Never Again…
खरं म्हणजे Never Again हे इजरायलचे घोषवाक्य आहे. जर्मनीच्या क्रूरकर्मा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलरने १९३३ ते ४५ दरम्यान, जर्मनीतील व त्याने जिंकलेल्या युरोपातील ६५ लाख ज्यूंचे निर्दयी हत्याकांड केले. पुढे ज्यूंनी १९४८ साली “इजरायल” हे आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. भविष्यात पुन्हा ज्यूंचे असे हत्याकांड घडू नये यासाठी त्यांनी Never Again ची गगनभेदी घोषणा केली. मात्र त्याच वेळी आपली ही घोषणा सार्थ ठरवण्यासाठी, इजरायलने लगेचच मोसाद (MOSSAD) या गुप्तचर संघटनेची देखील स्थापना केली. मोसादच्या कारवाया दंतकथा वाटाव्यात इतक्या अकल्पनीय आहेत. आज मोसाद ही जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तचर संस्था मानली जाते व तिच्यामुळे इजरायल ५८ मुस्लिम राष्ट्रांच्या विळख्यात देखील सुरक्षितपणे उभे राहू शकलेले आहे. इजरायलकडे किंवा जगातील कोणत्याही ज्यूकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास, मोसाद त्याचा अत्यंत निर्दयीपणे बदला घेते, या प्रचंड धास्तीपोटीच जगभरातील ज्यू सुरक्षित आहे.
“राष्ट्र सर्वोपरी” हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून २०१४ साली केंद्रात स्थानापन्न झालेल्या नरेंद्र मोदी सरकारने, जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांच्या चिनी सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षातून जणू इजरायल सारखाच Never Again चा चंग बांधलेला आहे.
भारत व चीन यांच्यामधील LAC वर गस्त घालणाऱ्या सैनिकांनी एकमेकांवर गोळीबार करायचा नाही, हे दोन्ही देशांमध्ये ठरलेले आहे. त्यामुळे गस्त घालताना बहुतांशी हे सैनिक नि:शस्त्र असतात. दुर्दैवाने याचाच फटका गलवान खोऱ्यात आपल्या कर्नल संतोष बाबुंना पडला. चिनी सैनिकांच्या घुसखोरीचा जाब विचारायला त्यांच्या चौकीवर गेलेल्या नि:शस्त्र कर्नल संतोष बाबूंना चिनी सैनिकांनी काटेरी तारा लावलेल्या सोट्याने प्रहार करून ठार मारले. त्यानंतर येथे उडालेल्या चकमकीत आपल्या नि:शस्त्र जवानांनी किमान ४० चिनी सैनिकांना यमसदनी धाडले. अर्थात हा त्यांना दिल्या गेलेल्या २४ आठवड्यांच्या ज्युडो कराटेसह इतर अनेक प्रकारच्या डावपेचांच्या प्रशिक्षणाचा परिणाम होता. दुर्दैवाने या संघर्षात आपल्याही २० सैनिकांना वीरमरण आले.
गलावान खोऱ्यातील या जीवघेण्या संघर्षानंतर, केंद्र सरकारने भारत चीन सीमेवर तैनात असलेल्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) जवानांना आता इजरायली मार्शल आर्ट व जपानी आईकिडो या दोन नवीन मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.
पंचकुला येथील प्रशिक्षण केंद्रात ITBP च्या अंदाजे २० हजार सैनिकांना या दोन्ही मार्शल आर्ट्स मध्ये साधारणतः ३ महिन्यांचे प्रशिक्षण देऊन तरबेज करण्यात आले आहे.
यामुळे आता आपले जवान शस्त्रहीन असताना देखील शत्रूचा समर्थपणे मुकाबला करू शकतील. यापुढे सीमेवर गस्त घालणाऱ्या आमच्या नि:शस्त्र सैनिकांशी कोणत्याही प्रकारची आगळीक केल्यास, चिनी सैनिकांना “लेने के देने पड जायेंगे” एवढे निश्चित.
हे प्रशिक्षण म्हणजे गलवान खोऱ्यातील संघर्षातील हुतात्मा कर्नल संतोष बाबू व इतर २० सैनिकांच्या बलिदानाला वाहिलेली खरीखुरी श्रद्धांजली आहे.
होय… आता हा १९६२ पूर्वीचा पंचशीलच्या धोरणांना एकतर्फी कवटाळून बसलेला व शांततेची पांढरी कबुतरे उडवणारा भारत राहिलेला नाही तर … घर मे घुसकर मारने वाला… हा “नया भारत” आहे.