतीला तय्यार असतात.
मरणाच्या दारात गेलेल्या अनेक रुग्णांना सुनीलने योग्य मदत मिळवून देवून त्यांना डॉक्टरांच्या सहकार्याने पुनर्जन्म दिला आहे. त्याच्या या स्वभावामुळे अनेकांनी त्याला हजारो रुपये देवू केले आहेत पण तो मात्र त्या पैशांकडे वाळूनही पाहत नाही. अजून एक महत्वाचे म्हणजे तो आरोग्य सेवेच्या बाबतीत कुठलीही कसूर राहणार नाही यासाठी वेळी अवेळी धावपळ करतो पण रुग्णालय आणि रुग्ण यांच्या बिलाबाबतीत किंवा त्यांच्या आपापसातल्या आर्थिक व्यवहारात चुकूनही लक्ष घालत नाही. तो माझा विषय नाही असे ठामपणे सांगतो.
मागच्या आठवड्यात एका रूग्णाला मेंदू विकार तज्ञाची गरज होती. तो संबधित रुग्णालयात आला. तिथल्या स्टाफने सांगितले की आज सण आहे डॉक्टर आत्ताच त्यांच्या गावी गेले आहेत. सुनीलला हे समजले. त्याने तातडीने डॉक्टरांना फोन केला. गावच्या अर्ध्या वाटेवर असलेले ते शहरातील नामांकित न्यूरोसर्जन गाडी वळवून परत हॉस्पिटलला आले. सगळा स्टाफ आश्चर्य चकित झाला. डॉक्टरांनी रूग्णाला तपासले. त्यांनी सर्व परिस्थिति रुग्णाच्या नातेवाईकांना समजावून सांगितली. रुग्ण वाचण्याची शक्यता फक्त अर्धा टक्का आहे हेही सांगितले. तरीही नातेवाईकांच्या आग्रहाखातर त्यांनी तातडीने ऑपरेशन केले. दुसर्या दिवशी रुग्ण गेला. नातेवाईक दु:खी झाले. आठवडाभरानी ते आठ दहा जण परत आले. त्यांनी डॉक्टर कुठे आहे असे विचारले. स्टाफ जरा घाबरला. त्यांनी सुनीलला फोन केला. सुनील तात्काळ तिथे पोहोचला. त्याला घेवून सर्वजण डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांना पाहताच रुग्णाचे नातेवाईक भावुक झाले आणि त्यांनी डॉक्टरांचे पाय धरले. ते म्हणाले आमचा माणूस तर गेला पण तुम्ही जी धावपळ केली, जे प्रयत्न केले त्यासाठी आम्ही तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो.
डॉक्टरांचे डोळेही पाणावले. नातेवाईक गेल्यानंतर डॉक्टर सुनीलला म्हणाले. “रुग्ण बरा होऊन घरी जातो त्या बद्दल कधी कोणी धन्यवाद दिल्याचे आठवत नाही पण सुनील तुझ्यामुळे जी सेवेची संधी मिळाली त्याचे हे फळ आहे की, रुग्ण दगावल्या नंतरही मला कोणी धन्यवाद दिले आहेत.”
सुनीलला जवळ घेत ते पुढे म्हणाले “तू आणि तुझा संघ ग्रेट आहे.”
असे असंख्य ग्रेटनेस त्याच्या हृदयाच्या कप्प्यात त्याने जतन करून ठेवले आहेत.
मी सहज त्याचा फोटो घेण्यासाठी मोबाइल हातात घेतला तसा तो त्वरेने माझ्या समोरून पळून गेला.
- सुहास वैद्य यांच्या Fb पेजवरून साभार