
गेल्या ११ दिवसांपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर २२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा वी खेळवली जात होती. २८ जुलैला सुरू झालेल्या या स्पर्धेची आज (८ ऑगस्ट) सांगता झाली. यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. यावेळी संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये पहिले पदक मिळवले होते. तर, मीराबाई चानूने पहिले सुवर्णपदक पटकावले होते. हॉकीमधील रौप्यपदकाने भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रवास संपला असून खेळाडू मायदेशी परतत आहेत.
अलेक्झांडर स्टेडियमवर या स्पर्धेचा भव्य समारोप सोहळा पार पडला. यावेळी सर्व सहभागी देशांतील चमूने हजेरी लावली. समारोप समारंभात टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल आणि बॉक्सर निखत झरीन हे भारताचे ध्वजवाहक होते. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग यांनी भारतीय चमूचे नेतृत्व केले होते.

२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकली असली तरी मागील स्पर्धेपेक्षा ही पदक संख्या कमी आहे. २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६४ पदकांची कमाई केली होती. त्यामध्ये २६ सुवर्ण, १९ रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश होता. यावर्षी कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग आणि बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी अद्भुत कामगिरी केली.
अॅथलेटिक्स आणि लॉन बॉलमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ केला. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या महिला टी २० क्रिकेटमध्येही भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. याशिवाय पॅरा (दिव्यांग) खेळाडूंनीही अनेक पदके जिंकली. याच कारणामुळे नेमबाजांची अनुपस्थिती असतानाही भारताला ६१ पदके मिळवता आली.

२८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये पार पडलेली ही स्पर्धा, ऑलिंपिकनंतरची इंग्लंडमधील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ठरली.