News

कोरा कागज़ ,.. चीन आणि… शी जिनपिंग

कोरोना सारखे संसर्गजन्य आजार याआधीही आपल्या सोबत होते, आताही आहेत आणि यापुढेही राहाणार आहेत. प्रत्येक आजाराने आपल्याला खूप काही शिकवले आहे.

नुसतं हातात फलक जरी घेतले तरी निर्दयी चिनी सरकार आंदोलकांना जेलमध्ये डांबत आहे,त्यावर उपाय म्हणून लोकांनी कोरे कागद निदर्शनास आणले आहेत.काय म्हणावे याला ?.. दैवगती दुसरे ते काय !!

जगभरात कोरोनाची (Corona) चर्चा जवळपास संपलीये मात्र चीनमध्ये (China) खळबळ उडाली आहे, जनता रस्त्यावर उतरली आहे. जे दिसत आहेत ते चीनसारख्या देशात फारसं पहायला मिळत नाही. तिथं पोलीस आधीच आंदोलन चिरडून टाकतात किंवा अशा आंदोलनांची चित्रं चीनमधून अजिबात बाहेर पडत नाहीत. यावेळी, मात्र पश्चिमेकडील शिनजियांगपासून मध्य चीनमधील झेंझोऊ ,दक्षिणेकडील चोंगकिंग आणि ग्वांगडोंगपर्यंत लोक रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण जग चिनी लोकांचा आक्रोश पाहत आहे.

सहसा, चीनसारख्या देशात जेव्हा आंदोलने होतात तेव्हा सरकार त्याला पाश्चिमात्यांचे षड्यंत्र म्हणत ते खोडून काढण्याचा प्रयत्न करते. मात्र यावेळी प्रकरण गंभीर आहे. याचे कारण म्हणजे कोविड-१९, ज्याचा प्रसार रोखण्यासाठी(zero covid policy) लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांविरोधात लोक संतप्त झाले आहेत.”राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हटवा, चिनी कम्युनिस्ट पक्ष हटवा, आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे., आम्हाला मानवी हक्क हवे आहेत, आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे.”

जून २०२० मध्ये जेव्हा कोरोना जगात पसरत होता, तेव्हा चीनने पूर्व लडाखमध्ये युद्ध पुकारण्याचा प्रयत्न केला. साथीच्या रोगाविरुद्ध एकत्र लढण्याऐवजी त्यांचे सैनिक युद्ध वल्गना करत होते, इवल्या तैवानला डोळे दाखवत होते.शिवाय, जगाचा चीनच्या मालावर विश्वास उरलेला नाही. कोरोनाच्या काळात जिथे भारताची लस जगभरातील लोकांचे प्राण वाचवत होती, तिथे चीनची लस महाग व प्रभावहीन असल्याने परत पाठवली जाऊ लागली. गलवानमध्ये जे काही घडले ते शी जिनपिंग यांचे धोरण मानले गेले.महामारीच्या गंभीर काळातही शी यांच्या याच चुकीच्या धोरणामुळे देशवासीयांना आता कोरोनाच्या कहराचा सामना करावा लागत आहे.

चिनी लोकांचा राग त्यांच्याच सरकारवर आहे. तेथील सोशल मीडियावर आक्रमकता दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर निदर्शने का सुरू झाली आणि ती पूर्वीपेक्षा किती वेगळी आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. साधारणपणे दरवर्षी सामाजिक अशांततेच्या १.५ लाखाहून अधिक घटना चीनमध्ये घडतात, परंतु त्या अत्यंत मर्यादित प्रमाणात स्थानिक श्रेणीतील असतात. म्हणजेच त्यांची व्याप्ती फारच कमी आहे. यावेळी चीनच्या ‘झिरो कोविड पॉलिसी’ विरोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून आवाज उठवला जात आहे. जेव्हा जगभरात कोरोना संसर्गाने लोकांचा बळी घ्यायला सुरुवात केली तेव्हा चीनकडे बोटे दाखवली गेली.

आज २ वर्षांनंतर परिस्थिती अशी आहे की जगाने या विषाणूसोबत जगायला शिकले आहे पण चीनमध्ये परिस्थिती भयावह दिसत आहे. बाकीचे जग विश्वचषक फुटबॉलमध्ये मग्न असताना चीनमधील लोक वेगळ्याच संकटात सापडल्याचे दिसते आहेत.सध्या, चीन हा जगातील एकमेव देश आहे जो कोविडच्या भीषण कहराचा सामना करत आहे.

दरम्यान, एका घटनेने आगीत आणखीनच भर पडली. २४ नोव्हेंबरला, शिनजियांग उईगुर प्रदेशाची राजधानी युरुमी येथे एका उंच इमारतीला लागलेल्या आगीत १० लोक ठार आणि अनेक जखमी झाले. या घटनेमुळे लोकांचा रोष उसळला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आले होते, पण कोविडच्या निर्बंधांमुळे (गेट्स आणि बॅरिकेड्स) हे फार कठीण झाले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये लोक दरवाजे उघडण्यासाठी ओरडताना दिसत होते. काही लोकांनी लिहिले, ‘कोविडमुळे नव्हे तर झिरो-कोविड पॉलिसीमुळे मरण पावलेल्या निरपराध लोकांना श्रद्धांजली.’ उरुमी प्रशासनाने नंतर माफी मागितली आणि निर्बंध शिथिल केले.

चीनचे झेंडे घेऊन आलेले आंदोलक राष्ट्रगीत गात आहेत आणि ‘आम्ही देशाचे नागरिक आहोत, लॉकडाऊन उघडा आणि जनहित जपा’… अशा घोषणा देत आहेत.

याउलट भारत कोरोनाचे संकट मागे सारून प्रगतीपथावर घोडदोड करतोय, ‘१०० दिवस कडक लोकडाउन असून सुद्धा भारतात एकही भूकबळी गेला नाही’ ही नव्या,समर्थ भारताची ताकद आहे.

म्हणतात ना:-जिनके घर शीशे के बने होते हैं वो दूसरों के घरो पर पत्थर नहीं फेंकते…

Back to top button