अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३…
संपूर्ण भारताला बंजारा संस्कृतीचे दर्शन घडणार..!!
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गोद्री येथे २५ जानेवारी ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ आयोजित करण्यात आला आहे. हे आयोजन गोर बांधवांच्या कल्पनेतून साकार होत आहे. कुंभाच्या अध्यक्षस्थानी पोहरादेवी येथील प्रमुख गादीपती पूजनीय बाबूसिंगजी महाराज आहेत. भारतात आपली लाखो मंदिरे आहेत म्हणून पोहरागडचे महत्व कमी झाले असे होत नाही. स्वतः बाबूसिंगजी महाराजांनी याची स्पष्टता दिलीय.
बाबूसिंगजी महाराज स्पष्टपणे सांगतात… सर्वांसोबत मिळून काम करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. कोणताही पक्ष, संस्था आमच्या समाजाच्या हिताचे काम करत असेल त्याला सहकार्य करणे, हेच सर्वांच्या हिताचे आहे. आपल्या संतांच्या नेतृत्वात बंजारा समाजाच्या हितासाठी एवढ्या मोठ्या कुंभाचे आयोजन होत आहे, त्याचे कौतुक झाले पाहिजे. हिंदू समाजातील जाती व्यवस्थेत विष कालवून संपूर्ण समाजाला खालच्या थराला नेण्याचा डाव आता समाजाने ओळखला आहे. सर्व समाज बांधवांनी या भव्य कुंभ मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या एकजुटता आणि विराट स्वरूपाचे दर्शन सम्पूर्ण भारताला करून दिले पाहिजे. हा तर आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे की, बंजारा कुंभ नावाने अखिल भारतीय स्वरूपाचा कुंभ होतोय. साधू संतांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्या समाजाला मिळावे आणि त्यामधून आपली सर्वांगीण उन्नती व्हावी, यासाठी हा कुंभ होत असेल तर आम्ही भाग्यवान आहोत.
कोणतीही जात आपले शत्रू नाही आणि आपण कुण्या जातीचे शत्रू नाही. हे सुत्रच आपल्याला सन्मान मिळवून देईल. कुंभ आपला आहे, आपल्यासाठीच आहे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
जाणून घेऊया गोर बंजारा समाजाबद्दल ;-
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि काही प्रमाणात गुजरातमध्ये वसलेला गोर बंजारा समाज. विविध राज्यांत समाजाला विविध नावं आहेत. मात्र, देशभर विखुरलेल्या बंजारा समाजाची एकता-समानता थक्क करणारी आहे!
क्या गेहूं, चावल, मोठ, मटर,
क्या आग धुंआ और अंगारा
सब ठाट पड़ा राहा जाएगा,
जब लाद चलेगा बंजारा
बंजारा समाजाचा तांडा म्हणजे पशूधनावर वस्तू, अन्नधान्य घेऊन प्रवास करणार्या लोकांचा जत्था असे आपल्याला वाटते. मात्र, तो आता भूतकाळ झाला. सध्या बहुसंख्य तांडे हे वस्ती करून राहतात. ज्या गावी ते वस्ती करतात, त्या गावाच्या नावानेच त्यांचा तांडा ओळखला जातो.
हिंदू समाजातील या वैशिष्ट्यपूर्ण समाज घटकामध्येही धर्मांतराचे विष कालवण्याचा प्रयत्न होत आहे. साध्या भोळ्या लोकांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करण्याचा विडा चर्चसंस्थेने उचलला की काय, असे वाटावे असेच वातावरण दिसते.
आता हेच भजन पाहा-
मारो आंग तुच देवा
मारो आखिरी तुच येसू
या बंजारा भाषेतील भजनाचा अर्थ – माझे भवितव्य ही तूच देवा आणि माझे भाग्य ही तूच येसू!
बंजारा भाषेतले हे भजन मात्र यामध्ये संत श्री सेवालाल किंवा पोहरागडाच्या आई अंबादेवीऐवजी देव म्हणून नाव आहे येशूचे! इतकेच काय येशू ख्रिस्तावर बंजारा भाषेमधून चित्रपटही काढण्यात आला आहे. बंजारा भाषेतून उपदेश करणारे चर्च तर आहेतच आहेत. पण, ख्रिस्ती-बंजारा वधूवर मंडळही आहे बरं का? थोडक्यात विविध माध्यमांतून बंजारा समाजाचे धर्मांतर कसे करता येईल याची अगदी जय्यत तयारी आहे. अशा परिस्थितीतही गोर बंजारा समाज स्वत:च्या अस्तित्वाविषयी विशेष महत्त्व राखून आहे.
गोर बंजारा समाजाची स्वतःची मौखिक भाषा आहे. त्या भाषेत समाजाचे आदिसंत भगवान सेवालाल यांची वचने आणि विचारही आहेत. आपल्या भाषेवर समाजाचे खूप प्रेम आहे. आपल्या भाषेला भाषिक दर्जा मिळावा म्हणून समाजाचे मान्यवर प्रयत्नशीलही आहेत. या अशा परिस्थितीमध्ये समाजाच्या प्रिय मातृभाषेतूनच कोणी चित्रपट काढला, धार्मिक उपदेश दिले, धार्मिक गीते तयार केली तर त्याचा परिणाम होणारच. हेच लक्षात घेऊन गोर बंजारा समाजाच्या भाषेतून ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला जात आहे.
धर्मांतराची जी जगभरची पद्धत आहे, तीच पद्धत इथेही आहे. सेवेच्या नावाखाली तांड्यामध्ये शिरकाव करायचा. ‘आम्ही फक्त सेवा करू इच्छितो’ असे या भाबड्या लोकांना पटवून द्यायचे. गावखेड्याच्या दुर्गम भागातील लोकांना थोडीफार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायची, त्यांच्या पशूधनाला झालेला आजार बरा करण्यासाठी औषधं उपलब्ध करून द्यायची. हे सगळे करताना आव असा आणायचा की, ‘तू बरा झालास ते केवळ येशूच्या कृपेने. मूल होत नाही, गरिबी आहे, घरात काही कारणाने क्लेश वगैरे आहे, तर या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला येशूच दूर करू शकतो. त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त येशूच्या दयेखाली यावे लागेल… ख्रिश्चन धर्म स्वीकारा. सगळे दुःख दूर होईल. समस्यांशी लढताना थकून गेलेली व्यक्ती मग अलगद या जाळ्यात सापडते. व्यक्ती चर्चमध्ये तांड्याच्या नकळत जाऊ लागते. तिथे अतिशय मधाळ बोलणारी, आदर देणारी माणसं या व्यक्तीचे अगदी आपलेपणाने स्वागत करतात. अर्थात, हा आपलेपणा नकलीच असतो. शिकार्याने सावजाला सापळ्यात अडकवण्यासाठी लावलेले आमिषच म्हणा ना!
आता प्रश्न असा पडतो की, गोर बंजारा समाजाला का लक्ष्य केले जात आहे? तर हिंदू समाजाला तोडायचे तर यातील प्रत्येक प्रमुख समाज घटकाला तोडले पाहिजे; हेच देशविघातक आणि समाजविघातक घटकांचे सूत्र आहे. त्यामुळे बंजारा समाजाला हिंदू समाजापासून तोडले, तर हिंदू समाजाचे नुकसान होईल तसेच देशभरात ख्रिस्तीकरणाचे कार्य सुलभ होईल, असे समाजविघातक शक्तीला वाटते. ‘तुम्ही हिंदू नाहीच’ हे एकदा समाजाच्या मनावर बिंबवले की काम सोपे, असे यांना वाटते. त्यादृष्टीने समाजात विद्वेष पसरवणारे, फूट पाडणारेही लोक तयार केले जातात. डाव्या विचारांचे ज्यांना हिंदू समाजाच्या विविधतेतून एकतेचा भंयकर द्वेषही आहे आणि धास्तीही आहे, अशा लोकांनी बंजारा समाजातल्या भोळ्या भाबड्या लोकांना चिथवायला सुरुवात केलीच आहे की, ‘तुम्ही हिंदू नाही, तर तुमचा स्वतंत्र गोर बंजारा धर्म आहे. तुमचा आणि हिंदू समाजाचा काही संबंध नाही.’
‘तुम्ही हिंदू नाही’ हे या लोकांना सांगण्यामागे या मंडळींचा अंतस्थ हेतू अर्थातच हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा आणि त्याद्वारे देशात अराजकता माजवण्याचा आहे, हे काय वेगळे सांगायला हवे?
२०२१ मध्ये होणारी जनगणना कोरोनामुळे होऊ शकली नाही. ती आता २०२३ मध्ये होईल. या जनगणनेत राष्ट्रविरोधी शक्तींचा असा प्रयत्न आहे की, गोर बंजारा समाजाला अन्य धर्मावलंबी म्हणजेच Other Religions Persuasions (ORP) किंवा धर्म सांगितला नाही अर्थात Religion Not Stated (RNS) मध्ये समाविष्ट करण्याचे हे कुटील षडयंत्र आहे. कुठूनही गोर बंजारा लबाना नायकडा समाजाने आपला धर्म “हिंदू” लावून नये यासाठी सगळ्या राष्ट्रविघातक शक्ती एकवटल्या आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर
दि. २५ ते ३० जानेवारीदरम्यान जळगावमधील जामनेर तालुक्यातील मुक्काम पोस्ट गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लबाना नायकडा समाजाचा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. ६ दिवस चालणार्या या कुंभात दररोज २ ते २.५ लाख भाविक येण्याची योजना आहे. अर्थात, आता ज्यांना बंजारा समाजाचे हिंदू म्हणून अस्तित्व आवडत नाही, अशा लोकांनी प्रश्न उपस्थित केला की, बंजारा समाजाची काशी म्हणजे पोहरादेवी गड. इथे कुंभ न भरवता गोद्री येथे का नियोजन केले, तर याला पोहरागडाचे पिठेश्वरांनीच उत्तर दिले की, ”गोद्रीनंतर याहीपेक्षा मोठा विशाल कुंभ पोहरागड येथे आयोजित केला जाईल, समाजाच्या समरसतेचा हा एक प्रयत्न आहे. सकल गोर बंजारा लबाना नायकडा समाजाने कुंभामध्ये एकत्र यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
पोहरादेवीगडाच्या पिठेश्वरांनीच गोद्री येथील कुंभाचे समर्थन केल्यामुळे या कुंभाला विरोध करणार्यांची पंचाईत झाली आहे. या कुंभाला विरोध का असावा? तर या कुंभामध्ये मुरारीबापू, राममंदिर ट्रस्टचे गोविंदगिरी महाजन, साध्वी ऋतंभरा देवी, योगगुरू रामदेवबाबा, महंत रघुमणी, दमदमी टकसालचे प्रमुख बाबा हरनामसिंगजी, गुरू शरणानंदजी, नंदबाबा, श्री रविशंकर, पोहरादेवी संस्थानचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, पाल येथील गोपाल चैतन्य महाराज, तेलंगणचे संत रामसिंग महाराज, सुरेश महाराज, लबाडा समाजाचे मध्य प्रदेशातील महंत चंद्रसिंग महाराज, प्रसन्नसिंग महाराज, संचालन समितीचे श्याम चैतन्य महाराज यांच्यासह १०० संत-महंत उपस्थित राहणार आहेत. ते उपस्थित समाजबांधवांशी धार्मिक, सामाजिक तसेच अध्यात्मिक संवाद साधणार आहेत.
६ दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात पल्ला – मूर्ती स्थापना- कृष्णलीला – अरदास – भोग लावणे व संत सेवालाल अमृतलीला यांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील प्रख्यात संत महापुरुषांचे आशीर्वाद , प्रबोधन व प्रवचन ,तसेच अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लबाना-नायकडा समाजाच्या परंपरा, रितीरीवाज ,पारंपारिक चालिरितींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. भजन, नगारा खेळ, पारंपरिक पेहरावात पुरुष व महिला पट खेळणे, साहसी खेळ व तलवार उचलणे, या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
देशभरातील प्रामुख्याने महाराष्ट्र , मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश , तेलंगणा, गुजरात व पंजाब मधील १० लाखांपेक्षा अधिक हिंदू गोर बंजारा व लबाना – नायकडा समाज यात सहभागी होणार आहे. तसेच देशभरातून शेकडो संत, हजारो नाईक कारभारी देखील उपस्थित रहाणार आहेत.
संत सेवालाल महाराजांच्या चरणी लीन होणारा आणि धर्म अस्तित्वासाठी, समाज संघटनेसाठी सदैव तत्पर असलेला गोर बंजारा समाज धर्मांतराच्या षड्यंत्राला समजून घेईल आणि त्यावर मात करेल यात शंकाच नाही. कारण, मुस्लीम आक्रमक असोत की इंग्रज, या परकीय दमनकारी शक्तींच्या विळख्यात असातनाही हिंदू असलेला गोर बंजारा समाज हिंदू गोर बंजारा समाजाच राहिला, तर आता गोष्टच वेगळी. अंबामातेच्या आशीर्वादाने संत सेवालाल गोर बंजारा अधर्म शक्तीपासून समाजाचे रक्षण नक्कीच करतील.
हा केवळ कुंभ नाही, एक अनुपम संधी आहे… गोर बंजारा लबाना नायकडा समाज “हिंदू” असल्याची ग्वाही जगाला देण्याची आणि त्याचबरोबर सामाजिक समरसतेच दर्शन घडवण्याची..!!
जय सेवालाल
https://www.mahamtb.com//Encyc/2022/12/17/Article-on-Banjara-Tanda-s-conversion.html