हिपॅटायटिस म्हणजे काय ?

कोणत्या प्रकारचा हिपॅटायटिस आहे जास्त घातक
यकृत हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव आहे. म्हणूनच शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृत निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यकृत शरीराला आवश्यक असलेल्या रासायनिक घटकांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पित्त तयार करते. ते शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. यकृतामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. हिपॅटायटीस ही अशीच एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे यकृतावर सूज येते. हिपॅटायटीस संसर्ग ऍक्यूट किंवा क्रॉनिक दोन्ही असू शकतो. हिपॅटायटीस अनेक कारणांमुळे होऊ शकतो पण व्हायरल हेपेटायटीस हा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा आजार विविध प्रकारच्या विषाणूंमुळे होऊ शकतो. हिपॅटायटीस ए, बी, सी, डी आणि ई हे सर्वात सामान्य प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या हिपॅटायटीसचे धोके वेगवेगळे असू शकतात. जाणून घेऊया कोणत्या प्रकारचा हिपॅटायटिस सर्वात घातक आहे.
हिपॅटायटीस ए
हिपॅटायटिस ए हा आजार हिपॅटायटीस ए विषाणू (HAV) मुळे उद्भवतो. यामध्ये यकृताचा दाह होतो व सूज येते. हा संसर्ग संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेच्या संपर्कात आलेल्या दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनाने पसरतो. संसर्ग झालेल्यांना जास्त ताप येणे , भूक न लागणे, अतिसार, मळमळ, ओटीपोटात अस्वस्थता, गडद रंगाची लघवी आणि कावीळ यासारख्या समस्या असू शकतात. काही गंभीर लक्षणे मृत्यूस देखील कारणीभूत ठरू शकतात. हिपॅटायटीस ए साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही, हा संसर्ग आहारविहाराची पथ्ये पाळल्यास काही काळात आपोआप कमी होतो. डॉक्टर त्रास कमी करण्यासाठी काही औषधे देऊ शकतात.
हिपॅटायटीस बी
हिपॅटायटीस बी हा देखील विषाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे दीर्घकालीन यकृत समस्या उद्भवू शकतात. हिपॅटायटीस बी विषाणू (HBV) मुळे होणारा हा संसर्ग संक्रमित व्यक्तीच्या रक्त, वीर्य किंवा शरीरातील इतर द्रवांद्वारे पसरू शकतो. पण हा संसर्ग शिंकणे किंवा खोकल्याने पसरत नाही. हा संसर्ग संक्रमित आईकडून बाळाला देखील होऊ शकतो. हिपॅटायटीस बी ची लक्षणे संसर्ग झाल्यानंतर सुमारे एक ते चार महिन्यांनी दिसतात. रुग्णांना ओटीपोटात दुखणे, गडद लघवी, ताप, सांधेदुखी, भूक न लागणे, उलट्या होणे, अशक्तपणा आणि थकवा हा त्रास होतो. हिपॅटायटीस बी होऊ नये म्हणून लसी उपलब्ध आहेत. हा आजार झाल्यास रुग्णांना अँटीव्हायरल औषधे दिली जातात. काही अतिगंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता पडू शकते.

हिपॅटायटीस सी
हिपॅटायटीस सी विषाणू (HCV) मुळे होणारी ही समस्या संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे पसरते. क्रॉनिक हिपॅटायटीस सी हा साधारणपणे अनेक वर्षे मूक संसर्ग म्हणून टिकून राहू शकतो. या व्हायरसमुळे यकृताचे गंभीर नुकसान होईपर्यंत लक्षणे दिसत नाहीत. हिपॅटायटीस सी असलेल्या लोकांना थकवा, भूक न लागणे, कावीळ, गडद लघवी आणि त्वचेला खाज सुटणे हे त्रास होऊ शकतात. हिपॅटायटीस सी असलेल्या काही रुग्णांना यकृताचा कर्करोग देखील होऊ शकतो. हिपॅटायटीस सीच्या उपचारांसाठी अँटीव्हायरल औषधे घ्यावी लागतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असू शकते.
हिपॅटायटीस ई
हिपॅटायटीस ई विषाणू (HEV) मुळे होणारा हा आजार यकृतासाठी अत्यंत हानिकारक मानला जातो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेने दूषित झालेले पाणी प्यायल्याने ही समस्या उद्भवणे सामान्य आहे. संसर्ग वेळीच आटोक्यात न आल्यास यकृत निकामी होऊ शकते. हिपॅटायटीस ई असलेल्या लोकांना कावीळ, सांधेदुखी, भूक न लागणे, पोटात दुखणे, मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसतात. हिपॅटायटीस ई असलेल्या लोकांना 21 दिवसांसाठी औषधाचा कोर्स दिला जातो. हिपॅटायटीस ईचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे हिपॅटायटिसचा धोका विशेष वाढतो. त्यामुळे पिण्याचे पाणी स्वच्छ असेल याची काळजी घ्या.