सांगलीत साधूंशी ‘पोरखेळ’
महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत अश्या अफवाचं पीक आले आहे आणि त्या गैरसमजातूनच सांगलीमधील जत तालुक्यात लवंगा गावात मुले चोरण्याची टोळीच्या संशयावरून चार साधूना मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ माजली. या साधूना मारहाण करणाऱ्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस अजून 10 ते 12 आरोपींचा शोध करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
या घटनेनंतर पालघरमधील साधू हत्याकांडाची घटना आपल्याला आठवली असेल? दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. पण, अशीच घटना आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून या साधूंना मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने पोलीस वेळेवर पोहोचल्याने पालघरसारखी घटना होता-होता टळली.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथून हे चार साधू हे कर्नाटकात देवदर्शनासाठी गेले होते. यानंतर हे साधू विजापूरवरुन सांगलीमधील जत तालुक्यात लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. या साधूनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला होता. परंतु, या तरुणाला हे चार साधू मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि तरुणाने ही माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी त्यांची मोटार अडवून विचारणा करीत असतानाच काहींनी मोटारीतून त्यांना बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी व चामडी पट्टय़ाने बेदम मारहाण केली. नेमचंदनाथ गोसावी, राजू गोसावी, पप्पू गोसावी आणि प्रेमशंकर अशी या साधूंची नावे आहेत.या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली. या प्रकरणावर पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केले आहे.आरोपींची नावे पुढीलप्रमाणे,आमसिद्ध तुकाराम सरगर, लहु रकामी लोखंडे, मुत्याप्पा वडीयार, नागराज पवार, भावसाहेब शिंदे रा गिरगाव खंडु टिळे रा लवंगा व इतर 10 ते 15 अनोळखी इसमांनी साधूंवर प्राणघातक हल्ला केला होता.सदर गुन्ह्याचा पूढील तपास सपोनि पवार सो याचे आदेशाने पोसई खरात हे करीत आहेत.
या साधूंची उदारता
साधू म्हणजेच ‘सज्जन’.साधू, हा हजारो वर्षांपासून रूढ झालेला शब्द. समाजात जसे असूर आहेत, तसे साधूही. साधुत्वाची व्याख्या मोठी आहे. दांभिक नसणारा, समाजाच्याच नव्हे, तर निसर्गाच्या भल्यासाठी नि:स्वार्थीपणे काम करणारा प्रत्येक जण साधूच असतो. संत तुकाराम महाराज यांनी, ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथिची जाणावा’ या रचनेद्वारे साधुत्वाची खरी ओळखच सांगितली आहे.याच अभंगाला,उक्तीला अनुसरून जखमी साधूंनी आपल्या उदारतेचा परिचय समाजाला करून दिला आहे.मनात कोणतेही कलुश न ठेवता रुग्णालयात उपचारानंतर हे साधू तक्रार दाखल न करता पुढील देवदर्शनासाठी मार्गस्थ देखील झाले आहेत.
‘जगतपालक’ भगवान साधूंचे,भक्तांचे सदैव रक्षण करतील यात शंका नाही. मात्र समाजाने अत्यंत सजग राहणे आवश्यक आहे हेच खरे …