Opinion

“सर, आमच्या मिलिंद कडे लक्ष असू द्या”

त्या दिवशी संपर्कासाठी संत कबीर नगर सेवा वस्तीत गेलो होतो. महादेव गवई नावाचा कार्यकर्ता त्याचा फोटो स्टुडिओ आहे. तिथे काही महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर गप्पा माराव्यात असं ठरले. मी पोहचलो. ठरलेल्या वेळेला फारसे कुणी आले नव्हते. महादेवला कामाच्या गडबडीत फारसे निरोप देणे जमले नव्हते. माझ्या ओळखीचा विद्यार्थी भोसला मिलिटरी महाविद्यालय शिकणारा मिलिंद पाडेवार त्याच वस्तीत राहणारा होता.

मी मिलिंद आहे का? असं महादेवला विचारले. त्याने कुणाला तरी मिलिंदला बोलवायला पाठवले. मी वस्तीत आलोय हे ऐकून मिलिंद आला. त्याला मी सांगितले आज मी वस्तीत काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भेटायलाआलो होतो फारसे कुणी आले नाही म्हणून तूला निरोप पाठवला. त्याने सहजतेनेत्याच्या सात आठ मित्रांना माझ्याशी गप्पा मारण्यासाठी गोळा केले.

आम्ही फोटो स्टुडीओ मध्ये वरच्या भागात गोलाकार जेमतेम बसलो. सहज ओळख करून घ्यायला सुरुवात केली. कोण कोण कुठल्या कॉलेजला आणि कुठल्या वर्षात शिकत आहे? घरी कोण कोण असतं? आई वडील काय करतात? असं एक साधरण परिचय आपण करून घेत असतो तसा परिचय चाललेला होता. जवळपास सगळीच मुलं काम करत शिकणारी होती. आई वडील कुठे ना कुठे छोटे मोठे काम करणारी, धुणीभांडी करणारी होती, मोलमजुरी करणारी होती.

सगळ्यांची परिस्थिती तशी सहजासहजी चांगली म्हणावी अशी नव्हती. गप्पात विषय निघाला. संत कबीर नगर म्हटले की समाज आमच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहतो. वस्तीत दारिद्र्य आणि गुन्हेगारी असल्यामुळे अनेकदा पोलीस विनाकारण चौकशी करत असतात. भर शहराच्या उच्चभ्रू माणसांच्या मध्ये असलेली वस्ती पण मुख्य रस्त्यावरून ह्या वस्तीकडे जायला लागलो की सुरुवातीला अंधार लागतो. येथे जाणारा रस्ता भोसलाच्या मधून जातो.

मुलीना संध्याकाळी सात वाजले की अंधार पडला की फारशी बाहेर पडण्याची सोय नसते. येथील अनेक मुलं मुली भोसलात शिकतात. सगळी मुलं त्यांना खूप दिवस पाठपुरावा करून स्कॉलरशिप नाही मिळाली असे मला सांगत होती. मी म्हणालो योग्य ठिकाणी मी नक्की कानावर घालेन. एका विद्यार्थी संघटनेबरोबर त्यांची आंदोलनाची तयारी चालू होती. त्यात त्यांना फारशी आशा वाटत नव्हती.

आमच्या गप्पा संपल्या. मी त्यांना म्हटलो आपण कुणाच्या तरी घरी जावू. मुलं एकमेंकाकडे पहायला लागली. मला सुरुवातीला फारसे काही समजले नाही. मुलं नको म्हणत होती. मला नको म्हणण्याचे कारणही लक्षात येत नव्हते. मिलिंद मला म्हणाला सर अनेकांची वडील कामावरून दमून आले असतील. त्यातल्या काही जणांनी दारू घेतलेली असेल आणि रहाडा चालू असेल. लाजेखातर मुलं तुम्हाला नको म्हणताहेत. मीही हे ऐकल्यावर फारसा आग्रह धरला नाही. त्यांना कुठे माहित होते अशाच वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. मलाही त्यांची अडचण समजली.

शेवटी मिलिंदच्या घरी जायचं ठरले. तुमच्याशी मिलिंदचा परिचय करून द्यायचा राहिला. मिलिंद १० वी पासून अगदी बीकॉम होईपर्यंत ८० टक्के आसपास मार्क मिळून दरवर्षी पास होणारा. सगळे शिक्षण पार्ट टाईम जॉब करून शिकणारा. नम्र आणि हुशार मुलगा, आंबेडकरांवर श्रद्धा असलेला. घरी गेलो. १० बाय १५ ची खोली दोन भाग करून घरात रुपांतरी केलेली. चारी बाजूला पत्रा. खाली सारवायला ओलसर जमीन. वर एक छोटा बल्ब. मोठ्या तत्परतेने मला खाली बसायला लागू नये म्हणून मिलिंदने खुर्ची आणली. माझ्या चहासाठी शेजारून दुध आणले. मी नको म्हणत होतो. पण मला हा पाहुणचार नाकारायचा नव्हता मुळी. मिलिंदच्या वहिनीने चहा आणला. मिलिंदचे सर आपल्या घरी आले आहेत ह्याचा आनंद चेहऱ्यावर जाणवत होता. आईला बरं नव्हते. मी घराबाहेर पडता पडता विचारपूस केली. त्यांनी माझ्याकडे पाहिले हात जोडले आणि म्हणाल्या, “सर, आमच्या मिलिंद कडे लक्ष असू द्या”

क्षणभरासाठी माझे डोळे पाणावले. मी मन आणि मान खाली घालून बाहेर पडलो. आत खोलवर सहवेदना जागृत झाली होती. वस्तीतील अनेक डोळे माझ्याकडे एक अर्थाने अपेक्षेने पहात होते. मला भीती वाटली. आपल्याला हे पेलवणार का? संत कबीरनगर माझ्याशी बोलायला लागले होते. मिलिंदला पुस्तक घ्यायला पैसे नव्हते. त्याने मोठ्या संकोचाने मला अडचण सांगितली. मी म्हणालो व्यवस्था होईल काळजी करू नको. म्हणाला सर मी परत फेडेन. स्कॉलरशिप मिळाल्यावर.

संजय साळवे.

‪#‎गाभारा‬
‪#‎SanjaySalve‬

Back to top button