OpinionRSS

षष्ट्यब्दीपूर्ती स्मृती मंदिराची

भारतातल्या एका महत्त्वाच्या घटनेला दि. ५ एप्रिल २०२२ रोजी ६० वर्षे पूर्ण झाली. ५ एप्रिल १९६२ ची ही घटना. नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील स्मृती मंदिराचे उद्घाटन ही ती घटना. रेशीमबागेतील हे स्मृती मंदिर म्हणजे, रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीवर बांधलेले मंदिर. हां, हे मंदिर असले तरी ते इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. तिथे डॉ. हेडगेवार यांच्या समाधीवर किंवा पूर्णाकृती पुतळ्यावर फुले वाहिली जातात किंवा हार घातले जातात, पण ते श्रद्धा, आदर यापोटी. हार, फुले वाहून आपल्याला काही मिळावं ही प्रार्थना तिथे होत नाही. तिथे पूजा साहित्याची दुकाने नाहीत. किंवा डॉ. हेडगेवार यांच्या आरत्या, स्तोत्रे, मंत्र, जप, त्रिकाळ पूजा, नैवेद्य, प्रसाद; असे काहीही नाही. कसलीही देवाणघेवाण न करणारे हे मंदिर आहे. इथे आहे तो केवळ भाव. अशा या मंदिराला आज ६० वर्षे पूर्ण झाली.

डॉ. हेडगेवार यांनी २१ जून १९४० रोजी या जगाचा निरोप घेतला. त्याच दिवशी त्यांच्यावर या स्मृती मंदिराच्या जागीच अंतिम संस्कार करण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी समाधीचा एक चौथरा, त्यावर एक तुळशी वृंदावन एवढेच होते. साधारण आठेक वर्ष ही समाधी तशीच होती. अशातच १९४८ साली संघावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी पसरवण्यात आलेल्या संघविरोधी भावनांच्या आवेगात या समाधीची मोडतोड करण्यात आली होती. संघावरील किटाळ दूर झाल्यावर पुन्हा एकदा समाधी व्यवस्थित करण्यात आली आणि त्यावर एक झोपडी तयार करून झोपडीवर वेली सोडण्यात आल्या. १९४९ पासून डॉ. हेडगेवार यांची ही समाधी त्या झोपडीत होती.

साधारण १९५५ च्या सुमारास समाधी अधिक बंदिस्त असावी आणि ऊन, वारा, पाऊस यापासून सुरक्षित राहावी असा विचार पुढे आला. त्यानुसार १९५६ च्या ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष काही कल्पना सुचवण्यात आल्या. मुंबईचे वास्तू विशारद श्री. दीक्षित यांना हे काम सोपवले गेले. त्यांनी बराच अभ्यास करून १९५६ च्या ऑक्टोबर महिन्यात स्मृती मंदिराचे साधारण चित्र तयार केले. त्यासोबतच पाच गोष्टी निश्चित केल्या – १) मूळ समाधी स्थानात बदल करायचा नाही, २) समाधीभोवती मजबूत खोली तयार करून त्याच्या वर डॉ. हेडगेवार यांचा अर्धपुतळा बसवायचा, ३) वास्तू दगडाचीच बनवायची, ४) वाजवी सौष्ठव आणि नक्षीकाम करून आवश्यक तेवढाच खर्च करायचा, ५) मंदिराची रचना भारतीय पद्धतीची असावी आणि शक्यतो स्वदेशी सामानाचाच वापर करायचा.

त्यानंतर मंदिराच्या दगडाचा शोध सुरू झाला. प्रथम नागपूरच्या आजूबाजूलाच शोध घेण्यात आला. पण तो चालणार नाही असा निर्णय झाला. नंतर दक्षिणेत शोध घेण्यात आला. ते दगडही नापास करण्यात आले. अखेरीस खालच्या मजल्यासाठी महाराष्ट्रातला काळा दगड आणि वरच्या मजल्यास कळसापर्यंत राजस्थानच्या जोधपूरचा ‘चितर पत्थर’ वापरण्याचा निर्णय झाला. ऑक्टोबर १९५६ मध्ये नकाशे तयार झाले आणि मुंबईचे नानाभाई गोरेगावकर यांच्याकडून डॉ. हेडगेवार यांचा ब्रॉन्झचा अर्धपुतळा तयार करून घेण्याचे ठरले.

काळा दगड आणण्यासाठी प्रत्यक्षात नाशिक, मनमाड, सांगली इथे गेल्यानंतर मात्र ते दगड कमी टिकाऊ वाटल्याने आणि कामासाठी भगराळ वाटल्याने पसंत पडले नाहीत. या शोधात असतानाच मनमाडच्या एका कारागिराने सांगितले की, तलवाडे गावाचा दगड उत्तम असून तुमच्या कामाचा आहे. तलवाडे हे गाव औरंगाबाद नांदगाव मार्गावर आहे. हा दगड तज्ज्ञांना सगळ्याच दृष्टीने पसंत पडला. त्यानंतर पुण्याचे एक आर्किटेक्त श्री. आपटे यांनी सुबक दर्शनी चित्र तयार करून दिले. तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी काही कल्पना त्या चित्रावर स्वतः चितारून दाखवल्या. स्मृती मंदिराच्या तोरणांची धनुष्याकृती ही त्यांचीच कल्पना.

त्यानंतर तेव्हाचे केंद्रीय कार्यालय प्रमुख पांडुरंगपंत क्षीरसागर, श्री. मोरोपंत पिंगळे, श्री. बाबासाहेब टालाटुले, इंजिनियर कानविंदे, मिस्त्री अहिरराव, वास्तूकलाकार मनोहर इंदापवार, वसंतराव जोशी; या सगळ्या नागपूरच्या मंडळींनी कामाचा भार उचलला आणि काम झपाट्याने सुरू झाले. याच वेळी डॉ. हेडगेवार स्मारक समितीची स्थापना करण्यात आली आणि १९५९ च्या वर्षप्रतिपदेला गोळवलकर गुरुजींच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. १ मे १९५९ रोजी पाया खोदण्याचे काम सुरू झाले. ऑगस्ट अखेरपर्यंत पायाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर १९६० च्या जानेवारीत खालील मजल्याच्या तलवाड्याचा काळा दगड बसवण्याचे काम सुरू झाले.

खालच्या मजल्याचे काम मार्गी लागल्यानंतर वरच्या कामाची जुळवाजुळव सुरू झाली. त्यात जोधपूरचा चितर पत्थर, जाळीसाठी आग्र्याचा लाल दगड, भिंतीच्या आतील बाजूस आणि खाली अंथरण्यासाठी मकराण्याचा संगमरवर वापरण्याचे निश्चित झाले. काळ्या दगडाचे काम करणारे लोक चितर दगडाचे काम करायला तयार नव्हते. त्यांना त्या कामाचा अनुभवही नव्हता. मग चितर दगडाचे काम करणाऱ्या कारागिरांचा शोध सुरू झाला. तेव्हा राजस्थानातीलच हकीमभाई सापडले. पुष्कळ जैन मंदिरांची कामेही त्यांनी केली होती. २१ डिसेंबर १९५९ रोजी हकीमभाईंशी कामाचा करार करण्यात आला. जोधपूरला दगड खरेदी करण्यापासून तर नागपूरला स्मृती मंदिराला तो बसवण्यापर्यंत सगळी कामे त्यांनी केली.

४५ फूट उंच व १२०० चौरस फुटाच्या या मंदिरात खालच्या मजल्यावर डॉ. हेडगेवार यांची समाधी आहे. पूर्वीच्या जुन्या समाधीला संगमरवरी दगडांचे आवरण करण्यात आलेले आहे. या आवरणातच; हिमालयातील कांगडा, जैसलमेरचा पिवळा संगमरवर, बडोद्याचा हिरवा दगड, म्हैसूरच्या चामुंडा टेकडीवरील ग्रॅनाईटचा लाल दगड, मकराण्याचा पांढरा शुभ्र दगड; यांच्या छोट्या छोट्या पानांची माळ सजवली आहे. चारही बाजूंनी समाधीचे दर्शन घेता येते. समाधीभोवती प्रदक्षिणामार्गही आहे. मंदिराच्या शिखराची रचना भारतीय परंपरेनुसार आहे. एक कमळाची कळी, त्यावर घट व त्यावर कलश अशी ही रचना आहे.

पहिल्यांदा डॉ. हेडगेवार यांचा अर्धपुतळा बसवावा असे ठरले होते पण मंदिर आकार घेऊ लागले तसे पुतळा पूर्णाकृती असावा असे सगळ्यांचे मत होऊ लागले. त्यानुसार सध्याचा पूर्णाकृती पुतळा त्याच शिल्पकाराकडून करून घेण्यात आला. २३ डिसेंबर १९६१ रोजी हा पुतळा स्मृती मंदिरात वरच्या मजल्यावर बसवण्यात आला. पाठीची सोडून अन्य तीन बाजूंनी पुतळ्याचे दर्शन घेता येते. मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पावसाळ्यातील विजेपासून संरक्षण व्हावे म्हणून तांब्याच्या वीजवाहक पट्ट्या सगळ्या भिंतींमधून आतून बसवून वर शिखरावर एका त्रिशूळात जोडल्या आहेत.

अशा रीतीने इ. स. १९५९ ला सुरू झालेले स्मृती मंदिराचे काम तीन वर्षांनी १९६२ ला आटोपले. हे काम सुरू असतानाच जबलपूरला हिंदू मुसलमान दंगा झाला. स्मृती मंदिराच्या बांधकामावर २२ मुस्लिम कारागीर काम करत होते. त्यांच्यात थोडी चलबिचल झाली. दोघेतिघे निघूनही गेले. संध्याकाळी ही गोष्ट पांडुरंगपंत क्षीरसागर यांच्या लक्षात आली. सगळ्यांना एकत्र करून ते त्यांच्याशी बोलले, त्यांना धीरही दिला. दोन दिवसांनी त्यांनी या सगळ्या कामगारांना महाल संघ कार्यालयात गोळवलकर गुरुजींसोबत चहापानासाठी बोलावले. श्री. गुरुजींशी बोलल्यावर समाधान वाटले आणि विश्वास प्राप्त झाला अशी भावना हकीमभाईंनी व्यक्त केली होती. हे सगळे मुस्लिम कारागीर नाईक रोडवरील मशिदीत नियमितपणे नमाज अदा करायला जात असत. स्मृती मंदिराच्या उद्घाटन समारोहाच्या वेळी शाल, श्रीफळ व सोन्याची अंगठी देऊन श्री. गुरुजींनी हकीमभाईंचा सत्कारही केला होता. एक मानपत्रही त्यांना देण्यात आले होते. ते मानपत्र त्यांनी आपल्या राजस्थानातील घरी फ्रेम करून लावले होते.

अशा या स्मृती मंदिराचा उद्घाटन समारोह ५ एप्रिल १९६२ रोजी वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर झाला होता. त्यासाठी संपूर्ण देशातून, सगळ्या प्रांतातून अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि निमंत्रीत नागपूरला आले होते. या हजारो लोकांची व्यवस्था संघाच्या अभिनव पद्धतीने नागपुरातल्या दोन हजार घरांमधून करण्यात आली होती. आज रेशीमबागेत संघाच्या परिसरात अनेक इमारती दिसतात. त्यावेळी एकही इमारत नव्हती. त्यामुळे देशभरातल्या हजारो संघप्रेमींची राहण्याची, जेवण्याची, झोपण्याची व्यवस्था दोन हजार कुटुंबातून करण्यात आली होती. संघाचा परिवार आणि देशाची एकात्मता असे दोन्ही भाव दृढ करणे या अनोख्या आयोजनामुळे शक्य झाले होते.

कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य यांना स्मृती मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु सगळीकडे पायीच जायचे हा त्यांचा संकल्प होता आणि उपलब्ध दिवसांमध्ये पायी नागपूरला पोहोचणे शक्य नसल्याने त्यांनी आशीर्वादरूप विभूती पाठवली होती. ५ एप्रिल १९६२ रोजी सकाळी गोळवलकर गुरुजींनी डॉ. हेडगेवार यांच्या समाधीची वैदिक पद्धतीने पूजा केली. त्यानंतर शंकराचार्यांकडून आलेली विभूती समाधीला वाहिली, डॉ. हेडगेवार यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला लावली आणि आपल्या कपाळी रेखली; अन स्मृती मंदिराचे रीतसर उद्घाटन झाले. दुपारच्या वेळी गोळवलकर गुरुजींच्या वृद्ध मातोश्री स्मृती मंदिराच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्याच दिवशी सायंकाळी त्याच परिसरात जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला देशभरातून आलेले स्वयंसेवक, संघप्रेमी आणि नागपुरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त स्वयंसेवकांसाठी म्हणून गुरुजींच्या बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हे स्मृती मंदिर सगळ्यांसाठी प्रेरणा केंद्र बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. दरवर्षीचे संघ शिक्षा वर्ग, अखिल भारतीय बैठकी, अन्य लहान मोठी आयोजने, नागपूरचे संघाचे उत्सव या मंदिराच्या छायेतच होत असतात. आज देश विदेशातील करोडो लोकांना हे स्मृती मंदिर प्रेरणा देत उभे आहे. संघाबाहेरील सगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही या स्मृती मंदिराला भेटी दिल्या आहेत.

  • श्रीपाद कोठे
Back to top button