
छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – 10
छत्रपती शिवाजीमहाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदुचे स्वराज्य! म्हणूनच महाराजांविषयी म्हटले जाते
या भूमंडळाचे ठायी lधर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्रधर्म राहिला काही l तुम्हा कारणे ll
समाजात फूट पाडणारी काही मंडळी शिवाजीमहाराज आणि हिंदुधर्माचा काहीही संबंध नसल्याचा अपप्रचार करतात. समकालीन संदर्भ आणि पुरावे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की शिवाजीमहाराज हे हिंदुधर्माभिमानी होते. आणि त्यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी मोठे कार्य केले. राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ.शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय,त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात “हिंदुसेनाधिपती” असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकाॅर्ड राजापुर)
छत्रपती शिवाजीमहाराजांनी गोव्यावरती 1667 मध्ये दोन मोहीमा काढल्या.गोव्याचा व्हाॅईसरायॅ कोंदी द सां व्हिन्सेंत याने असा हुकूम काढला होता की, गोव्यात फक्त रोमन कॅथाॅलिक ख्रिस्ती लोक राहतील. गोव्यात बारदेशात सात हजार हिंदुपैकी चार हजार लोक बाटवले गेले होते.गोव्यातील सामान्य जनतेने आपली ही समस्या शिवाजीमहाराजांना सांगितली.महाराजांनी लगेच गोव्यावर आक्रमण करुन तेथील 1500 लोकांना कैद केले. असा दणका पोर्तुगिजांना बसताच त्यांनी काढलेला हुकुम मागे घेतला. यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचा एक वकील ओल्ड गोव्यात होता,त्याने 30 नोव्हेंबर 1667 रोजी पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला कळवले की “गोव्यात हिंदुचा छळ झाल्यामुळे शिवाजीने गोव्यावर स्वारी केली”
छत्रपति शंभुराजांच्या जीवनातही आपल्याला हिंदुत्वाचा अभिमान दिसुन येतो. 24 आॅगस्ट 1680 रोजी छ.शंभूराजांनी बाकरेशास्त्री यांना जे दानपत्र दिले,त्यात ते आपल्या आजोबांचा म्हणजेच शाहजीराजांचा उल्लेख “हिंदुधर्मजीर्णोध्दारक” असा करतात.
दि.25 नोव्हेंबर 1949 रोजी घटनासमितीतील शेवटच्या भाषणात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते “शिवाजीमहाराज हे हिंदुच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते”
महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांवर एक प्रदीर्घ पोवाडा लिहीला ,त्यात ते लिहीतात
“मोठ्या युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा
रोविला झेंडा हिंदुंचा ll
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या लेखनातूनही शिवाजीमहाराज आणि हिंदुधर्म यांचा संबंध आपल्या लक्षात येईल.
सध्या छत्रपती शिवाजीमहाराजांना हिंदुत्वापासुन तोडण्याचे षडयंत्र काही लोक करत नाही,त्यासाठी खोटेनाटे दावे केले जातात,त्याला कसलाही पुरावा नसतो. वरील सर्व समकालीन संदर्भ आणि पुरावे पाहीले तर आपल्या लक्षात येईल की छत्रपती शिवरायांना हिंदुधर्माचा किती अभिमान आणी काळजीही होती.
आम्ही आमच्या धर्माचा अभिमान बाळगतो याचा अर्थ दुसर्याा धर्माचा द्वेष करतो असा होत नाही,दुर्देवाने आज हिंदु म्हटले की काही लोकांना पोटशूळ उठतो. हिंदुत्व या देशाची जीवनपध्दती आहे,असे आपल्या सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटले आहे. त्यामुळे हिंदु असणे हा अभिमानाचा विषय आहे. तो अभिमान आम्हाला शिवछत्रपतींनी दिला आहे.
- रवींद्र गणेश सासमकर