सशक्त नौसेना… आत्मनिर्भर भारत

भारतीय नौसेनेसाठी आजचा दिवस खूपच अभिमानाचा आहे.आयएनएस विक्रांत ह्या नवीन युद्धनौकेचे आज राष्ट्रार्पण झाले आहे. १,७०० जवान आणि ३० विमाने वाहून नेऊ शकणाऱ्या, आणि ८८ मेगावॅट वीज निर्माण करत ८,००० किलोमीटरचा पल्ला पार करू शकणाऱ्या, ५०० पेक्षा जास्त स्वदेशी कंपन्यांनी बनवलेल्या, संपूर्णपणे भारतात बनवलेल्या, ७५% पेक्षा जास्त ‘स्वदेशी साहित्य आणि प्रणाली’ वापरलेल्या ह्या विशाल युद्धनौकेचे आज जलावतरण झाले आहे.
नाव ‘विक्रांत’च का ?
विक्रांत म्हणजे विजयी आणि शूर आणि भारतात बांधलेल्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेला ‘INS विक्रांत’ असे नाव देण्यात आले.कारण यापूर्वी ब्रिटनकडून खरेदी केलेल्या भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे नाव ‘आयएनएस विक्रांत’ असे होते.1971 च्या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवण्यात विक्रांतने महत्त्वाची भूमिका बजावली होती, पाकिस्तानविरुद्ध भारतीय नौदलाला मजबूत ठेवण्यात व विविध सागरी मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या INS विक्रांतला 1997 मध्ये सेवानिवृत्त करण्यात आले होते. ‘INS विक्रांत’ बद्दलची कृतज्ञता आणि अभिमान दर्शविण्यासाठी स्वदेशी विमानवाहू नौकेला ‘INS विक्रांत'(INS VIKRANT) असे नाव देण्यात आले आहे.
INS विक्रांतचे आदर्श वाक्य ‘जयेम सम युधि स्पृद्ध’ हे ब्रीदवाक्य ऋग्वेदातून घेतले आहे.ज्याचा अर्थ असा आहे की ‘कोणी माझ्याशी लढायला आले तर मी त्याचा नाश करेन.’
हे जलावतरण होत असतानाच, पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या, ब्रिटिश वसाहतवादाच्या आठवणींच्या बेड्यांमधून मुक्त होण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भारतीय नौसेनेने त्यांचे ‘शं नो वरुण:‘ हे ब्रीदवाक्य कायम ठेवून, ब्रिटिश सेंट जॉर्ज क्रॉस असलेले अधिकृत चिन्ह बदलून, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या भारताच्या पहिल्या नौदलाला मानवंदना म्हणून, शिवाजी महाराजांच्या (SHIVAJI MAHARAJ) अष्टकोनी राजमुद्रेचा आधार घेत नवीन Ensign अर्थात अधिकृत चिन्ह / मुद्रा प्रसारित केली आहे.
एकीकडे धूर्त,दगाबाज चीन, दुसऱ्या बाजूला कपटी कारस्थानी पाकिस्तान असताना आपल्याला कायम युद्धसज्ज रहावेच लागणार आहे. INS विक्रांत मुळे आता भारताला इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये देखील शक्ती संतुलन साधण्यास मदत होणार आहे.एक सशक्त संरक्षण आणि सामरिक शक्ती म्हणून भारत देश पुढे येत असतानाच, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उरावर बाळगलेली ब्रिटिशांची मानसिक गुलामगिरी झुगारून द्यायला ह्या निमित्ताने सुरुवात होते आहे. भारतीय समाज मनाला नौदला पाठोपाठ वायूदलाचादेखील ध्वज संपूर्णपणे भारतीय होईल याचीच आता प्रतीक्षा आहे.