Opinion

चला.. संविधान साक्षर होउ या!! – भाग १

भारतीय गणराज्याचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ह्या दिवशी अस्तित्वात आले.संविधानाविषयी (constitution) जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने “चला, संविधान साक्षर होऊ या” ही लेख मालिका सादर करीत आहोत.

संविधानाची प्राथमिक ओळख व्हावी, त्या विषयी उत्सुकता वाटून वाचकांनी संविधानाचा अधिक अभ्यास करायला उद्युक्त व्हावे हाच ह्या मालिकेचा हेतू. तेव्हा Stay tuned! वाचत राहा – पुढचे काही दिवस, दररोज- अतिशय सोप्या शब्दात सामान्य भारतीय नागरिकाने लिहिलेली ही लेख मालिका!

———————————

भारतात लोकशाही राज्यपद्धती आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. ते राज्य व्यवस्थितरीत्या करायचे असेल, चालायचे असेल तर आपल्याला देशाचे संविधान माहीत असणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधान साक्षर असणे गरजेचे आहे.

राज्यघटनेतील तरतुदी काय ? त्या तशा असण्यामागील तात्कालिक करणे काय होती? आपल्या इतिहासातील अनुभव काय होते? भविष्य कसे असावे ह्याविषयी घटनाकारांच्या डोळ्यांपुढे उभे असलेले चित्र कसे होते? ह्या सगळ्याचा अभ्यास आणि विचार आपल्याला संविधान समजून घेताना उपयोगी ठरतो.

आपले हक्क काय हे माहिती असण्यासोबतच आपली कर्तव्ये काय हे देखील माहिती पाहिजे. आपली राज्यपद्धती, न्यायपालिका ह्या साऱ्यांविषयी जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ते माहिती नसल्यानेच जे चालले आहे ते, जसे चालले आहे तसे ,चालवून घेण्याची प्रवृत्ती वाढते. ह्यामुळे नागरिकांचे तर नुकसान होतेच पण देशाच्या प्रगतीचा वेग देखील मंदावतो.

म्हणूनच संविधान काय आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. शाळेत असताना आपण संविधान वाचतो, शिकतो, प्रश्नांची उत्तरे लिहितो, मार्क मिळवतो आणि मग नंतर ते सगळे विसरून जातो. असे विसरणे सोपे आणि सोयीचे असले तरी उचित नाही. आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करीत असताना संविधान समजून घेण्याचा संकल्प करू या.

भारताच्या जनतेने, जनतेसाठी तयार केलेले हे संविधान आहे. हे संविधान केवळ कागदावर न राहता त्याचे जनतेने आचरण केले तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होणार आहे. संविधान बळकट होऊ शकणार आहे. संविधानचे रक्षण करण्याची ताकद जनतेतच आहे. म्हणून देशातील नागरिकांनाच संविधानाची माहिती असणे आवश्यक.

आज भारतीय जनतेला राजकारणात रुची असते, पण ती पक्षीय राजकारणात असते. देशाचा कारभार हाकण्याचा मूलभूत आधार असलेल्या संविधानाविषयी नसते. संविधानात प्रतिबिंब पडलेले असते आपल्या इतिहासाचे, भूतकाळातील देशाने दिलेल्या लढ्याचे, सोसलेल्या विपदांचे. तिच्यात सामर्थ्य असते केवळ वर्तमानच नाही तर देशाचे भवितव्य सुरक्षित आणि उज्वल करण्याचे. इतके महत्वाचे असलेले असे संविधान भारतीय नागरिकांनी आत्मसात केले नाही, त्यांना संविधाना विषयी, त्या समोरील आव्हानांविषयी, सतत ते कालानुरूप अधिकाधिक अद्ययावत करण्याविषयी, माहितीदेखील नसेल तर मग काय उपयोग ह्या साऱ्याचा?

आपल्याच म्हणजे भारतीय जनतेच्या प्रतिनिधींनी तयार केलेले हे संविधान आहे. द्विरुक्तीचा दोष पत्करून देखील पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते की संविधानाची शक्ती केवळ त्याच्या लिखित रूपात नाही तर राज्यव्यवस्था आणि जनता त्याचा अर्थ प्रत्यक्षात कसे जगतात, तो अर्थ प्रत्यक्षात कसा आणतात ह्यावर अवलंबून आहे.

तेव्हा ..चला.. संविधान साक्षर होऊ या.

लेखिका:- वृंदा टिळक

Back to top button