२६ नोव्हेंबर, संविधान सन्मान दिन
मंडळी, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेमध्ये संविधान अंगीकृत आणि अधिनियमित केले गेले. आपण भारतीयांनी संविधानाचा स्वीकार करून आज ७३ वर्ष झाली. या संविधानामुळे भारताला एक नवीन ओळख मिळाली. या मुळे भारताला समता, बंधुता हा सहजभाव मिळाला. विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास,उपासना यांचे स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्राची एकता आणि एकात्मता याची पायाभरणी केली गेली.
कोणत्याही देशाला, त्याच्या सार्वभौमत्वाला एक अधिष्ठान लागतं…. आपल्या देशाचा कारभार सुचारु पद्धतीने चालावा यासाठी जी तत्व, आचार आणि विचार पद्धती, निरनिराळ्या कार्यपध्दती, कायद्यांचा आधार, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये आणि बरंच काही…. हे सर्व या संविधानावर आधारित आहे. आपली राज्यपद्धती, त्यातील नियम, आचार पद्धती, नीतिमूल्ये, सामान्यांच्या हिताचे रक्षण, देशाचे संरक्षण, अर्थ समायोजन…. या सर्वांचा आधार असलेले हे म्हणजे संविधान. आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपले संविधान हे आपले पथदर्शक आहे असे म्हणण्याला प्रत्यवाय नाही.
आपली राज्यघटना/ संविधान हे जगातील एक उत्तम संविधान आहे असे मानले जाते. घटना समितीतील अनेक जणांचा अभ्यास आणि परिश्रम यास कारणीभूत आहेत…. आणि पू. डॉ बाबासाहेबांचा यात विशेष मोलाचा वाटा आहे. या ७१ वर्षांच्या वाटचालीत आपल्या देशाने बरेच चढ उतार पाहिले, अनुभवले. अनेकदा संकटही आली, प्रश्न उभे राहिले…. पण या संविधानानेच योग्य मार्ग दाखवला आणि आम्ही देश म्हणून तावून सुलाखून त्यातून बाहेरही पडलो.
खरं म्हणजे घटना/ संविधान हे प्रत्येक देशाच्या अंगभूत विचार, आचार आणि संस्कृती यांचे दर्शनच असते. त्या त्या वेळी देशाची असलेली भौगोलिक, सामाजिक, मानसिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती आणि देशाचा इतिहास आणि संस्कृती याचे दर्शन घडविणारे अधिष्ठान म्हणजे संविधान.
याचा देशाच्या सुचारु कारभाराशी संबंध असल्याने कालपरत्वे यात बदल होणे अपेक्षित आहे. आपल्या संविधानातही असे बदल झाले आहेत. १०१ वेळ घटना दुरुस्ती झाली आहे. पण असे बदल होत असले तरी यावर आपली श्रद्धा असणे आवश्यक आहे. याच आपल्या संविधानाच्या/ राज्यघटनेच्या आधारावर आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गणले जात आहोत.
दुर्दैवाने या घटनेची/ संविधानाची…. काही घराण्यांच्या स्वार्थापायी, राजकारण्यांच्या अवाजवी हव्यासापायी, सत्तेसाठी काहीही या भावनेपायी…. अनेकदा पायमल्ली झाली आहे. याची बरीच उदाहरणं देता येतील…. याचे आणीबाणी हुन अधिक चांगले उदाहरण कोणते असू शकेल!! संविधानाच्या नियमावली मधील पळवाटा शोधून या जनतेलाच उल्लू बनविणे हा जणू काही राजमार्गच झाला आहे.
सध्या या देशातील वातावरण गढूळ करण्याचा, या संविधानाच्या मूळ गाभ्यालाच आव्हान देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे…. तेही दुर्दैवाने याच संविधानाचे नाव घेऊन.
‘देश के तुकडे’ ‘देश की बरबादी तक’…. वगैरे नारे देणारी मंडळी, या देशात विविध आघाड्यांवर जातीचे राजकारण करून समाजात आणि देशात फूट पडणारी मंडळी…. आणि या सर्वांना पाठीशी घालणारी…. नव्हे त्यांचे समर्थन करणारी राजकीय मंडळी…..आणि प्रसार माध्यमेसुद्धा!!! आणि आश्चर्य म्हणजे हे समर्थन करताना जप मात्र संविधानाचा…. काय तर म्हणे संविधान धोक्यात आले आहे!!
या पेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?
सध्या देशात संविधानाच्या आधारे दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करून देशविरोधाला पाठबळ आणि आधार प्राप्त करून देण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. प्रसार माध्यमे, काही राजकीय पक्ष, तथाकथित सामाजिक संस्था, काही धार्मिक गट जे परकीय मदतीवर चालतात…. याला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत….. या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची आणि यावर जागृती करण्याची आवश्यकता आहे.
या संविधानाचा सर्वात मोठा दुरूपयोग करणारी जमात म्हणजे राजकारणी…. याबद्दल लिहावं तेव्हढे थोडेच. आजही आपल्या स्वतःच्या, घराण्याच्या स्वार्थापायी जेव्हा आपली विचारसरणी, तत्व आणि मुख्य म्हणजे या देशातील जनता यांचा विश्वास आणि अशा आकांक्षा यांनाच डावलून… नव्हे त्यांच्या भावनांचा अनादर आणि अपमान करून ज्या कोलांट्या उडया मारल्या जात आहेत…. ते ही संविधानाच्या नावाने गजर करून….. खरच दुर्दैवी, अनाकलनीय, धक्कादायक आणि अविश्वसनीय!! लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य….. पण सध्या चे हे प्रताप पाहता हे म्हणजे संधीसाधू लोकांनी स्वतःसाठी/ स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या मताचा आणि भावनांचा अनादर करून चालवलेली ठोकशाही आहे असेच म्हणावे लागेल. संविधान “दीन” होतेय की काय असं वातावरण आहे.
तरीही मंडळी या आपल्या संविधानाने जो मजबूत आधार दिला आहे त्याचा पाय एव्हढा भक्कम आहे की या अशा प्रसंगातून आजवर तावून सुलाखून आपण बाहेर पडलो आहोत….. आताही तसेच होईल. थोडा वेळ नक्की लागेल…. सत्याचाच विजय होतो हे आपले ब्रीद आहे ना? विश्वास मात्र पाहिजे.
संविधानाची सर्वात महत्वाची तत्व म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. मुलभूत अधिकार हा तर याचा गाभाच…… पण जेव्हा प्रत्येक जण आपल्या कर्तव्यांचे पालन करतो तेव्हा स्वाभाविक सर्वांच्या आणि आपल्याही अधिकाराचे संरक्षण होत असते. आजच्या अंधारात उद्याचा उषःकाल दडलेला असतो असे म्हणतात…..आणि आता तर अंधःकार दूर होण्याची सुचिन्ह दिसत आहेतच, तेव्हा उषःकालाच्या स्वागतासाठी सिद्ध व्हायलाच हव. आपण आपली कर्तव्य भावना जागृत ठेवून, समाजात जागृती निर्माण करण्याचे भान ठेवून, प्रसंगी अधिकारांसाठी संघर्ष करून आपली लोकशाही…. आपले संविधान आणि त्याचे पावित्र्य जपण्याचा, त्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न नक्की करूयात.
खरं म्हणजे आजच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासारखे बरेच काही आहे…. पण आज या निमित्त आपण विचार करायला हवा की हे संविधान माझे आणि माझ्या देशाचे आहे. त्याचा योग्य तो सन्मान आणि आदर आपण नाही करणार तर कोण करणार?
प्रश्न आहे की सन्मान करायचा म्हणजे काय?…… माझे व्यक्तिगत मत आहे की त्यासाठी:-
- आपल्या मातृभूमीच्या सर्वभौमत्वाचा अभिमान आणि आदर बाळगणे,
- या देशाची अखंडता आणि एकात्मता राहावी, टिकावी आणि वाढावी यासाठी व त्या अनुसार वर्तन
- या देशाची संस्कृती माझी आहे हा सहजभाव, त्याप्रती आदरभाव
- संविधानाने सांगितलेली आणि हा समाज व देश आणि इथले सर्वच माझे आहेत या भावनेतून निर्माण झालेली कर्तव्य भावना….. माझ्या कर्तव्याचे पालन ही प्राथमिकता….. प्रत्येकाने आपापल्या कर्तव्याचे पालन केले की स्वाभाविकपणे दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण आणि जपणूक होत असते……
आपणही जर विचार केलात तर अधिकही काही सुचेल.…..
गरज आहे ती याचे प्रत्यक्ष पालन आणि आचरण करण्याची. संविधानाचे प्रामाणिकपणे पालन आणि आचरण…. आणि त्याच्या नावाचा दुरुपयोग करून समाजात आणि देशात दुफळी माजविण्याचे काम करणाऱ्यांना ओळखून, वेळ प्रसंगी विरोध करून त्यांची जागा दाखवणे हेच आपले प्राथमिक कर्तव्य.
मंडळी, मी काही संविधानाचा तज्ञ नाही, परंतु एक सामान्य नागरिक म्हणून संविधानाप्रति आदरभाव मात्र जरूर आहे आणि त्यावर विश्वास ही!!…. आणि त्याच बरोबर सध्याच्या घटनांमुळे अस्वस्थही आहे. आपल्या मनात सुद्धा अशीच अस्वस्थता असेल…. बरोबर ना? हिच अस्वस्थता आपल्याला सकारात्मक बदल घडवून आणण्याची आणि त्यासाठी काही करण्याची प्रेरणा नक्कीच देईल असा विश्वास वाटतो.
संविधानाचा सन्मान हाच आपल्या सर्वांचा सन्मान
मित्रांनो, आपल्या सर्वांना संविधान सन्मान दिनाच्या शुभेछा
अरविंद जोशी