श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ अक्षर, अविनाशी आणि जीवनव्यवहारात अतिशय उपयुक्त असा जीवनग्रंथ आहे . कौरव-पांडव युद्धात अर्जुनाने स्वजनांना समोर युद्धासाठी पाहून शस्त्र खाली ठेवले होते. तो द्विधा मन:स्थितीत अडकला होता. त्यावेळी तो श्रीकृष्णाला शरण गेला आणि युद्ध करावे की न करावे? यातील कोणता निर्णय धर्माच्या दृष्टीने योग्य होईल? याविषयी योग्य मार्गदर्शन करण्याची प्रार्थना केली.
शरणागती : ‘शरणागती’ म्हणजे ‘मी कर्ता’ ही भावना किंवा कर्माचा कर्तेपणा भगवंताकडे सोपविणे, ‘भगवंत कर्ता’ या भावनेने आपल्या वाट्याला आलेले कर्म कर्तव्यभावनेने करीत राहणे होय. भगवंताला शरणागत झाल्यावर भक्ताला आपल्या उद्धारासाठी काहीच करावे लागत नाही. भगवंतच त्याची सर्व जबाबदारी घेतात, ते स्वतःच भक्ताचा योगक्षेम चालवतात.
अर्जुनाच्या बाबतीतही हेच झाले. भगवंतांनी त्याला यज्ञच समजला जाणारा स्वधर्म – त्याचा क्षत्रिय धर्म अर्थात “स्वधर्माचरण – योग” समजावून सांगितला आणि युद्धासाठी प्रवृत्त केले.
स्वधर्म : स्वधर्म म्हणजे कर्तव्य, आपल्या वाट्याला आलेले कर्म! जे स्वत:साठी / समाजासाठी / राष्ट्रासाठी असेल. स्वधर्मात श्रेष्ठता किंवा कनिष्ठता असत नाही. जशी वयानुरूप कर्तव्ये बदलत जातात तसेच एकाचवेळी अनेक भूमिकांतून वावरणाऱ्या व्यक्तींचा स्वधर्म स्थळ, कालानुरूप, प्रसंगानुरुप वेगळा असतो.
स्वधर्माचरण योग : आपले कर्म निष्काम, निरपेक्ष भावनेने करणे म्हणजे स्वधर्म आणि स्वधर्म हेच साधन समजून साध्याची – परमात्मस्वरूपाची प्राप्ती करुन घेणे म्हणजे ‘स्वधर्माचरण योग’ होय.
गीताजयंतीच्या निमित्ताने भगवद्गगीतेचा विचार समाजातील सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीकोनातून करणे उचित होईल. गीतेतला अर्जुन सर्वसामान्य माणसांचेच प्रतिनिधित्व करतो कारण जीवनव्यवहारात प्रत्येकाच्या मनामनात हाच अर्जुन कुठेतरी दडलेला असतो, जीवनात अनेक प्रसंगी विचारांच्या द्वंद्वात अडकलेला असतो, योग्य निर्णय त्याला घेता येत नसतो. अशावेळी त्याला श्रीकृष्णाच्या उपदेशाची आवश्यकता असते. खरं पाहिलं तर, तो श्रीकृष्ण त्याच्यामध्येच दडलेला असतो, त्याला मार्गदर्शन करीत असतो; पण माणसाच्या ते लक्षातच येत नाही. देहबुद्धीत अडकल्यामुळे तो श्रीकृष्णाला आजूबाजूला शोधत राहतो. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय देहबुद्धीवरच आधारलेला होता. आत्मबुद्धीत स्थिर झालेल्या साधकाला मात्र तो अंतरीच गवसतो कारण त्याच्या सर्व वृत्ती स्वत:मधल्या परमेश्वराचा शोध घेत असतात, स्थूलाकडून सूक्ष्माकडे वळलेल्या असतात. तो भगवंताला संपूर्ण शरणागत झालेला असतो.
हे समजून घ्यायचे तर गीतेचा ‘अनुबंध चतुष्टय’ लक्षात घेणे आवश्यक आहे . १. ग्रंथाचा विषय : जिवाचे कल्याण करणारे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग; हे तीनही योग साधणारा स्वधर्माचरण योग २. प्रयोजन : जीवाचा उद्धार अर्थात परमात्मस्वरूपाची प्राप्ती३. अधिकारी : जीवाचा उद्धार / कल्याण करू इच्छिणारे सर्वचजण ४. विषय आणि ग्रंथ यांचा संबंध : परमात्मप्राप्तीसाठीच्या साधनमार्गाचे मार्गदर्शन – श्रीकृष्ण अर्जुन संवाद सर्वसाधारणपणे तत्त्वज्ञान, भगवंताचे दर्शन, मोक्षप्राप्ती असे शब्द वाचले की, सर्वसामान्यांना ते आपल्याला या जन्मात शक्य होईल किंवा नाही असा प्रश्न मनात येतो. पण गीतेचे चिंतन केल्यावर लक्षात येते की, भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश प्रत्येकासाठी आहे . त्या पद्धतीने चिंतन करून आपल्या वृत्तींमध्ये बदल घडवला तर गृहस्थाश्रमात सुद्धा योग्य साधनमार्गाने, स्वधर्माचरणाने या गोष्टी साध्य करता येऊ शकतात. परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आश्रम परिवर्तनाची गरज नाही. प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करुनही म्हणजेच ‘स्वधर्माचरण योग’ साधल्याने परमार्थ साध्य होऊ शकतो.
स्वधर्माचरण हे कर्म सोडून देण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ‘समत्वं योग उच्यते’ आणि ‘योग: कर्मसु कौशलम्’ हे गीतेतील अनेक सिद्धांतांपैकी दोन सिद्धांत! अर्थात, केलेल्या कर्माचे फळ मिळो वा न मिळो, मनाची निश्चळता न ढळू देता कर्मात समवृत्ती राखणे हाच योग आणि कर्मात योग असणे हेच कौशल्य! स्वधर्माचरण करताना ‘कर्तृत्वाचा अहंकार’ आणि ‘कर्मफलाची आसक्ती’ ही दोन कर्मबंधने टाळून केलेली कर्मे यज्ञार्थ म्हणजेच ती बंधनकारक होत नाहीत. अशा कर्मातील समत्वयोगाने आणि कर्मकौशल्याने मन वासना व अहंकाररहीत होते, शुद्ध व निर्विकार होते. मनुष्याला समचित्तत्व आणि समदृष्टी प्राप्त होते.
चार वर्ण, चार आश्रम आणि चतुर्विध पुरुषार्थ यानेच आपली व्यक्तिगत आणि सामाजिक बांधणी पूर्ण होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थापैकी आपल्या जीवनात मोक्ष हीच परमसिद्धी आहे. सर्वसामान्य मनुष्यही त्याचा अधिकारी आहे. चतुर्विध पुरुषार्थाचे शास्त्रीय स्वरुप समजावून घेऊन हे चारही पुरुषार्थ मनुष्याने प्राप्त करून घ्यावे, असे आपली भारतीय संस्कृती सांगते. त्यासाठी भगवंताची पूजा आपल्या स्वधर्माने प्राप्त झालेल्या कर्मानी अर्थात स्वधर्माचरणाने केली तर मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होते.यत: प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् । स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्द्ति मानव: ॥
– सौ. शिल्पा जितेंद्र शिवभक्त