भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पाठयवृत्तीला सुधाकर यांचे नाव देणार – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
-सुधाकर राजे यांची पत्रकारिता व्यासंगी
-लिखाणातून राष्ट्रीयतेचे दर्शन
-मूलभूत चिंतनाचे नेमक्या शब्दातून प्रकटीकरण
व्यासंग आणि पत्रकारिता यात अंतर पडत असताना ज्येष्ठ आणि व्यासंगी पत्रकार, लेखक सुधाकर राजे यांची स्मरण करणे औचित्यपूर्ण आहे. वाचन आणि मूलभूत चिंतन याचे लेखक म्हणून नेमक्या शब्दात प्रकटीकरण करणारे सुधाकर राजे एक आदर्श स्थापीत केला आहे; असे प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, भाजपाचे वरिष्ठ नेते, माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. सुधाकर राजे यांच्या श्रद्धांजली सभेत डॉ.विनय सहस्त्रबुद्धे बोलत होते. बडोदा, दिल्ली आणि दीर्घकाळ मुंबईत पत्रकारिता, स्तंभलेखन आणि लिखाण करणाऱ्या, संदर्भकार आणि संशोधक म्हणून काम करणाऱ्या सुधाकर राजे यांचे नुकतेच वयाच्या अठ्ठाणव्या (९८) वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
सुधाकर राजे यांनी हिंदू व्हिजन या मासिकाचे संपादन केले होते. ऑर्गनायझर या साप्ताहिकात त्यांनी दीर्घकाळ स्तंभ लेखन केले होते. सुधाकर राजे यांनी एकूण बावीस पुस्तके लिहिली आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान येथे सुधाकर राजे सक्रिय होते. सुमारे सत्तर वर्ष लिखाण करणाऱ्या सुधाकर राजे यांच्या स्मृतीचा जागर करण्यासाठी राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास, हिंदुस्थान समाचार, विश्व संवाद केंद्र आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांनी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. सदर सभा रविवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी प्रबोधीनीच्या सभागृहात झाली. यावेळी व्यासपीठावर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री रामभाऊ नाईक, सुधाकर राजे यांचा मुलगा ललित राजे, फिन्सचे प्रवर्तक ऍड. बाळ देसाई उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सुधाकर राजे यांच्या अभ्यासक वृत्तीची समीक्षा केली.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेततर्फे परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचे नाव देण्याची घोषणा विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली. सुधाकर राजे यांच्या साहित्य संपदेचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला जसील असे आश्वासन विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिले. सुधाकर राजे यांचा मुलगा ललित राजे यांनी आपल्या वडिलांच्या हृद्य आठवणी सांगितल्या. परिपूर्ण, समृद्ध आयुष्य जगणाऱ्या बाबांच्या मृत्यूच्या शोक करण्यापेक्षा बाबांनी दिलेला आनंद वाटण्यावर आम्ही राजे कुटूंबीय भर देऊ असे ललित राजे म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी सुधाकर राजे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पत्रकारितेचे विश्लेषण केले. विश्व संवाद केंद्राचे माजी कार्यवाह मोहन ढवळीकर यांनी सुधाकर राजे यांच्या संपादकीय दृष्टीकोनाची माहिती दिली. रामभाऊ नाईक यांनी सुधाकर राजे यांच्या दिल्लीतील आठवणींना उजाळा दिला. श्रद्धांजली सभेचे नेटके आणि संदर्भयुक्त सूत्रसंचालन पत्रकार, लेखक मकरंद मुळे यांनी केले.