नागपंचमी आणि सर्प माहात्म्य
श्रावण महिना सुरू झाला की, अनेक सण साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागपंचमी मराठी माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असेलच. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं. तसंच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. असं मानलं जातं की, या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली. ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. पण आज नागपंचमीला नाही पण नागाला आणि नागसंवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे. चला जाणून घेऊया नागपंचमी विषयी माहिती (Nag Panchami Chi Mahiti) आणि नागपंचमीच्या शुभेच्छा.
नागपंचमीचं महत्त्व (Importance Of Nag Panchami)
हिंदू धर्मात देवीदेवतांची पूजा-अर्चा करण्यासाठी व्रतवैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरूवात झाली. तसंच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात. नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे. तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे. लोकजीवनातही भारतीयांचं नागांशी पूर्वीपासून दृढ नातं आहे. याच कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते. खरंतर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्याही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे. कारण शेतातील उंदरी-घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होत नाही.
तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच, पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात. कुंडली दोषांमध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे. कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात. त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दान दक्षिणा देण्याचंही महत्त्व सांगितलं जातं. शास्त्रांनुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. याशिवाय प्रत्येक महिनाच्या पंचम तिथीला नागदेवतेचं स्थान आहे. परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः केली जाते. या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो. श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासासोबत साजरं केलं जातं.
नागपंचमीचं वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व
नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे.
सण आणि पर्यावरण (Festival Of Humanity and Environment)
हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक प्राणी, वनस्पती, एवढचं काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूज, पर्व, उत्सवांचं नातं हे धर्माशी जोडलं आहे. एकीकडे हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवतात तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणांशीही जोडण्याचं काम करतात. याचनुसार नागाला दैवीप्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे.
Do’s:
नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागाला दूध पाजण्याची काहीच आवश्यकता नाही. काही काळांपर्यंत नागपंचमीला गारूडी हे साप घेऊन येत असत आणि सापांना दूध पाजले जात असे. पण ते चुकीचे आहे कारण नाग दूध पित नाही. याउलट दूध पाजल्याने नागाचा मृत्यू होतो. आता मात्र संशोधन आणि लोकजागृतीमुळे या चुकीच्या प्रथांना विराम मिळाला आहे.
नागपंचमीच्या दिवशी विळीवर चिरू नये, काहीही कापू नये, तळू नये आणि चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत पाळले जात असत. पण आताच्या काळात या गोष्टी शहरी भागात तरी पाळल्या जाणं शक्य नाही.
तुमची नागांवर खरंच श्रद्धा असल्यास शिवलिंगाला दूधाचं स्नान घालू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दूधाचं दानही करू शकता. कारण ती खऱ्या अर्थाने नागपंचमी ठरेल.