कार्यकर्ता विकासाच्या प्रवासातील ह्या क्षमतेचा जागर समाजाच्या आयुष्यात आनंद पेरणारा आहे

जिथे जिथे अंधःकार असेल तो प्रकाशाने उजळून टाकू अशी विद्यार्थी दशेत केलेली प्रतिज्ञा. समाजाच्या अनेक चांगल्या घटनांचे साक्षीदार असलेले ही माणसे. एकत्र काम करताना झालेली मैत्री आणि विद्यार्थी परिषदेचा संस्कार घेऊन आपापल्या परीने समाजात वावरणारी. भारतातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचे जुने कार्यकर्ते समाजाच्या विविध क्षेत्रात वावरत आहेत.
सार्वजनिक जीवनात अनामिक राहून परिषदेचे अनेक कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत. त्यातल्या काही गोष्टी पटलावर येतात काही येत नाही. त्याती एक गोष्ट सहज एका कार्यकर्त्यांच्या बोलण्यात जाणवली विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे मुलगी दत्तक घेण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ही कुठे कुणी सांगितलं, प्रारूप तयार केले किंवा आग्रह धरला असं नाही. परिषदेच्या संस्कारातील ही एक सहजता आहे. ज्याची कुठे फारशी चर्चा नाही. डांगोरा नाही. पण अशी उदाहरणे समाजात सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. त्याचा म्हणून एक सकारत्मक परिणाम नक्की आहे.
कार्यपद्धतीचा संस्कार म्हणून विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उभ्या केलेल्या संस्था सामाजिक कामाचा संदर्भ म्हणून उल्लेखनीय आहेत. अनेक क्षेत्रांना चांगली माणसे देणारी, निर्माण करणारी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी विद्यार्थी परिषदेच्या कामात आहे. हे काही एका दिवसात किंवा मांडणीतून घडत नाही. स्वतःला समाजाच्या मातीत गाडून घेणारे कार्यकर्ते आहेत म्हणून हे शक्य झाले आहे. सामाजिक समस्या, संघटना आणि काम असा विचार करायला लागलो की समाजाच्या गतीबरोबर चालण्याचे अचूक भान विद्यार्थी परिषेदच्या टीमला आहे ह्यात कुठलीही शंका नाही.
सामाजिक कामात अनेक गोष्टी रचनेत अडकून पडल्या की फारशा पुढे सरकत नाही असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे एखादे ध्येय प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांना वेळ लागतो. त्यात चर्चा, चिंतन अधिक होते आणि मूळ प्रश्न बाजूला राहतो. या गोष्टी खरं तर त्या त्या संघटनाच्या परंपरेने आणि कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेल्या असतात. विद्यार्थी परिषद मात्र प्रत्यक्ष कृतीत येणाऱ्या सामाजिक कामाच्या समन्वयाचा धागा आहे. सामाजिक कामात परस्परांशी संबंध असलेली आणि सहाय्यभूत ठरणारा एकत्रित विचार मांडण्याचे कौशल्य हे परिषदेच्या कामातील आगळेवेगळेपण आहे.
कार्यकर्ता विकासाची प्रक्रिया ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. परिषदेच्या कामात कार्यकर्ता जसा जसा विकसित होत जातो त्याला स्वतःला अनेक कामासाठी आवश्यक म्हणून नविन दिशा सापडत जातात. नवनविन प्रश्न किंवा समस्या उभ्या राहिल्या की त्या सोडवण्याचा नाविन्यपूर्ण क्षमता, इच्छाशक्ती आणि बदल स्वीकारण्याची सहजता ही परिषदेच्या तीन चार पिढ्या एकत्र काम करताना आढळते हे एक सामाजिक संघटना म्हणून विशेष आहे.
कुठल्याही संघटनेत कार्यकर्त्यांची प्रेरणा सातत्याने टिकून राहणे हे मोठे आव्हान आहे. सामान्य कार्यकर्त्याला पैलू पाडणे, संघटनेबरोबर, विचारांशी आणि देशाशी बांधिलकी निर्माण करण्याचे सूत्र विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ता विकासात दडलेले आहे. प्रत्यक्ष उक्ती आणि कृतीतील अंतर कमी करत समृध्द आणि आनंदी जगण्यासाठी वैयक्तिक, कौटुंबिक आणि समाज म्हणून विविध जबाबदाऱ्या पाडण्यासाठीची शिदोरी परिषदेच्या कामात मिळते. काही जणांसाठी ती जीवन दृष्टीकोनाचा भाग बनते. कार्यकर्ता विकासाच्या प्रवासातील ह्या क्षमतेचा जागर समाजाच्या आयुष्यात आनंद पेरणारा आहे हे नक्की.