तिरंग्यांची विक्री आता शिधावाटप दुकानांमधूनही!
‘हर घर तिरंगा’
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान देशात राबविल्या जाणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी राष्ट्रध्वजांची चक्क शिधावाटप दुकानांतून तसेच ऑनलाइनही विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्याचा निर्णय केंद्रांच्या सांस्कृतिक मंत्रालयाने घेतला आहे.
नागरिकांनी राष्ट्रध्वज आपल्या घरावर फडकवावा यासाठी जनजागृती करण्यासाठी शाळा- महाविद्यालये, स्वयंसहाय्यता समुह, युवा मंडळ, लोकप्रतिनिधींसोबतच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिधा वाटप दुकाने, सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रध्वज विक्री केंद्र सुरू करण्याचे आदेशही केंद्राने दिले आहेत.
-बचत गटांनाही परवानगी..
पूर्वी राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असेल अशी तरतूद होती.त्यात बदल करीत आता पॉलिस्टरपासूनही तसेच मशीनद्वारे राष्ट्रध्वज तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातूनही राष्ट्रध्वज बनविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
-ऑनलाइनही..
तिरंगा अधिक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध व्हावा यासाठी भारतीय ध्वज संहितेमध्ये सुधारणा करून काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार राष्ट्रध्वजाची ऑनलाइन विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.२०:३० इंचाच्या तिरंग्यासाठी ३० रुपये शुल्क आकारले जाणारआहे.