मुंबई महानगराचे माजी घोषप्रमुख व ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेश मुरलीधर जोशी यांचे काल 5 मे 2022 रोजी अल्पशा आजाराने कोकणातील दापोलीजवळील हर्णे येथे निधन झाले.
मुंबई महानगरात 1970 ते 2000 या काळात घोषप्रमुख म्हणून स्व. सुरेश जोशी उर्फ मास्तर यांनी काम केले होते. वादन, समता, गणवेश, वाद्यांची हाताळणी व निगा या सर्वच बाबतीत मास्तर अतिशय काटेकोर असत. वादनाचा तासन्तास सराव करून घेणे, शंख आणि वंशीचे स्वर अचूक यावेत यासाठी ते पुन:पुन्हा घोटून घेणे आदी बाबींसाठी ते कमालीचे आग्रही असत. त्यांच्या तालमीत त्या काळी शेकडो घोषवादक तयार झाले. तळजाई शिबिरासाठी मुंबईतून मोठ्या संख्येने घोष उभा राहण्यामध्ये घोषातील तत्कालीन ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वश्री बापू बर्वे, अरुण देवधर, श्री कोल्हटकर आदींबरोबर सुरेश जोशी यांचे मोलाचे योगदान होते. वाद्यखरेदीसाठी भारतभर भ्रमंती करण्यापासून नवीन रचना घोषात रुळविण्यापर्यंत सर्वच बाबतीत मास्तरांचा सिंहाचा वाटा होता.
स्व. सुरेश जोशी यांना व्यक्तिगत बासरी वाजवण्याचा छंद होता. दादर (पूर्व) येथील अंधशाळेत ते अनेक वर्षे नियमितपणे विद्यार्थ्यांना बासरी शिकविण्यास जात असत. सुमारे 25 वर्षांपूर्वी ते हर्णे या आपल्या मूळ गावी स्थलांतरित झाले होते. हर्णेमध्येही त्यांचे संघकार्य शेवटपर्यंत सुरू होते. संपूर्ण पंचक्रोशीत त्यांचा मोठा व घनिष्ठ संपर्क होता. त्यांच्या जाण्याने मुंबई महानगर स्तरावरील घोष कार्यकर्त्यांच्या फळीतील आणखी एक महत्त्वाचा तारा निखळला आहे.