श्री. हरेश भाई शाह +91 93236 77113
Founder: Making A Difference Foundation (MAD)
Website
www.makingadifferencefoundation.org
Email
madmadfoundation@gmail.com
MAD… ज्याचा मराठीत उच्चार मॅड अर्थात वेडा असा होतो, ही एक मुंबई स्थित स्वयंसेवी संस्था आहे. MAD म्हणजे Making A Difference Foundation. लौकिकार्थाने याचा संबंध वेडेपणाच्या MAD शी नसला तरी समाजसेवेचे वेड घेतलेली ही मंडळी आहे. मॅड ही संस्था “हमारा स्टेशन हमारी शान” या उपक्रमाद्वारे पश्चिम व मध्य रेल्वे ची ३६ स्टेशने सुशोभित केल्यामुळे चर्चेत आली. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या मन कि बात मधून उल्लेख केलेल्या संकल्पनेला अनुसरून तात्कालीन रेल्वेमंत्री माननीय सुरेश प्रभुजी यांनी उद्घाटन केलेला हा अभिनव उपक्रम होता असे संस्थेचे संस्थापक हरेश भाई शहा मोठ्या अभिमानाने सांगतात.
वंदे मातरम दिवाळी २०२१ हा देखील मॅडचा असाच एक अनोखा उपक्रम. कोरोना महामारीत दोन्ही हाताने समाजाला मदत केल्यावर, संस्थेने सीमेवरील लक्षावधी जवानांना दिवाळीची शुभेच्छा पत्रे पाठविली. आपल्या जवानांचे नैतिक धैर्य उंचावण्याचा तो स्तुत्य उपक्रम होता.
स्थायी अशा सेवा कार्यात आपला खारीचा वाटा उचलताना मॅड पालघर जिह्यातील विक्रमगड येथे वनवासी विद्यार्थयांसाठी एक वसतीगृह चालवते. कौशल प्रशिक्षण केंद्र आणि एक अद्ययावत वैज्ञानिक प्रयोगशाळा या वसतिगृहाला जोडलेले आहेत. वसतिगृहातील मुले तेथील शाळेत जातात. आजमितीस सुमारे ६० वनवासी मुलं या वसतिगृहात राहातात.
१२ वीत गेलेली नियारा आणि ९ वीत गेलेली ऑनीक्स या दोघी अमेरिकेत,बोस्टनला जन्मलेल्या, अमेरिकेत शिकणाऱ्या मूळ मुंबईकर भारतीय वंशाच्या सख्ख्या बहिणी. त्या आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे जून, जुलै किंवा ऑगस्ट मध्ये दरवर्षी मुंबईला आपल्या आजोळी येतात. तेव्हा त्यांची जीवाची मुंबई दादरच्या आजोळपासून गेट वे ऑफ इंडिया किंवा कुलाब्यापर्यंतच. पण यावर्षी त्या दोघी ठरवून आग्रहाने मॅडच्या विक्रमगड वसतिगृहावर ४ दिवस राहायला गेल्या. त्या संपूर्ण अनोळखी वातावरणात अर्थात दोघींच्या सोबतीला वडील होतेच.
विचार करा, बोस्टेनलेला आजपर्यंतचे आयुष्य गेलेल्या दोन मुली विक्रमगडला ४ दिवस राहायला जातात. खरं म्हणजे अमेरिकेतील एका सुखवस्तू घरात जन्मलेल्या नियारा आणि ओनीक्स वडिलांकडे हट्ट केला असता तर स्विट्झरलँड , युरोप किंवा जपानला फिरायला जाऊ शकल्या असत्या, पण त्यांनी विक्रमगड निवडले. ते देखील सेवेसाठी, अगदी खारीचा वाटा असेल पण फक्त पर्यटन नाही तर वनवासी समाजाची सेवा.तसेच या मुलींना विक्रमगड सारख्या दुर्गम वनवासी क्षेत्रात पाठवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या आई वडिलांना देखील मनापासून दाद दिली पाहिजे.Hats Off…. या दोघी बहिणींचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.
अमेरिकन उच्चारांच्या इंग्लिश बोलणाऱ्या दोघी बहिणी थेट मराठी भाषेच्या कोलाहलात पोचल्या. त्यांच्या कल्पनेपेक्षा वास्तव खुप निराळे होते.
मात्र एव्हढी हिरवीगार सृष्टी त्यांनी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. भात शेतीचा हंगाम असल्यामुळे सगळीकडे हिरवाच हिरवा रंग. ऑनीक्स भाताच्या शेतात लावणी करायला चिखलात उतरली मात्र नियाराने लांबूनच भात शेतीचा आनंद घेतला.
वसतिगृहातील मुलांची शिस्त दोघींना खूप भावली. आपले ताट आपण आणणे, एका रांगेत उभे राहून जेवण घेणे, त्यातल्या काही मुलांनी जेवण वाढणे, जेवणापूर्वी हात जोडून भोजन मंत्र आणि श्लोक म्हणणे, पानात पडेल ते चाटून पुसून खाणे, आपले ताट आपणच धुवून परत जागेवर ठेवणे… नियारा आणि ऑनीक्स आश्चर्यचकित झाल्या. दोघी बहिणींना मात्र ते जेवण तिखट वाटत होते. पण दोघी न कुरकुरता ताट स्वच्छ करत. कधी कधी त्या मुलांना जेवण वाढायला पण उभ्या राहात.
दोन दोन चार चार तास वीज जाते हा ही अनुभव त्यांच्यासाठी अगदी नवीन होता. मुळात वीज जाणे हाच नवीन अनुभव होता.
जेव्हा त्यांनी मुलांना काही खेळ शिकवले तेव्हा त्या मुलांमधली कल्पकता बघून त्या थक्क झाल्या. काडेपेटीचा टेलिफोन दोघीनी बनवायला शिकवला तर त्यातील एका चुणचुणीत वनवासी मुलाने मधल्या दोरीला अजून चार दोऱ्या बांधून पाच जणांना ऐकू येईल अशी त्यात Value Addition केले. त्या दोघींसाठी हे अनपेक्षित होते. त्या दोघींनी त्या मुलाचे मनापासून कौतुक केले.
त्या मुलांनी लेगोच्या ठोकळ्यांपासून तयार केलेला किल्ला, रणगाडा, झेप अशा नाना तऱ्हेच्या वस्तू बघून नियारा आणि ओनीक्स दोघींनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
मराठीचा गंध नसलेल्या दोघी बहिणी फक्त ४ दिवसात नमस्कार, आपले नाव काय?, चांगलं आहे एव्हढे जुजबी मराठी बोलायला शिकल्या, हे ही नसे थोडके.
दोघी बहिणींनी आपल्या अमेरिकन इंग्रजीतून त्या वनवासी मुलांना गणित भूमिती शिकवले. आकडे आणि आकृत्यांवरून त्यांना बरेच समजले असावे असे या दोन्ही बहिणींच्या लक्षात आले.
चार दिवसांच्या स्वर्गीय आनंदात राहून नियारा आणि ओनीक्स परत मायदेशी जाण्यासाठी मुंबईत आल्या.
मॅडचे आभार मानून पुढच्या वर्षी मॅड आपल्याला १० दिवस विक्रमगढच्या वसतिगृहावर राहण्याची संधी देईल या आशेने दोघी बहिणी बोस्टनला जाणाऱ्या विमानात चढल्या.
पण नियारा आणि ओनिक्स आपल्याला एक वेगळी दृष्टी, प्रेरणा आणि संदेश देऊन गेल्या. अमेरिकेहून विक्रमगढ हे अंतर मुंबई- विक्रमगढ पेक्षा कमी आहे हा तर तो संदेश नाही?
तर मग चलताय ना विक्रमगढला?