Opinion

वास्तवात आपणच आपल्या पाण्यातील प्रदूषण वाढवले आहे

सामाजिक माध्यम तंत्र म्हणून जसे विकसित होत गेले तसे त्याभॊवती लोकांचा अधिक वेळ वाढत गेला. जगाच्या बरोबरीने अद्यावत राहण्याची आवश्यकता वाटल्याने सुरुवातीला त्याच्याभोवती आपण गुंफलो गेलो. वेगाने माणसांशी संवाद साधण्याची गरज आणि वेग आपण टिकवून ठेवण्यासाठी धडपड करत होतो. आपण कुठे मागे पडलो नाही तर नाही ना अशी शंका वारंवार आपल्या मनाला आपण विचारत होतो. या सगळ्या गोंधळात आपण नेमकी काय हरवले आहे हेच अजून कुणाच्या लक्षात फारसे आले नाही वाटते. कधी कधी काही गोष्टी कळतात पण ते वळत नाही.

तरुणाईच्या क्रियाशीलतेला सर्वात जास्त मोठे आव्हान आज काय असेल तर सामाजिक माध्यमांचा अत्याधिक होणारा वापर. पराभूत मानसिकतेत तासनतास मोबाईलशी चाळा करणारी बोटे एक वेगळ्याच प्रकारची कौटुंबिक आव्हाने आपल्या समोर येऊ पाहताहेत. हळूहळू तंत्रज्ञानाने आपले जग विस्तारायला हवे होते पण गेम्सचं, ऑनलाईन गप्पांच्या भोवती एक विचित्र जाळे तयार झाले. अनेक अनावश्यक असलेल्या गोष्टींचा उदोउदो आपण करायला लागलो. एकेक करत एकेक पक्षी या जाळ्यात अडकला. आणि सामाजिक माध्यमांच्या आधारे ज्यांना शिकार करायची त्यांच्यासाठी या गोष्टी एकदम सोप्या झाल्या.

जग कुठे चालले आहे असे म्हणत आपण या धावणारे कळतनकळत या विषाचे समीकरण आपण व्यक्ती, कुटुंब, संस्था आणि संघटना यांच्याभोवती तयार केले. दूरवरची माणसे एकत्र करण्याची नादात शेजारधर्म विसरलो. भविष्यात याचे होणारे दूरगामी परिणाम फारसे चांगले नक्की नाहीत. या सामाजिक माध्यमांच्या पाण्यातून मासा बाहेर पडला तर जणू काही त्याला जगणं असह्य होईल अशी स्थिती आहे. वास्तवात आपणच आपल्या पाण्यातील प्रदूषण वाढवले आहे. माध्यमांचा चेहरामोहरा बदलणारी हे तंत्र पाने उलगडत जाण्याची सवय घालवून बसली आहेत.

गोष्ट इथेच संपत नाही. तिचा खरा अर्थ असा आहे आपण सामाजिक माध्यमांच्या वापरावर इतका पराकोटीचा विश्वास ठेवत गेलो आता त्याच्याशिवाय सुरांची, शब्दांची संगत कमी होत गेली. त्यातल्या आवड आणि निवडीच्या पलीकडे समोर जे जे काही येईल ते आपण स्वीकारत चाललो आहोत. सामाजिक आंदोलनांना चुकीच्या मार्गाने खतपाणी घालणारी सामाजिक माध्यमांचे आव्हान एव्हाना आपल्या लक्षात आहे. कट्टे एकमेंकाबरोबर गप्पा मारण्यासाठी नसून एकत्र मोबाईल मध्ये डोकवण्यासाठी गल्लोगल्ली आपल्याला आढळतात. कधी नव्हे लहान मुलांची आता सोशल मीडियातील फेसबुक, इंस्टाग्राम मधील वाढती अकाउंट्स नजरेला पडताहेत . साधा १५ ओळीचा मनाने विचार करून निबंध लिहण्याची अडचण आहे.

अर्थ असलेल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला उभ्या राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सुरक्षेची वेगळी आव्हाने सामाजिक माध्यमांच्या वापरातून समोर येताहेत. आपला मोबाईल नंबर इतका सार्वजनिक होऊ पाहतो आहे त्यावर येणारे प्रलोभने यापासून सावध राहायला हवे. आपण लोकशाही मूल्यांशी बांधिलकी मानणारे तळागाळातील घटकांच्या भोवती एक मोठा विळखा तयार होताना पाहतो आहे. कधी नव्हे ते अस्मितेची, जातीची, वैचारिक विरोधाची अणकुचीदार टोके ही समाज माध्यमांच्या संवादातून आपण तयार करतो आहोत.

मानवी आयुष्यात सगळे काही तंत्रज्ञानाचे तांत्रिक नसते त्यात माणूसपणाच्या खुणा असतात. भक्ती, ज्ञान आणि कर्म या त्रिसूत्रीवर भारतीय समाज हा जोडला गेलेला आहे. त्याला आभासी जगात एकत्र आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आहोत. त्या ऐवजी छोटी छोटी कौटुंबिक एकत्रीकरण सुद्धा अनेक भेडसावणाऱ्या समस्यांची, प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मदत करणारे आहे. समतेचा, समरसतेचा विषय हा कुटुंबप्रबोधनाशी जोडलेला आहे.

मुळातच आपल्याला समाज म्हणून काही गोष्टी टिकवून ठेवायच्या आहेत याची जबाबदारी मोठी आहे. काळाच्या ओघात त्या वाहून जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अदृश्य स्वरूपातील संकट याला कोरोनाच्या रूपाने सामोरे गेलो आहोत . त्याची लस ही निश्चित परिणामकारक ठरेल. या काळात आपण समाजात मुक्तपणे वावर करू शकलो नाही त्याचबरोबर सामाजिक माध्यमांच्या वापरातून होणारे मानसिक आव्हाने या दुहेरी संकटाशी आपली गाठ आहे.

पूर्ववत होण्यासाठी जी जी म्हणून सकारत्मक पावले आपल्याला उचलावी लागतील ती वेगाने उचलायला हवी आहेत. तरुणाईच्या वयोगटाबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या वयोगटात सुद्धा निखळ, नैसर्गिक निरागसपणा हा सामाजिक माध्यमांच्या वापराने प्रश्चचिन्ह निर्माण करणारा आहे. भविष्याचे वस्र विणत असताना भारतीय समाजाच्या संस्कृतीचा, मूल्यांच्या आणि परंपरांचा पराभव या अतिरिक्त सामाजिक माध्यमांच्या आहारी गेलेल्या आभासी तंत्रज्ञानामुळे आपल्या वाटेला येऊ नये हीच अपेक्षा. आधीच समाजाच्या उभ्या आडव्या रेषा मूळ भारतीय मातीत न तयार झालेल्या उत्तराने अधिक ठळक होताना आपल्याला दिसताहेत. जीवनशैलीच्या आणि विकासाच्या व्यक्ती, कुटुंब, समाज आणि सृष्टी म्हणून असलेल्या एकात्म संकल्पना जपण्याची मोठी गरज आहे.

संजय साळवे
#पर्यय
#SanjaySalve

Back to top button