InternationalOpinion

इंधन आयात आणि भारताची मुत्सद्देगिरी

रशिया-युक्रेन संघर्षाचे मोठे जागतिक परिणाम ही आज आंतरराष्ट्रीय समुदायापुढील सर्वांत मोठी चिंतेची बाब बनली आहे. या संघर्षाचा सर्वांत मोठा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. ज्या दिवशी हा संघर्ष सुरू झाला, म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत साधारणत: 75 ते 80 डॉलर्स प्रतिबॅरल यादरम्यान होती. युद्धाचा भडका उडाल्यानंतर 28 फेब्रुवारीपर्यंत ही किंमत 100 डॉलर्स प्रतिबॅरल झाली. साधारणत: मार्च महिन्यामध्ये ते 120 डॉलर्सपर्यंत गेली.आजही कच्च्या तेलाचे भाव 121 ते 124 डॉलर्स प्रतिबॅरलच्या दरम्यान आहेत. याचे कारण जागतिक स्तरावर रशिया हा तेल आणि नैसर्गिक वायूचा प्रमुख निर्यातदार देश आहे. युद्धामुळे तेलाचा पुरवठा विसकळीत होणे स्वाभाविक होते. तशातच अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लावल्यामुळे जगभरातील देशांना रशियाकडून होणारी तेलाची निर्यात खंडित झाली.

भारतासाठी ही दरवाढ म्हणजे आर्थिक संकटांना निमंत्रण देणारी होती. त्यातही कोरोनानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना हा खूप मोठा धक्का होता. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेने आर्थिक निर्बंध घातलेले असतानाही रशियाकडून तेलाची आयात सुरू केली. आजवर भारत ज्या देशांकडून तेलाची आयात करतो, त्या देशांमध्ये रशियाचे स्थान खूप खालच्या पातळीवर होते. रशिया 13व्या क्रमांकावर होता. इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती हे देश यामध्ये पहिल्या तीन स्थानी आहेत. अमेरिका यामध्ये पाचव्या स्थानी आहे.

रशियाकडून भारतात होणारी तेलाची आयात तुलनेने अत्यल्प स्वरूपाची होती. असे असताना भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात इतकी प्रचंड वाढली की, मे महिन्यामध्ये रशिया हा भारताचा सर्वांत मोठा तेलपुरवठादार देश बनला. याबाबत रशियाने सौदी अरेबियाला मागे टाकले आहे. आजची स्थिती पाहिल्यास भारताचा सर्वांत मोठा तेलपुरवठादार इराक असून दुसर्‍या स्थानावर रशिया असून सौदी अरेबिया तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. भारताने मे महिन्यात रशियाकडून 2.5 कोटी बॅरल इतकी प्रचंड तेलआयात केली आहे. ही संख्या गेल्या दोन वर्षांत रशियाकडून करण्यात आलेल्या तेलआयातीपेक्षा अधिक आहे.

भारताने रशियाकडून तेलआयात वाढवल्यानंतर अमेरिका, युरोपसह पाश्चिमात्य माध्यमांनी भारतावर टीका करण्यास सुरुवात केली. रशियाकडून तेलाची आयात करून भारत अप्रत्यक्षपणे रशियाच्या युद्धखोर धोरणाला पाठिंबा देत आहे, कारण भारताकडून मिळणारा पैसा रशिया युक्रेनच्या युद्धासाठी वापरत आहे, अशा प्रकारचे आरोप भारतावर करण्यात आले. तथापि, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांंनी याचा अत्यंत उत्तम पद्धतीने प्रतिवाद केला.

जगाचे प्रश्न युरोपचे प्रश्न नाहीत, पण युरोपचे प्रश्न मात्र जगाचे प्रश्न आहेत, अशी भूमिका घेत वर्षानुवर्षांपासून युरोपीय देश दुटप्पीपणे वागत आले आहेत. भारताने यावरच बोट ठेवत आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढत असल्याने आम्हाला याचा फटका बसत असल्याने आमची गरज म्हणून रशियाकडून तेल आयात करत आहोत, हे निक्षून सांगितले. अमेरिकेच्या दबावापुढे आणि युरोपीय देशांच्या टीकेपुढे न झुकता भारताने रशियाकडून तेलाची आयात सुरू ठेवली आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारताच्या या तेलआयातीचे कौतुक केले आहे. अमेरिका आणि रशिया या दोघांशी असणार्‍या संबंधांमध्ये समतोल साधणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी म्हटले. आज ऑस्ट्रेलिया, जपानसह अमेरिकेच्या सर्व मित्र देशांनी रशियाकडून तेलआयात थांबवली आहे. मात्र भारताने ही आयात सुरू ठेवली आहे. क्वाडच्या गटामध्ये भारत हा एकमेव देश आहे, जो रशियावर टाकलेल्या आर्थिक निर्बंधांमध्ये सहभागी झालेला नाहीये. भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाची ही पोचपावती आहे.

रशिया-युक्रेन युद्धानंतरच्या काळात तेलाच्या किमती वाढल्यामुळे श्रीलंकेत 200 रुपये प्रतिलिटर इतका पेट्रोलचा भाव झाला, तर पाकिस्तानातही तशीच स्थिती पाहायला मिळाली. या वाढत्या किमतींमुळे राजकीय अस्थिरताही दिसून आली. जागतिक बाजारात तेलाच्या किमती 120 डॉलर्सवर पोहोचल्या, तेव्हा भारतात देशांतर्गत बाजारात पेट्रोलचे भाव 150 रुपयांवर जातील अशी अपेक्षा होती. असे न होता उलट केंद्र सरकारने त्यावरील अबकारी कर कमी करून किमती नियंत्रणात राहिल्या. याच्या मुळाशी रशियाकडून स्वस्तात होणारी तेलआयात आहे. भारताच्या उत्तम ‘इंधन मुत्सद्देगिरी’चा हा परिणाम म्हणावा लागेल.

Back to top button