News

महिला पोलीस इन्स्पेक्टरच्या कर्तव्यदक्षतेमुळे मिळाले जीवदान

चेन्नईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथे पूरमय परिस्थिती निर्माण झाली आहे.  परिणामी चेन्नईमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापैकीच एका ठिकाणी सुरु असलेल्या बचावकार्यात एका महिला पोलीस  इन्स्पेक्टरने कर्तव्यदक्षता दाखवत कशाचीही तमा न बाळगता संकटात सापडलेल्या एका व्यक्तीला खांद्यावर घेऊन रूग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. वेळेत रुग्णालयात पोहोचल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. संबंधीतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

या व्हिडिओमध्ये महिला पोलिस इन्स्पेक्टर राजेश्वरी या पूरग्रस्त भागामध्ये मदत कार्य करताना दिसत आहेत. मुसळधार पावसात एक व्यक्ती झाडाची फांदी डोक्यावर पडल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत पडली होती. याप्रसंगी पोलिस इन्स्पेक्टर राजेश्वरी  यांनी कसलाही बागुलबुवा न करता कमरेपर्यंत पाण्यातून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या आणि त्या व्यक्तीला आपल्या खांद्यावर ठेवून ऑटोरिक्षापर्यंत घेऊन गेल्या. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे त्या व्यक्तीला वेळेत रुग्णालयात नेता आले.  त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार करणे सोयीचे झाले.   

आपण जरी एक महिला असलो तरीही कर्तव्याने आपण पोलीस आहोत. जनतेचे रक्षण करणे, हीच आपली प्राथमिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी राजेश्वरी यांनी चोख निभावली. महिलांना कितीही जोखमीची जबाबदारी दिली तरीही ती यशस्वीपणे त्या निभावतात, हे पुन्हा एकदा राजेश्वरी यांच्यामुळे सिद्ध झाले.         

Back to top button