Culture

वैदिक परंपरा आणि साधना

उच्च सांस्कृतिक मानवी देहधारणा संयमी, संस्कारपूर्ण जीवनाशिवाय शक्य झालेली नाही. तोच संयमी व सांस्कृतिक वारसा पुढे चालवून आपल्याला मानवी जीवन अधिक सुसंपन्न, चिरकाली बनवायचे आहे. परंतु, उत्क्रांतीच्या धीम्या चालीने चालल्यास जीवांना अधिक काळ लागतो. त्याऐवजी जीवात्म्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून ते सुसंस्कार अधिक वेगाने केल्यास जीवांची उन्नती अधिक लवकर होईल. असला बुद्धिनिष्ठ संस्कार ग्रहणाचा प्रयत्न म्हणजेच अध्यात्म होय. पूर्वी मानवाला पृथ्वीच्या एका टोकावरून दुसर्‍या टोकाला जाण्यास अगणित काळ लागत असे. शिवाय समुद्र आडवे येऊन त्याचा पुढचा प्रवास अशक्य होत असे. मानवाने जहाजांचा शोध लावला आणि त्याचा समुद्रप्रवास सुरू झाला. पुढे आगगाड्यांचा शोध लावला, त्यानेही संतुष्ट न राहता मानवाने विमानांचा शोध लावून आता तो जगाची परिक्रमा अवघ्या दहा तासांत करू शकतो. उच्च संस्कार ग्रहणाचे हे फल आहे. तद्वत उत्क्रांतीच्या धीम्या चालीला अधिक वेगवान करून ज्याला स्वतःची उन्नत उत्क्रांत अवस्था लवकर गाठायची आहे, त्याला अध्यात्माची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही.
 
भक्तिमार्ग
 
आपण झोपलो असताना आपले मनसुद्धा शरीरासह झोपत असते. त्यामुळे झोपेच्या काळात आपल्या अवतीभोवती काय घडत असते, याचे आपल्याला स्मरण नसते. मुक्त महापुरुषांचे चित्त सदा आत्मानंदातच रमलेले असल्यामुळे इतर अवांतर घटनाक्रमात वा कर्मात ते गुंतलेले नसते. त्यामुळे त्यांचा जीवन-व्यवहार स्मृतीशिवाय, इच्छेशिवाय चालू असतो. तुकाराम महाराज या अवस्थेचे वर्णन करतात. ‘प्रारब्ध क्रियमाण। भक्ता संचित नाही जाण। निर्वाणी गोविंद ऐसे मागेपुढे। जडो नेदि पांग देवराय।’ अशी त्यांची कर्मातीत असाधारण अवस्था असते. पण, हे सर्वांनाच जमत नाही. म्हणून सर्व सामान्यांकरिता विभिन्न उपासनामार्ग व साधनामार्ग सांगितले आहेत. कर्मे करायची पण सावधपणे व अध्यात्मिक जीवनाला उपकारक अशीच करायची. यामुळे कर्माचे बंधन क्षेत्र बरेच कमी होते. ते बंधन चांगल्या उपकारक व कर्मापुरतेच उरते. अशी शिस्त लागल्यास लाकडावर ठेवलेले लोखंड जसे तरंगते तद्वत सत्कर्माच्या अनुषंगाने कर्माचा भार कमी होतो, तरंगू लागतो. भक्तिपंथात एकच साधना आणि ती म्हणजे संकीर्तन, समर्पण, संतसंग! मन मनात राहू द्यायचेच नाही, सर्व परमेश्वराला समर्पण करायचे. मनामुळेच कर्माची जाणीव होत असते. ते मनच परमेश्वराला दिल्यामुळे आता कर्माचा धनी कोण? आता कर्मच नाही. इतरांच्या नावे बँकेत जमा केलेले धन आपले नसते, तद्वत परमेश्वराला अर्पण केलेले कर्म भक्ताचे नसते.
 
योगमार्ग
 
प्रयत्नांचा शास्त्रशुद्ध मार्ग म्हणजे योग होय. या मार्गात कर्माचे पद्धतशीर शास्त्र असते, आत्मनिरीक्षण असते आणि भव्यदिव्य अनुभवांची लयलूट असते. योगी सहजासहजी होत नसतो. प्रथम त्याला गोपाळ व्हावे लागते. ‘गो’ म्हणजे इंद्रिये (गोस्वामी-इंद्रियांचे स्वामी तुलसीदास)आणि ‘पाल’ म्हणजे पालन करणारा. जो योगी इंद्रियांना विनाकारण त्रास देत नाही किंवा त्याचे लाडही करीत नाही, आपल्या उद्धाराकरिता साधक इंद्रियांना विशिष्ट अनुशासनात लावून त्याद्वारे अनंत शक्ती वर्धित करीत असतो आणि असला गो-वर्धन लीलेने उचलणार्‍या योग्यास वेदव्यास ‘भगवान श्रीगोपालकृष्ण’ असे म्हणतात. या शक्तिकर्षण मार्गातील साधकांना अष्टांग योगाची साधना करावी लागते म्हणून भगवान गोपालकृष्ण आठवे, अष्टमीचे व त्यांच्या शक्तिरूप पत्नीसुद्धा आठच मानल्या आहेत. योगमार्गातील साधकाची प्रथम सात साधना अपत्ये मारली गेल्याशिवाय आठवा कृष्ण जन्माला येऊ शकत नाही. मागील साधनानुभव ओलांडून त्यावरील साधनावस्थेत जाणे म्हणजे मागील अपत्ये मरणेच होय.
 
योगेश्वर श्रीगोपालकृष्ण
 
भगवान श्रीकृष्णांच्या पूर्वीची सात अपत्ये कंसाद्वारे मारली गेली आणि त्यामुळेच आठवे भगवान श्रीकृष्ण वाचले, अशी कृष्णजन्माची कथा व्यासांनी आपल्या बहारदार पद्धतीने सांगितली आहे. कृष्णापूर्वी मारली गेलेली त्याची बहीण होती, असे भागवतात वर्णन आहे. भगवान कृष्णाची अगोदरची भावंडे कोणती? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी! ही ती वसुदेव देवकीची आठ अपत्ये होत. कृष्ण कोण? श्रेष्ठसमाधी अवस्था. श्रेष्ठयोगी सदा समाधी अवस्थेत असतात. संस्कृतमध्ये ‘समाधी’ पुल्लिंगी शब्द असल्यामुळे आठवा ‘समाधी’ शब्द योगेश्वर श्रीगोपालकृष्णच होत. समाधीच्या अगोदर ‘धारणा’ आहे. ‘धारणा’ स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे कृष्णा अगोदर धारणारूप कृष्णबहीण कंसाद्वारे मारली गेली. धारणा अवस्था संपल्याखेरीज आठवे समाधिरूप योगेश्वरकृष्ण कसा अवतरणार? गोपालकृष्ण आठवे कसे, याचे व्यासरहस्य आम्हाला कळण्यास आता अवघड वाटू नये. समाधीत असणार्‍या योग्याचे चित्त विश्वात्मक झाल्यामुळे विश्वाच्या कानाकोपर्‍यातील अतींद्रिय शक्ती तो कर्षण करीत असतो. ‘कर्षति इति कृष्णः’ अशी ‘कृष्ण’शब्दाची परिभाषा आहे. दिव्य शक्ती सतत कर्षण करणारा तो कृष्ण होय.
 
भगवान श्रीकृष्णाचे पिता वसुदेव, तर माता देवकी आहे. योग मार्गाला लागणारा जीवात्मा सदा देवत्वात वसत असल्यामुळे असल्या साधकाचा पिता वसुदेव असणार नाही का? त्या देववृत्तीद्वारे साधक आपल्या सर्व क्रिया वा साधना करीत असल्यामुळे साधकाच्या सर्व वृत्ती देवत्व उत्पन्न करणार्‍या म्हणजे देवकीरूप असतात. असे हे कृष्णाचे दिव्य माता-पिता आहेत. आता जन्म झाल्याबरोबर मध्यरात्री कृष्णाला एका टोपलीत घालून यमुनापार करून नंदा घरी का नेले ? या दुसर्‍या घरी कृष्णाचे नव माता-पिता नंद आणि यशोदा दाखविले आहेत. नंदाला ‘आ’विशेषण लावल्यास आनंद शब्द तयार होतो. आनंदाचा सर्व आशय ‘नंद’ शब्दात आहे. आनंदाकरिता बाह्य अवस्थेची आवश्यकता असते, तर नंद अवस्था साधकाच्या चित्ताची स्वयंभू अवस्था आहे. असल्या नंद अवस्थेचा परिणाम योग्याच्या जीवनात अध्यात्मिक यश प्राप्त करणारा असणारच, म्हणून कृष्णाचे योगमार्गात प्रविष्ठ झाल्यानंतरचे माता-पिता नंद यशोदा आहेत. स्वयंस्फूर्त आनंद म्हणजे नंद तर यश देणारी साधना अवस्था ती यशोदा होय.
 
 योगिराज हरकरे
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)

सौजन्य : मुंबई तरुण भारत

Back to top button