CNN च्या पत्रकाराला हरदीप सिंग पुरी यांचे सडेतोड उत्तर “भारत सरकार कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही”
भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. या व्यवहारात भारताकडून मोजले जात असलेले पैसे रशिया युक्रेन विरुद्धच्या लढाईत वापरत आहेत. भारताचा हा व्यवहार अप्रत्यक्षपणे रशियाला लढाईसाठी आर्थिक पाठबळ पुरवत आहे, अशा स्वरुपाचा आरोप करत अमेरिकेतील सीएनएन या वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीने भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला पुरी यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.भारत रशियाकडून एकूण तेलाच्या गरजेपैकी फक्त ०.२ टक्के तेल खरेदी करतो. भारताकडे सध्या इराकमधून मोठ्या प्रमाणावर तेल येते, असे पुरी यांनी सांगितले. रशिया आणि युक्रेन यांच्यातील लढाईची सुरुवात फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली.(या युद्धाला आता २५० दिवस झाले आहे ) यानंतर अमेरिका आणि युरोपच्या देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. यातले अनेक निर्बंध आजही कायम आहेत.विशेष म्हणजे निर्बंध असूनही युरोपचे देश दररोज दुपार पर्यंत रशियाकडून जेवढे तेल खरेदी करतात त्याच्या एक तृतियांश तेल भारत खरेदी करतो.मागील महिन्यातही भारताने रशियाकडून नाही तर इराककडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी केली आहे, अशी माहिती हरदीप सिंह पुरी यांनी दिली. या उत्तराने सीएनएन या वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधी बेकी एंडरसनची अक्षरशः ‘बोलती बंद’ झाली.
भारत आज कोणत्याही देशाच्या दबावाला बळी पडून स्वतःचे तेलाशी संबंधित व्यापाराचे निर्णय घेत नाही. देशाचे तेलाच्या व्यवहाराशी संबंधित निर्णय हे गरजांचा विचार करूनच घेतले जातात,याआधी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही भारत रशियाकडून जेवढे तेल खरेदी करतो त्यापेक्षा कैक पट जास्त खरेदी युरोपचे देश दुपारपर्यंत करतात, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. अमेरिका निर्बंध लादते आणि रशियाकडूनच १० टक्के तेल खरेदी करते, असेही जयशंकर म्हणाले होते.
जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये एक गोष्ट विशेषत्वाने पाहायला मिळते ती म्हणजे जेव्हा-जेव्हा त्यात भारताचा उल्लेख केला जातो तेव्हा भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातो. भारताच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो आणि स्वत:ला श्रेष्ठ समजणाऱ्या पाश्चात्य माध्यमांचा वारंवार उल्लेख करून भारताच्या वसाहतवादाचे समर्थन करण्यात येते.
कुंभमेळ्याचा उल्लेख असो वा अन्य कोणत्याही हिंदू धार्मिक सणाचा, परदेशी आणि विशेषत: पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी केवळ भारताची आणि हिंदूंची खिल्ली उडवण्याचे काम केले आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी टाइमसारख्या अमेरिकन मासिकात पंतप्रधानांचे वर्णन ‘डिव्हायडर इन चीफ’ असे करण्यात आले होते.
कोणत्याही पाश्चात्य माध्यमांनी भारताची खिल्ली उडवण्याचा प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार काही नवीन राहिला नाही. याआधीही पाश्चात्य माध्यम समूहांनी भारतीय वास्तुकला, संस्कृती, विज्ञान यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे, असे विविध प्रसंगी दिसून आले आहे.जेव्हा भारताने पोखरण अणुचाचणी केली, मग तो इंदिरा गांधींचा काळ असो, अटलबिहारी वाजपेयींचा काळ असो, त्या काळातही विदेशी माध्यमांनी भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
हॉलिवूड चित्रपटांपेक्षा कमी बजेटमध्ये भारताने मंगलयान लाँच केले आणि पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी केले, तेव्हा 2014 साली अमेरिकन मीडिया ग्रुप न्यूयॉर्क टाइम्सने भारताविषयी एक अत्यंत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित केले होते,याशिवाय, जेव्हा कोरोनाचे संकट आले आणि महामारी टाळण्यासाठी भारतात लॉकडाऊन लागू केले गेले, तेव्हा ब्रिटिश मीडिया ग्रुप गार्डियनने लिहिले की पंतप्रधानांनी भारताच्या एक अब्ज लोकसंख्येवर अचानक विनाशकारी लॉकडाऊन लादले,आणि हा निर्णय देशातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मताच्या विरोधात घेण्यात आला आहे. यासोबतच गार्डियनने असेही लिहिले आहे की, तरुणांची संख्या जास्त असल्याने कोरोनामुळे मरण पावलेल्या भारतीयांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.भारताच्या लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असतानाही याच ब्रिटिश मीडियाने याकडे साफ दुर्लक्ष केले. सर्वाधिक काळ लॉकडाऊन सुरू असलेल्या देशांमध्ये ब्रिटनचा समावेश आहे.
नुकतेच लेस्टरमध्ये इस्लामिक जिहादींनी हिंदूंवर केलेल्या हल्ल्यांच्या बाबतीत, ब्रिटीश मीडियासह अनेक परदेशी मीडिया समूहांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा समावेश असलेल्या एकतर्फी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आणि भारतीयांच्या प्रतिष्ठेला कलंक लावण्यासाठी आणि इस्लामिक जिहादींप्रमाणे हिंदूंची प्रतिमा ‘कट्टरपंथी’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी एका विशिष्ट अजेंड्याखाली अपप्रचार केला. हे तेच लोक आणि तीच माध्यमे आहेत जी भारतातील लोकशाही संपवल्याबद्दल बोलतात, भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह लावतात, भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्यावर लेख लिहितात आणि भारताच्या व्यवस्थेची खिल्ली उडवतात.
किंबहुना, या पाश्चात्य माध्यमसमूहांमध्ये अजूनही वर्णद्वेषाची भावना इतकी जास्त आहे की, पूर्वेकडील देशांनी, विशेषत: विकसनशील देशांनी,त्यांच्या म्हणण्यानुसार आपली परराष्ट्र धोरणे ठरवावीत आणि त्याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांना वाटते. “गेले ते दिवस” हे त्यांच्या लक्षात का येत नाही ?
रशिया-युक्रेन वादावर चालू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मतदानादरम्यान भारताने मतदानापासून दूर राहणे पसंत केले होते, तर पश्चिमेकडील बहुतेक देशांनी रशियाच्या विरोधात मतदान केले होते. या काळात भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि मुत्सद्देगिरीबद्दल परदेशी माध्यमांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.
खरे तर विदेशी माध्यमांना भारतातील अनेक नेते आणि प्रतिनिधींनी विविध प्रसंगी आरसा दाखवला आहे. भारताचे विद्यमान परराष्ट्रमंत्री एस जयशंकर असोत किंवा माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, विरोधी पक्ष नेते शशी थरूर असोत किंवा इतर कोणीही असोत, सर्वांनी जागतिक स्तरावर अहंकारी गोऱ्या कातडीच्या प्रभूसत्तेवर टीका केली आहे. असे असूनही, आजही विदेशी मीडिया केवळ भारताबाबत पूर्वग्रहदूषितच नाही, तर एका विशिष्ट अजेंडाखाली काम करत आहे.
चीन विरोधात आम्ही तुम्हाला हवे असतो,यूरोपात गहू कमी पडला की आम्ही हवे असतो,स्वस्त औषधें हवी तेव्हा आम्ही आठवतो ..इतक सगळं करून देखील निंदानालस्ती करायला देखील आम्हीच…
हा महत्वाकांक्षी भारत आहे, या पुढे “आरे ला कारे” करणारच !