अस्वच्छता ज्याच्या दारी लंपी तेथे वास करी,

स्वच्छता ज्याच्या दारी लक्ष्मी तेथे वास करी-आपण स्वच्छता ठेवली की वैभव,आरोग्यसंपदा आपोआपच वाढत जाते.
आपला भारत देश जगात अनेक चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे; तशीच ‘अस्वच्छ देश’ अशी भारताची कुप्रसिद्धी देखील आहे…आणि दुर्दैवाने ती खरी आहे. आपण वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो; पण सार्वजनिक स्वच्छतेकडे कळत-नकळत दुर्लक्ष करतो. त्यामुळे प्रदूषणाचा धोका आपल्यावर ओढवून घेतो.
हवा, पाणी, जमीन या आपल्याला निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी आहेत; पण आपल्याला त्याचे मोल कळत नाही. गावातील लोक घरातील सांडपाणी नदीत सोडून नदीचे पाणी दूषित करतात.वाहनांच्या धुरामुळे सर्व हवा दूषित होते,प्रदूषण वाढते,जमिनीची होणारी धूप, वाढणारा नापीकपणा शेतकरीही लक्षात घेत नाही.
आज हा स्वच्छतेचा डोस पाजण्याचे कारण म्हणजे ‘लंपी’ हा गुरांना होणारा सामान्य पण अतिशय वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे.१९२९ मध्ये पहिल्यांदा झंबिया या आफ्रिका खंडातील देशामध्ये ‘लंपी’ आढळून आला होता. १९८९ पासूनच लस देखील उपलब्ध आहे. आता तर संपूर्ण स्वदेशी लस आणि आयुर्वेदिक औषधे देखील उपलब्ध आहे.लसीची उपलब्धता असूनही आळशीपणामुळे व अज्ञानामुळे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे रोग प्रसार आटोक्यात आणण्यात बाधा येत आहे.
‘लंपी स्किन डिसीज व्हायरस’ (LSDV) त्याचे तीन प्रकार आहेत,
-कॅप्रीपोक्सव्हायरस
-गोटपॉक्स व्हायरस
-शीपपॉक्स व्हायरस
लंपी विषाणू (Lampi Virus) हा एक त्वचारोग आहे, गोवंश प्रवर्गातील जनावरांना होत आहे. हा आजार कॅप्री पॉक्स या विषाणू प्रवर्गातील आहे. लंपी हा आजार ज्या जनावरास होतो, त्या जनावरांच्या शरीरावर गोल आकाराच्या गाठी येतात. हा आजार सर्व वयाच्या गाई व म्हशी यांना होत आहे. वयाने लहान जनावरांना हा आजार जास्त प्रमाणात होत आहे. हा आजार मानवास होत नाही, तसेच शेळ्या मेंढ्या यांना सुद्धा हा आजार होत नाही.
लंपी आजार ज्या जनावरास होतो, त्या जनावरांच्या रक्तात लंपी विषाणू हा १ ते २ आठवडे राहतो. लंपी या आजाराचा संक्रमण कालावधी हा ४ ते १४ दिवस असतो. हा विषाणु शरीराच्या सर्वच भागात पसरतो. हा आजार ज्या जनावरास होतो, त्या जनावरांपासून हा आजार दुसऱ्या जनावरात संक्रमण होऊन पसरतो. हा विषाणू जनावरांची लाळ, त्यांच्या डोळ्यातून येणारे पाणी आणि नाकातील स्त्राव यांच्या माध्यमातून जनावरांना देण्यात येत असलेल्या चारा,खाद्य,पाणी याच्या माध्यमातून दुसऱ्या जनावरांना होत आहे. जनावरांच्या वीर्यामधूनही या आजाराचे संक्रमण होत आहे.
लंपी आजार नेमका काय …
-ज्या जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रसार होतो त्या जनावरास १०५ ते १०६ फॅ. एवढा मध्यम ताप येतो. हा ताप जनावरांच्या शरीरामध्ये दोन ते तीन दिवस राहतो.
-जनावरांच्या शरीरावर गाठी येतात आणि चट्टे उमटतात, या गाठी आणि चट्टे बऱ्याच काळ जनावरांच्या शरीरावर राहतात किंवा कायमच्या राहू शकतात.
-लंपी हा आजार झालेल्या जनावरांच्या तोंड, अन्न नलिका, श्वसन नलिका व फुफ्फुसामध्ये पुरळ व अल्सर तयार होतात.लंपी हा आजार झालेल्या जनावरांच्या तोंडातून लाळ गळते. जनावरांच्या जननेंद्रियामध्ये तसेच मानेवर आणि पायावर सूज येते.
-लंपी आजार ग्रस्त जनावरांना भूक कमी लागते त्यांच्यामध्ये अशक्तपणा निर्माण होऊन त्यांच वजन कमी होते.
-लंपी आजार ग्रस्त जनावरांच्या डोळ्यांमध्ये जखमा होतात, तसेच त्यांच्या पायावर सूज निर्माण होते.
-जे जनावर लंपी आजार ग्रस्त आहे आणि गाभण म्हणजेच गरोदर आहे अश्या जनावरांचा गर्भपात होण्याची शक्यता आहे.
लंपी आजारावरील उपचार ( Lumpy disease treatment )
-लंपी हा आजार जनावरांमधील प्रतिकारशक्ती कमी करते त्यामुळे जनावरांच्या त्वचेवर गाठी येतात. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे इतर जिवाणूजन्य आजारांची बाधा सुद्धा होऊ शकते त्यामुळे जनावरांना प्रतिजैविके देणे आवश्यक आहे.
-जनावरांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन A, विटामिन B आणि विटामिन E या औषधाचा उपचार द्यावा. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल.
-बाधित जनावरांना मऊ चारा खायला द्यावा आणि जनावरांना पाण्याची कमतरता भासू देऊ नये.
-जनावरांच्या त्वचेवर गाठी झाल्यामुळे मलम लावावा त्याचप्रमाणे अँटी हिस्टॅमिनिक औषधांचाही वापर करावा.
-लंपी या रोगाची लक्षणे दिसताच बाधित जनावरांना तात्काळ इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.
लंपी या रोगावरील लसीकरण (Vaccination against Lumpy Disease)
शासनाच्या वतीने लंपी (Lumpy) या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्यावतीने राज्य सरकारांना लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या जनावरांना लंपी या रोगाची बाधा होण्यापूर्वी त्यांचे लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून आपल्या जनावरांना लंपी या रोगाचा धोका निर्माण होणार नाही.
देशात या आजारानं शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. लंपी आजारामुळं दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा रोग झालेल्या गाईचं दूध खाल्ल तरी त्याचा काही परिणाम होत नाही. मात्र दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. साधारणपणे ३० ते ४० टक्के दूध उत्पादन घटलंय. दूध उत्पादनावर परिणामाबाबतची निश्चित आकडेवारी समोर आली नसली तरी बऱ्याच ठिकाणी दुभती जनावरे या आजारानं बाधित झाली आहेत.
मागील दोन वर्षे कोरोनामुळं शेतीमाल विक्रीवर निर्बंंध आले होते. बाजार समित्या बंद होत्या. शेतीमाल वहातुकीतही अडथळे होते. परिणामी शेतमाल हाती येऊनही विक्री करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना कवडीमोल दरानं माल विकावा लागला होता. सलग दोन वर्षे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फठका सहन करावा लागला. आता मागील काही महिन्यांपासून शेतीमाल बाजाराची गाडी रुळावर आलीये. त्यातच आता लंपी रोगानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर घाला घातलाय. लंपी रोगानं ग्रस्त जनावरे दगावत आहेत. दूध उत्पादन घटलंय.चर्मउद्योगाचे देखील नुकसान होत आहे,म्हणजेच या रोगामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात आले आहेत.
आधुनिक नर्सिंगची सुरवात करणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल या ब्रिटिश परिचारिका होत्या,सार्वजनिक आरोग्य विज्ञानात मोलाची भर घातली.त्यांनी असे नमूद करून ठेवले आहे की,”जितके सैनिक युद्धात मरत नाही तितके सैनिक केवळ अस्वच्छतेने मरतात.” स्वच्छता किती आवश्यक आहे हे या उदाहरणावरून अधोरेखित होते.
“स्वच्छता ज्याच्या दारी लक्ष्मी तेथे वास करी” शेवटी हेच खरे…