लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांची कारकिर्द
अण्णा भाऊ साठे हे दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.
अकलेची गोष्ट (1945), देशभक्त घोटाळे (1946), शेटजींचे इलेक्शन (1946), बेकायदेशीर (1947), पुढारी मिळाला (1952), लोकमंत्र्यांचा दौरा (1952) ही त्यांची काही लोकनाट्य होत. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
अण्णाभाऊंचं साहित्य देशाबाहेर प्रसिद्ध :
अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोक जीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांचा व्यथा-वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात अशी त्यांची धारणा होती. अण्णाभाऊंचं साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं. जनमानसात प्रसिद्ध झालं. अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे, तर शहरी जीवन दिलखुलास आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णा भाऊंच्या कथा-कादंबऱ्या ही साहित्यक्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया ठरली. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती.त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर 22 भाषांत भाषांतरे झाली आहेत.