छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – 4
गोवा म्हणजे गोमंतकभूमी! आजकाल गोवा म्हटले की डोळ्यासमोर अश्लीलतेने बरबटलेले समुद्रकिनारे, फेसाळणारे दारुचे ग्लास आणि रोमन कॅथाॅलिक चर्च डोळ्यासमोर येतात! ही गोव्याची वास्तविक प्रतिमा नव्हे. गोवा ही सातवाहन ,कदंब राजांनी नटवलेली भूमी आहे. छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती शंभुराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भुमी आहे.ही मंदिरांची भूमी आहे.
पोर्तुगिजांनी गोव्यावर आधिपत्य निर्माण केले. ख्रिस्ती धर्मगुरु नववा ग्रेगरी पोप याने नवीन ख्रिश्चन झालेले लोक धर्माचे नीट आचरण करतात की नाही ,यासाठी 1239 साली इन्क्विझिशन (पवित्र न्यायसभा) स्थापन केले. आणि त्यांच्याद्वारे लोकांचा अनन्वित छळ सुरु झाला.गोव्यातील नवख्रिश्चनांना शिकवण्यासाठी सेंट झेविअर भारतात आला ( 6 मे ,1452) आणि त्याने गोव्यात इन्क्विझिशन सुरु करण्याची मागणी केली. रिचर्ड बर्टनने तो ख्रिस्तीधर्म प्रसारासाठी कोणती साधने वापरत ती सांगितली आहेत. Fire & steel., the dungon & rank ,the rice pot & the rupee . (संदर्भ- ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा,डाॅ.सदाशिव शिवदे,पृष्ठ -389) पुढे पाल्बाव हा पाद्री गोव्यात आला आणि त्याने बाटवाबाटवीच्या छळाचा अतिरेक केला. हिंदुची मुर्तीपुजा बंद झाली.धार्मिक पुस्तके फाडली गेली,होमहवन करण्यास बंदी,अनाथ,पोरक्या मुलांचा ताबा घेऊन त्यांना ख्रिस्ती करण्यात आले. 1705 मध्ये तर हिंदुंना शेंडी ठेवायलाही कर देणे बंधनकारक झाले.
गोव्याच्या इतिहासातील ही मूक राहिलेली व्यथा आहे,ती व्यथा आपण समजुन घेतली पाहिजे.
बा.भ.बोरकर यांची “माझ्या गोव्याच्या भूमीत ही सुंदर कविता आहे,त्यात ते लिहितात.
माझ्या गोव्याच्या भूमीत
लाल माती,निळे पाणी
खोल आरक्त घावात
शुध्द वेदनांची गाणी
हे खोल आरक्त घाव परकीय सत्तांनी गोव्याला दिले होते.हिंदुंची मंदिरे पोर्तुगिजांनी पाडुन टाकली. साष्टीमध्ये रायतूरच्या चर्चमध्ये असलेल्या किल्लेदाराच्या थडग्यावर स्पष्ट लिहीलेले आहे “रायतूरचा किल्लेदार दि योग रुद्रीगिश,ज्याने ह्या प्रांतातील सारी हिंदु मंदिरे पाडून टाकली होती, त्याची ही कबर आहे ( 21 एप्रिल 1667)
आल्फान्सो अल्बुकर्क याने श्री सप्तकोटेश्वराचे देऊळ पाडून तेथे चर्च उभे केले. श्री सप्तकोटेश्वर हे कदंब घराण्याचे राजदैवत होते. पुढे छत्रपती शिवाजीमहाराजांनी गोव्यावर दुसरी स्वारी केली,त्यावेळी त्यांनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार केला. तेथे एक शिलालेख कोरला
श्रीसप्तकोटीश शके 1590 कीलकाब्दे
कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ:l
मुस्लिम आणि पोर्तुगिज या परकीय मुस्लिम सत्तांनी श्रीसप्तकोटेश्वराचे प्राचीन मंदिर अनेकवेळा उध्वस्त केले होते. श्री सप्तकोटेश्वर हे राजदैवत,त्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी या मंदिराचा जीर्णोध्दार करत आपल्या हिंदु अस्मितेचा परिचय करुन दिला.
जिथे जिथे परकीय आक्रमकांनी आपली मंदिरे पाडली,तिथे तिथे ती पुन्हा उभारली पाहिजेत.त्यासाठी सर्व भारतीयांनी शिवरायांची प्रेरणा घेत एकत्र येण्याची गरज आहे.
- रवींद्र गणेश सासमकर