आत्मनिर्भर भारताचा आणखी एक “विक्रम”..
भारतातील पहिले खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट विक्रम-S (Vikram-S) प्रक्षेपित झाले
अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील आघाडीच्या देशांमध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये आहे. भारताने आतापर्यंत केलेली कामगिरी जगाचे डोळे दिपवणारे आहे. मंगळावरची स्वारी असो की चंद्रावरील स्वारी असो, भारताने दिमाखात पावले टाकली आहेत.
Mission Prarambh : भारतातील पहिले खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट विक्रम-S (Vikram-S) प्रक्षेपित झाले असून देशात पहिल्यांदाच इस्रोने (ISRO) अशाप्रकारचे रॉकेट प्रक्षेपित केले आहे. याचे प्रक्षेपण १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता इस्रोच्या श्रीहरिकोटा येथून केले गेले. हे रॉकेट हैदराबादस्थित कंपनी स्कायरूट एरोस्पेसने बनवले असून त्यात तीन पेलोड असतील. या मिशनला ‘प्रारंभ’ (Mission Prarambh) असे नाव देण्यात आले आहे. विक्रम-एस असे या रॉकेटचे नाव असून देशातील अंतराळ विज्ञानाच्या इतिहासातील हा एक ‘टर्निंग पॉइंट’ आहे.
प्रथमच एका खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित होणार
देशात प्रथमच एका खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित होणार आहे. श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून हे प्रक्षेपण होणार आहे. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस कंपनीने हे रॉकेट बनवले आहे. कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ही चाचणी उड्डाण आहे. इस्रोने १८ नोव्हेंबर २०२२ रोजी याच्या उड्डाणासाठी प्रक्षेपण विंडो निश्चित केली आहे.विक्रम-एस असे या रॉकेटचे नाव आहे. ज्याला प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले आहे. या प्रक्षेपणाला ‘मिशन प्रारंभ’ असे नाव देण्यात आले आहे.
रॉकेट प्रक्षेपित करणारी पहिली खाजगी अंतराळ कंपनी
या मोहिमेसोबतच, हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारी पहिली खाजगी अंतराळ कंपनी बनणार आहे.याला ऐतिहासिकही म्हणता येईल,कारण या मोहिमेमुळे अवकाश क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
स्कायरूट आणि इस्रो यांच्यात सामंजस्य करार
या प्रक्षेपणासाठी स्कायरूट आणि इस्रो यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. स्कायरूटचे सीओओ आणि सह-संस्थापक नागा भारत डाका यांनी सांगितले की, विक्रम-एस रॉकेट हे सिंगल-स्टेज सब-ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल आहे. जे त्याच्यासोबत तीन पेलोड घेऊन जात आहे. ही एक प्रकारची चाचणी आहे. त्यात यश आल्यास खासगी अंतराळ कंपनीच्या रॉकेट प्रक्षेपणाच्या बाबतीत भारत जागतिक आघाडीच्या देशांमध्ये सामील होईल.
विक्रम-एस काय आहे?
विक्रम-एस हे सिंगल स्टेज रॉकेट आहे, जे सब-ऑर्बिटल प्रक्षेपण रॉकेट आहे. जे श्रीहरिकोटा येथून तीन पेलोडसह उड्डाण करेल. स्कायरूट एरोस्पेसने अवकाश कार्यक्रमाचे जनक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून रॉकेटचे नाव विक्रम ठेवले आहे. ही कंपनी व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी अत्याधुनिक प्रक्षेपण वाहने तयार करते.
खाजगी कंपन्यांना सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांना संशोधनास परवानगी देण्यासाठी एक ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ, संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र’ नावाची स्वायत्त संस्था आहे. खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ती कार्यरत आहे .खाजगी कंपन्यांना अंतराळ अभ्यास काही नवा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक खाजगी कंपन्या इस्रोला आवश्यक त्या वस्तुंचा पुरवठा करीत आल्या आहेत. मात्र आता त्या प्रत्यक्ष मोहिमांत सहभागी होऊ शकणार आहेत किंवा संशोधन करू शकणार आहेत. त्यामुळे अर्थातच अंतराळ संशोधनाच्या कक्षा रुंदावणार आहेत. अमेरिका, रशिया, चीन तसेच युरोपातील अनेक देश यापूर्वीपासूनच खाजगी कंपन्यांना आपल्या मोहिमांत सहभागी करून घेत आले आहे. त्यामुळे अर्थकारणाच्याही कक्षा रूंदावू लागल्या आहेत.खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून इस्रोच्या पायाभूत सुविधांचाही एका मर्यादेपर्यंत वापर करू दिला जात आहे.
आज जगात सर्वच क्षेत्रात तीक्ष्ण अशी स्पर्धा आहे तशी ती अंतराळ संशोधनातही आहे. भारताने अमेरिकेसह अनेक बलाढ्य देशांच्या शेकडो उपग्रहांचे यशस्वी उड्डाण यापूर्वी केलेच आहे. जागतिक स्तरावर जर भारताच्या अंतराळ विश्वाची व्याप्ती वाढवायची असेल तर खाजगी कंपन्यांना सहभागी करून घेणे सोयस्कर ठरू शकेल. शिवाय जागतिक स्पर्धेत टिकाव धरायचा असेल तर संशोधनाची व्याप्ती वाढलीच पाहिजे. शिवाय इस्रोवर पडत असलेला ताण थोडासा त्यामुळे सैल होणार आहे आणि नव्या संशोधनाला पुरेसा वेळ मिळणार आहे.
कोणे एकेकाळी सायकलवरून रॉकेटचे पार्ट वाहून आणावे लागत होते,एक तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे.म्हणतात ना- “वक्त बदलते देर नहीं लगती”.
भारत राष्ट्रासाठी अविश्रांत मेहनत करणाय्रा शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान आहे.
जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान