News

आत्मनिर्भर भारत:-संरक्षण क्षेत्रातील निर्यात १३ हजार कोटीं

India’s Defence exports at record Rs 13,000 crore, 70% from private sector,

भारताची संरक्षण (Defence) क्षेत्रातील निर्यात १३ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. ही आकडेवारी २०२१-२२ या आर्थिक वर्षातील आहे.संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत देशातील खासगी क्षेत्राचा वाटा ७० टक्के तर सरकारी कंपन्यांचा वाटा ३० टक्के आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीने २०२१-२२मध्ये आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. याआधी कधीही देशाने संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांची एवढ्या मोठ्या प्रमाात निर्यात केली नव्हती. आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादक क्षमतेते आणि गुणवत्तेत सातत्याने वाढ करत आहे. यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. यामुळेच देशाची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत उंचावत आहे, असे अतिरिक्त संरक्षण उत्पादन सचिव संजय जाजु यांनी सांगितले.

अमेरिका, फिलिपिन्ससह इतर देशांना भारताने संरक्षण क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली. वाजवी दर आणि उत्तम दर्जा या दोन कारणांमुळे भारताच्या संरक्षण उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी वाढू लागली आहे.

फिलिपिन्सने भारताकडून ब्राह्मोस क्रुझ क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये २७७० कोटी रुपयांचा (३७५० लाख डॉलर) करार केला. या करारामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत लक्षणीय वाढ झाली. एका करारामुळे भारत संरक्षण क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञानाची निर्यात करण्यास सक्षम असल्याचा संदेश जगभर पोहोचला आहे.

ब्राह्मोस तसेच भारताने तयारे केलेल्या इतर क्षेपणास्त्र यंत्रणा, तोफा, लढाऊ विमानं यांच्यासाठी निवडक देशांकडून विचारणा सुरू आहे. चीनसोबतच्या सीमावादात गुंतलेले अनेक देश आता भारतीय संरक्षण उत्पादनांचा स्वसंरक्षणाचा सर्वोत्तम आणि वाजवी दरात उपलब्ध असलेला पर्याय म्हणून विचार करत आहेत. लवकरच व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांसोबत भारताचे मोठे संरक्षण करार होणार आहे. या करारांमुळे भारताच्या संरक्षण निर्यातीला आणखी चालना मिळणार आहे.

आशिया आणि आफ्रिका खंडातील देश हे लवकरच भारतीय संरक्षण उत्पादनांची मोठी बाजारपेठ ठरणार आहेत. जो भारत संरक्षण क्षेत्रात मोठी आयात करणारा देश म्हणून ओळखला जातो तोच भारत संरक्षण क्षेत्रात आता हजारो कोटी रुपयांची निर्यात करू लागला आहे. पुढील काही वर्षांत संरक्षण क्षेत्रातील निर्यात नवनवे उच्चांक गाठेल.

भारत संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त अशी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करणारी ७५ उत्पादने एकाचवेळी बाजारात आणत आहे. आणखी १०० कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादने भारत लवकरच बाजारात आणणार आहे.

Back to top button