IslamNews

भुत्तो भुतावळीचे बांडगुळ… बिलावल.

सध्या भारत अध्यक्ष असलेल्या, राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेदरम्यान इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो (Bilawal Bhutto) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनर्गल टीका केली. त्याचा यथायोग्य समाचार आम्ही यापूर्वीच घेतला आहे.

त्याच वक्तव्यात पुढे जोडून बिलावल भुत्तो यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील विनाकारण गोवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्या, लक्षावधी यहुद्यांना (Jew) छळछावण्यात कोंडून त्यांचे निर्घृण हत्याकांड करणाऱ्या पोलीस दलाकडून; अर्थात SS कडून प्रेरणा घेतल्याचे अकलेचे तारे तोडले आहेत.

१९२५ साली स्थापना झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, (RSS) ने १९३३ साली जर्मनीचा चॅन्सेलर म्हणून ॲडॉल्फ हिटलरने सत्तासूत्रे हातात घेतल्यानंतर स्थापन केलेल्या क्रूरकर्मा SS दलाकडून प्रेरणा घेतल्याचे सांगणे हे, RSS आणि SS चे यमक जुळवण्याच्या नादात; त्याच्या अज्ञानाचे आणि हिंदू अर्थात काफीरांविषयीच्या द्वेषाचे केविलवाणे प्रदर्शन होते.

भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करणारे, जनतेने निवडून दिलेले पंतप्रधान असतात. ते पक्ष विरहित पंतप्रधान असतात. आजच्या पंतप्रधानांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुसंस्कार झाले आहेत, हा त्यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. मात्र भारताचे पंतप्रधान हे आमच्यासाठी भारताचे पंतप्रधान असतात; त्यात पक्षीय राजकारण आणण्याचा कर्मदरिद्रीपणा आम्ही भारतीय कधीच करत नाही. परराष्ट्रीय संबंधांमध्ये तर “वयम पंचाधिकम शतम” हीच आमची भूमिका असते. केवळ द्वेषाच्या मानसिकतेवर पोसलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या आवाक्याबाहेरचा हा विषय आहे. त्याने तो सोडून दिलेलाच बरा.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले आपले आजोबा झुल्फिकार अली भुत्तो आणि पंतप्रधान राहिलेली आई बेनझीर भुत्तो; निव्वळ यांच्या पूर्वपुण्याईवर आजच्या घडीला परराष्ट्रमंत्री असलेल्या बिलावल भुत्तो याचा राजकीय वकूब व कर्तृत्व अतिशय सुमार दर्जाचे आहेत. अन्यथा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती व “मिस्टर टेन परसेंट” म्हणून कुप्रसिद्ध असलेले असिफ अली झरदारी यांच्या या पुत्राने, बिलावलने आपल्या वडिलांचे झरदारी आडनाव सोडून आईचे भुत्तो हे आडनाव लावले नसते. एकूणच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये बिलावल भुत्तो याची प्रतिमा कर्तृत्वशून्य व मातुल घराण्याच्या पूर्व पुण्याईवर जगणारा एक बांडगुळ अशीच आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे देखील भारतावर टीका करताना अनावश्यक रीतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करतात. त्याला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळते. आजच्या घडीला इम्रान खान यांची लोकप्रियता इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये शिखरावर आहे. येत्या निवडणुकीत आपल्या पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तानचे व ती सामील असलेल्या खिचडी महाआघाडीचे पुरते पानिपत होणार आहे हे बिलावल भुत्तो याने मनोमन ओळखले आहे. नजीकच्या भविष्यात होणाऱ्या प्रचंड पराभवाच्या भीतीने बिलावल भुत्तो गारठला आहे. त्यामुळे आपल्यालाही प्रसिद्धी मिळावी, आपणही चर्चेत राहावे व त्यानिमित्ताने जमल्यास आपल्याला थोडीबहुत लोकप्रियता मिळावी म्हणून इमरान खान यांच्या पुढे एक पाऊल टाकून, बिलावल भुत्तो यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे.

मुळात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची स्थापनाच हिंदू धर्माच्या, संस्कृतीच्या व जनतेच्या पराकोटीच्या द्वेषावर झालेली आहे. “द्विराष्ट्र सिद्धांता”च्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली. हिंदू अर्थात काफीरांचा द्वेष हा पाकिस्तानचा डीएनए (DNA) आहे. त्या डीएनएशी सुसंगत असेच बिलावल भुत्तो यांचे वक्तव्य आहे. बिलावल भुत्तोचे आजोबा आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुतो यांनी “भारताशी १,००० वर्षे युद्ध लढण्या”ची वल्गना केली होती तर आई बेनझीर भुत्तो हिने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची पंतप्रधान असताना, जम्मू काश्मीरचे तात्कालीन राज्यपाल जगमोहन यांचे “तुकडे तुकडे करण्या”ची दर्पोक्ती केली होती. त्यामुळे बिलावल भुत्तो यांचे बेताल वक्तव्य हे त्यांच्या एकूणच डीएनएला धरून आहे. मात्र ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून जाहीरपणे मांडण्याची घोडचूक त्यांनी केलेली आहे. त्याची जबर किंमत पाकिस्तानला आज ना उद्या मोजावी लागणारच आहे.

बिलावल भुत्तो यांच्या या आचरटपणाची इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये सुद्धा खूप टिंगल केली जात आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या जनतेनेच एक प्रकारे बिलावलला, काही प्रमाणात का होईना पण त्याची औकात दाखवून दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या शतमुर्ख बिलावल भुत्तोच्या बरळरण्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. संघाला बेताल बिलावलाची दाखल घेण्याची मुळीच आवश्यकता नाही, संघाची तशी प्रवृत्तीही नाही. संघाचा आपल्या सिद्धांतावर, कार्यपद्धतीवर आणि कार्यकर्त्यांच्या अनन्य निष्ठेने अपरिमित कष्ट करण्याच्या कर्मयोगावर नितांत विश्वास आहे. त्यात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या स्तुती अथवा निंदेने काहीही फरक पडणार नाही.

संपूर्ण जग संघाला चांगलेच ओळखते आणि बिलावल भुत्तोला देखील चांगलेच ओळखून आहे.

कदाचित आपल्या कार्याला संयुक्त राष्ट्रसंघा (UN)सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनायासे ओळख प्राप्त करून चर्चेत आणल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मनातल्या मनात बिलावल भुत्तोला शाबासकीच दिली असेल.

Back to top button