News

निजामाच्या कैदखान्यात संघाची शाखा लावणारा ‘शरारती’ कैदी

‘ध्यानात घ्या सोन्याच्या पिंजर्‍यात राहणारा, मालकिणीच्या हातुन रोज गरम पाण्याची अंघोळ,रोज खायला डाळींबाचे दाणे ही व्यवस्था असून सुध्दा जर पिंजर्‍याचा दरवाजा चुकून उघडा राहिला तर कुणाच्या लक्षात येण्याआधी उडून जातो ,बेताची बुध्दी असलेल्या पोपटाला हे कळते ..तर आपण माणसा सारखे माणसं आहोत. आपल्याला स्वातंत्र्य नाही..’ एक किरकोळ शरीरयष्टीचा तरूण निर्भयपणे बोलत होता लोक मंत्रमुग्ध होवून ऐकत होते..बंदोबस्तासाठी असलेल्या वीस पंचवीस पोलिसांची त्याने पर्वा केली नाही.तो तरूण होता प्रल्हाद अभ्यंकर! गुलमंडीवरील सुपारी मारूतीसमोर दोनतीनशे लोक जमले होते पोलिस आले होते. त्यांच्या सामोर तो बोलत होता. पोलिसांना पाहिल्यानंतर गर्दी पांगली.प्रल्हाद अभ्यंकरसह पाच जणांना पकडून पोलिसांनी ठाण्यात नेेले.

ही कथा आहे हैदराबादच्या मुक्‍ती संग्रामात औरंगाबाद येथे घडलेल्या घटनेची. हा तरूण प्रल्हाद अभ्यंकर म्हणजे पुढे हैदराबाद मुक्‍त होवून स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रान्त संघचालक झालेले प्रल्हादजी अभ्यंकर होय. हैदराबादच्या मुक्‍तीसंग्रामात रा.स्व. संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सत्याग्रहात होते.

प्रल्हादजी अभ्यंकर हे मूळचे गंगापूर तालुक्यातील नेवरगांवचे राहणारे. व्यवसाय शेती. त्या काळी पोटापाण्यासाठी ते मुंबईत गेले. तेथे महिना ७ रू. पगाराची नोकरी मिळाली. तेथे एकदा संध्याकाळी मैदानात फिरायला गेले असता तेथे संघाची शाखा दिसली. त्यामुळे ते संघाच्या संपर्कात आले आणि पुढे कायमचेच स्वयंसेवक झाले. संघशाखेत अनेक विषयांवर रोज चर्चा व्हायची.

तेव्हा हैदराबाद संस्थानात हिंदूंची कशी कुचंबना होत आहे. अगदी परवानगीशिवाय सत्यनारायणाची पूजा सुद्धा करता येत नाही अशा अनेक जाचक अटी हिंदूंना घातल्या आहेत. त्यामुळे हैदराबाद संस्थानातील हिंदू दबून राहत होते. चळवळ, संघर्ष करण्याचीही त्यांची उर्मी कमी झाल्याची चर्चा होती. संस्थानातील हिंदू कार्यकर्त्यांनी बाहेरील कार्यकर्त्यांच्या मदतीने निजामाच्या या अटींचा नि:शस्त्र प्रतिकाराची योजना आखली होती. आपले मूळ गाव मराठवाड्यात आणि निजाम संस्थानमध्ये असल्याने आपणही तेथे जावून या चळवळीत भाग घ्यावा अशी तीव्र इच्छा प्रल्हादजींना होवू लागली. औरंगाबाद जिल्ह्यातील नेऊरगाव येथील १९३८ च्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या स्वयंसेवकांनी फार मोठ्या प्रमाणात सत्याग्रहात भाग घेतला व निजामी शासनाची शिक्षा सहन केली.

मग त्यांनी मुंबईतील तत्कालीन संघचालक दादा नाईक यांची भेट घेवून त्यांची परवानगी काढली आणि सूचनेनुसार आधी पुण्यात केसरीवाड्यात आले. तेथून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वीय सहाय्यक गजानन दामले, बटी चव्हाण, धोंडू सातवसे, घाणेकर, क्षीरसागर यांच्यासोबत मनमाडपर्यंत आले. मनमाडहून थेट औरंगाबादकडे गेलो तर निजामाचे गुप्‍त पोलिस आपल्याला पकडू शकतात हे लक्षात घेवून रात्रीच्या मोटारीने पैठण येथे गेले. तेेथे नाथषष्ठीच्या जत्रेत ते मिसळले. पैठणहून हे ६ जण पायीच औरंगाबादकडे निघाले. कमालीचे ऊन, जवळचे पैसे संपलेले मात्र सत्याग्रह औरंगाबादलाच जावून करायचा याचा निग्रह केलेला होता. संध्याकाळी औरंगाबादला पोहोचले. तेथे कांजीभाईच्या हॉटेलमध्ये गेेले. तेथे मालकाला विश्‍वासात घेवून त्यांना आपण सत्याग्रही असल्याचे सांगितले. त्यांनी यांना मागच्या बाजूच्या खोलीत नेवून बसविले आणि खायला दिले. खाणं संपते न संपते तोच हॉटेलच्या दारात पोलिस आले. मालकाने शिताफीने पोलिसांना बोलण्यात गुंतवले आणि या कार्यकर्त्यांना मागच्या दाराने बापूराव देव वकीलाच्या घरी जाण्याचा निरोप दिला. तेथेही मागच्या दाराने प्रवेश झाला.

दुसऱ्या दिवशी सुपारी हनुमान मंदिरासमोर सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. सकाळी बरोबर १० वाजता ठरल्याप्रमाणे सर्वजण सुपारी हनुमानकडे निघाले. तिथे “जुलमी राजवट नष्ट करा, भारत माता की जय” अशा घोषणा या सर्वांनी देण्यास अचानक सुरूवात केली. आजुबाजुचे लोक पहायला जवळ आले आणि तेही घोषणा देण्यात सामील झाले. सुमारे दोनशे ते तीनशे लोक जमा झाले होते. प्रल्हादजींचे तेथे एक जोरदार भाषण झाले. त्याचवेळी लोकही घोषणा देवू लागले. तेवढ्यात तेथे २० – २५ पोलिस आले आणि त्यांनी गर्दीला पांगवले. प्रल्हादजींसह पाच जणांना पोलिस ठाण्यात नेवून गुन्हा दाखल केला.

त्यांना आधी पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये अत्यंत गचाळ वातावरणात झोपावे लागले. दुसर्‍या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले तेथे पुढील तारीख देण्यात आली आणि पुढील तारखेपर्यंत जेलमध्ये रवानगी झाली. जेलमध्ये काय वाढून ठेवले याचा विचार करत प्रल्हादजी आणि इतर चारजण असे पाच जण भीत भीत आत गेले. तर तेथे चक्‍क संघाची शाखाच चालू होती. जेलमधल्या शाखेत हुतूतूचा खेळ चालू होता. जवळजवळ दीडशे स्वयंसेवक आत होते. शिक्षेबाबत अंतीम निर्णय होईपर्यंत या जेलमध्ये राहणे भाग होते. या पाच जणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोर्टाच्या बर्‍याच चकरा झाल्या. वकील न घेता या पाचजणांनीच कोर्टातील केस लढवली. कोर्टाने १२ महिने सक्‍तमजुरी व एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सर्वांची रवानगी हर्सुल जेलमध्ये झाली. हर्सुल जेलमध्ये जातानाही पाचजणांनी घोषणा दिल्या. बाहेर ते पहायला बराच हिंदू जनसमुदाय जमला होता. मग सुरू झालं जेलचं जीवन. तेथे मग कदान्‍न खावे लागले. जेवणात आळ्या दिसायच्या त्याकडे दुर्लक्ष करून जेवायचे. एक इंग्रज अधिकारी हॉलिन्स जेलमध्ये भेट द्यायला आला तेव्हा एका कैद्याने सर्व प्रश्‍नांना “भारत” हे उत्तर दिल्याने चिडून त्याने त्या कैद्याला लाथ मारली. त्यावरून सत्याग्रह झाला. त्या अधिकाऱ्याने माफी मागावी यासाठी अन्‍नत्याग करण्यात आला.

अशा प्रकारांमुळे काही कैद्यांची रवानगी परभणी जेलमध्ये करण्यात आली. हे करताना ‘शरारती’ असा शेरा यांच्या नावापुढे लावला होता. परभणी जेलमध्ये संघाची शाखा लावण्यावरून वाद झाला. “शाखा लावू नये” असे सांगूनही शाखा लावणे चालूच राहिले त्यामुळे पुन्हा त्यांचे स्थलांतर हैदराबाद जेलमध्ये झाले. हे करताना शेरा आणखी वाढवून ‘बहोत शरारती’ असा करण्यात आला.

जेलमध्ये मोठे दगड उचलून मैदानाच्या एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे नेण्याची शिक्षा सर्वांना देण्यात आली होती. या सर्वांसोबत बीडचे स्वयंसेवक प्रभाकर पाठक होते. त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांनी माफी मागून सुटका करून घ्यावी असे त्यांना सांगितले तेव्हा त्याने माफी मागण्यास सपशेल नकार दिला. जेलमध्ये मुद्दाम त्याला जास्त मोठे दगड वाहून नेण्यासाठी सक्‍ती करण्यात आली. तो आजारी पडला आणि दवाखान्यात उपचार चालू असताना मरण पावला. प्रल्हादजींनी हा प्रसंग एका ग्रंथात वर्णन केला आहे. चार दिवस जरी आधी सुटका झाली असती तरी प्रभाकर वाचला असता असे त्यांनी नमूद केले आहे. प्रल्हादजींच्या या अनुभवातून या हैदराबाद मुक्‍ती आंदोलनात मोठ्या संख्येने संघ स्वयंसेवक होते आणि जेलमध्ये चक्‍क शाखा लागत होती हे आपल्या लक्षात येते.

संगीता धारूरकर, संभाजीनगर
विश्व संवाद केंद्र, देवगिरी

Back to top button