छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – 13
आपल्या प्राचीन संस्कृतीने जसा मानवाच्या कल्याणाचा विचार केला तसा पशु,पक्षी ,वृक्षवल्ली आणि जीवजंंतुंच्याही कल्याणाचा विचार केला. जगभर माणुस हा ह्या पृथ्वीचा स्वामी असून त्या पृथ्वीचा हवा तसा उपभोग घेऊ शकतो. असा पाश्चिमात्य विचार आहे,परंतु मानवाप्रमाणे या चराचर जगतावर अन्य सजीवांचाही आधिकार आहे,अशी आपली संस्कृती सांगते. वेद,उपनिषदे ,रामायण-महाभारत या ग्रंथातही या विचारांचे प्रतिबिंब असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील जगदगुरु संत तुकोबाराय लिहितात,
वृक्षवल्ली आम्हा l सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे lआळविती ll
छत्रपति शिवाजीमहाराजांनीही याच विचारांचे अनुसरण केले. झाडांच्या काळजीसंदर्भात त्यांचे एक पत्र उपलब्ध आहे.त्या पत्रात महाराज म्हणतात
‘आरमारास तख्ते ,सोट, डोलाच्या काठ्या,आदिकरून थोर लाकूड असावे लागते.
ते आपल्या अरण्यामध्ये सागवानादि वृक्ष आहेत त्यांचे जे हुजूर लेहून परवानगीने तोडून न्यावे.
याविरहीत जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे.
स्वराज्यातील फणस,आंबे आदिकरून हेहि लाकडे आरमाराचे प्रयोजनाची.
परंतु त्यास हात लाऊ न द्यावा.
काय म्हणोन,की ही झाडे वर्षा दो वर्षाने होतात यैसे नाही.
रयतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविली ती झाडे तोडलियावरी त्यांचे दुःखास पारावर काये?
येकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारासहित स्वल्पकाले बुडोन नाहिसे होते.
किंबहुना धण्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो.या वृक्षांच्या अभावें हानीही होते.
याकरितां हे गोष्ट सर्वथा होऊ द्यावी.
कदाचित यखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल,तरी त्याचे धण्यास राजी करून त्याचे संतोषे तोडून न्यावे.
बलात्कार सर्वथा न करावा.’
शिवाजी महाराजांचे हे आज्ञापत्र त्यांच्या आदर्श प्रशासनाची साक्ष देणारे आहे. महाराज आपल्या प्रजेची व त्यांनी लावलेल्या वृक्षांची, पर्यावरणाची किती काळजी करायचे हे या पत्रात दिसून येते. छत्रपति शिवाजीमहाराजांच्या आज्ञापत्रातून राज्याच्या विकासासाठी पर्यावरण, वृक्षसंवर्धनाचे महत्व अधोरेखित होते.
महाराजांचा हाच विचार आपण सर्वांनी पुढे नेण्याचा संकल्प केला पाहिजे .वृक्षांची जबाबदारी घेणे त्यांचे संगोपन करणे पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे.
- रवींद्र गणेश सासमकर