Culture

अत्त दीप भव

आज बुद्ध पौर्णिमा….. एका देवत्व प्राप्त झालेल्या महामानवाला वंदन करून त्याची शिकवण आत्मसात करण्याचा दिवस.
अरविंद श्रीधर जोशी- ठाणे

जगाच्या दुःखाचे कारण समजल्यावर त्यातुन मार्ग दाखवण्यासाठी धम्माची स्थापना केली. चुकीच्या चालीरिती बदलण्यासाठी प्रयत्न केले…..आणि हे सर्व करताना जुन्या गोष्टींवर टीका न करता सामंजस्याने सांगितले. समाजात सौहार्द टिकावे यासाठी प्रयत्न केले. एकात्म समाजाचे स्वप्न पाहिले.
गौतम बुद्धांचे तीन उपदेश सर्वश्रुत आहेतच……

बुद्धम शरणं गच्छामि – बुद्धत्वाला, ज्ञानाला, सत्याला शरण जा
धम्मम शरणं गच्छामि पंचशील आणि सदाचार सांगितलेल्या धर्मचारणाला शरण जा
संघम शरणं गच्छामि -स्वतः पेक्षा समाज, संघ मोठा, त्याला शरण जा.

सर्व समाज माझा आहे, त्यामुळे कुणालाही कमी लेखू नका, तुच्छ मानू नका, क्षमाशीलता आत्मसात करा….

समाजाचा किती मोठा विचार…..

निर्वाणाच्या वेळीसुद्धा मार्गदर्शन कोणते तर अत्त दीप भव – तूच स्वतः स्वतःला मार्ग दाखवण्या एवढा सक्षम हो…..
समाजाला स्वतःवर अवलंबून न ठेवता त्याला सक्षम बनवणारा तो खरा गुरू….. आणि भगवान गौतम बुद्धांनी हेच तर जगून दाखवले……

त्यांचे चरित्र हे आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे, मार्गदर्शक आहे…..
हिंसा…. शारीरिक, मानसिक, वैचारिक कोणत्याही प्रकारची वाईटच….. हाच विचार रुजवायचा प्रयत्न भगवान बुद्धांनी केला……

हा जगण्याचा मूलमंत्र घेऊन बौद्ध भिक्खू सर्व जगभर गेले आणि त्यांनी मानवाच्या उद्धाराचा भारतीय मूल्यांवर आधारित मार्ग आणि इथली संस्कृती सर्व जगभर पसरवली. आजही जगभरात बौद्ध तत्वज्ञान आणि धर्माच्या पाऊलखुणा स्पष्टपणे आढळतात. तक्षशिला, नालंदा यासारखी प्राचीन विद्यापीठं हे तर त्या काळातील उत्कर्ष बिंदू होता…. सर्व जग हे भारताकडे ज्ञानाचे भांडार म्हणून पहात होते…. आणि गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचा यात मोठा वाटा होता… याचा एक भारतीय संस्कृतीचा पाईक आणि वारसदार म्हणून आपणा सर्वांना अभिमान आहे.

कोणत्याही महापुरुष, प्रेषित यांची आठवण जागवताना त्यांच्या शिकवणीचा आजच्या काळात संदर्भ तपासून पाहण्याची गरज आहे. या तत्वज्ञानाचा स्वीकार करून मार्गक्रमण करणारे आणि भगवान बुद्धांना राष्ट्र पुरुष म्हणून स्वीकारणारे, त्यांचे तत्वज्ञान हे आपलेच म्हणून मानणारे आपण सर्व…… आपले वर्तन त्यांच्या शिकवणुकीला धरून आहे का?

आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे….. बुद्धीला, ज्ञानाला आणि सत्याला जागून आपले वर्तन आहे का?
समाजाला, देशाला मध्यभागी ठेवून अश्या धर्माचे आचरण आपण करत आहोत का?
माझ्या पेक्षा – समाज आणि देश मोठा….. अशी आपली मनाची धारणा आणि वागणूक आहे का?

सध्या देशात घडणाऱ्या (की घडवल्या जाणाऱ्या??) घटना आपल्या सारख्या माणसांच्या हृदयात खोलवर जखम करतात, खोलवर वेदनेची जाणीव सतत जागवत ठेवतात….. मन आणि बुद्धी सुन्न होऊन जाते….. गौतम बुद्धांचे गोडवे गाणारे नेते, समाजधुरीण, प्रसार माध्यमे, तथाकथित विचारवंत यांचे वागणे, बोलणे, आचार, विचार तथागतांच्या तीन उपदेशांना धरून आहे का हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे!!

खरं म्हणजे या घटना भारतासारख्या प्राचीन आणि भगवान गौतमांनी दिलेल्या संस्कार आणि उपदेशात न्हायलेल्या देशात व्हायलाच नकोत.…… दुर्दैवाने घडत आहेत…..

म्हणूनच आजच्या या दिवशी भागवनांनी दिलेले संस्कार आपण किती स्वीकारले, आचरणात आणले याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे. कोणी त्यांचे नाव घेऊन दिशाभूल करत असेल तर सावध पणा बाळगण्याची गरज आहे……
अत्त दीप भव – तूच स्वतः स्वतःला मार्ग दाखवण्या एवढा सक्षम हो….. हा उपदेश जगण्याची आवश्यकता आहे……

तोच आपल्या या पवित्र मातृभूमीला दैदिप्यमान आणि गौरवशाली बनवण्याचा राजमार्ग आहे……

म्हणूनच…….

बुद्धम शरणं गच्छामि….

Back to top button