बाबासाहेबांचं बोलणं म्हणजेच विचार होते – राजदत्त
मुंबई,दि. ३० नोव्हेंबर : मुंबई मराठी साहित्य संघातर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी दादर येथील मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. पुरंदरे सभागृह येथे स्मृतीसभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. राजदत्त यांनी लहान असताना बाबासाहेबांचे झालेले प्रथम दर्शन, त्यांच्यासोबत केलेली सहल, इ. आठवणी सांगितल्या.
भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे विश्वस्त प्रदीप रावत, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, ठाकरसी महिला विद्यापीठाचे मराठी विभाग निवृत्त प्रमुख डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे, तसेच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे इत्यादी मान्यवर स्मृतिसभेस उपस्थित होते.
बाबासाहेबांनी केलेले शिवसृष्टि, रायगडाची प्रतिकृति, ‘जाणता राजा’ची नाट्यनिर्मिती, इ. चे प्रयोग रोमांचकारी होते, असे प्रतिपादन जगदीश कदम यांनी केले, तर डॉ. शिरीष देशपांडे म्हणाले की, स्थलांतराने राजदूत पाठवतात, तसे शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांना कालांतराने राजदूत म्हणून पाठवले होते.
प्रदीप रावत म्हणाले की, ‘रामचरित्राला जसे वाल्मिकी लाभले, कृष्णचरित्राला जसे व्यास लाभले, तसे शिवचरित्राला बाबासाहेब लाभले, बाबासाहेबांनी शिवचरित्र अजरामर केले’. ‘बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांना इतिहासाच्या सनावळींमधून बाहेर काढून घराघरात पोहोचवले’, असे साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष उषा तांबे म्हणाल्या.
सूत्रसंचालन करताना प्रमोद बापट यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी गो. नी. दांडेकर यांच्याकडून शिवचरित्रावर कादंबरी लिहिण्याचे वचन मागितले होते. तसेच, बाबासाहेब सुरुवातीला ऐतिहासिक तथ्यांवर आधारित; परंतु कठीण भाषेत लिखाण करत, परंतु नंतर त्यांनी त्यात सुधारणा करून, सामान्य लोकांना समजेल अशा ललित भाषेत आपले लिखाण केले.
साहित्य संघाचे पदाधिकारी अनिल गचके यांनी आभार प्रदर्शन केले.