विविधतेला आम्ही आपल्या जीवनाचा अलंकार मानतो: सरसंघसंचालक डॉ.मोहनजी भागवत
गोवा (goa)मुक्ती संग्रामात स्वयंसेवकांनी महत्वाचे योगदान केले आणि गोवा भारतात १९ डिसेंबर १९६१ रोजी विलीन झाल्यावर संघाचे काम गोव्यात सुरु झाले , तेही संघ स्थापनेपासून जवळपास ३५ वर्षांनी . ख्रिस्ती बहुल भागातून हे काम गोव्यातील स्वयंसेवकांनी नेटाने सर्वदूर गोव्यात पोहोचवले .आज त्यांच्या परिश्रमाचे फलित गोवा विभाग महासांघिकच्या यशस्वी आयोजनातून सिद्ध झाले आहे. उत्तर गोवा (९२१ स्वयंसेवक) आणि दक्षिण गोवा (११६२ स्वयंसेवक) , अशा दोन हजारांहून जास्त संपूर्ण गणवेषधारी स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. लक्षणीय प्रमाणात मातृशक्ती अभ्यागत नागरिकांसमवेत , सरसंघसंचालकांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित होती.
“आम्हाला असा समाज घडवायचा आहे जो राष्ट्राला सुरक्षित, संघटित आणि वैभवशाली बनवेल. इतिहासात आणि वर्तमानात सुद्धा अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या ह्या ध्येयाप्रती सातत्याने काम करत आहे. जरी आपले खानपान, वेशभूषा, बोली भाषा, पूजापद्धती, पंथ आणि उपपंथ वेगवेगळे असले तरीही आपण याच भारत मातेचे सुपुत्र आहोत आणि विविधतेला आम्ही शाप मनात नाही, त्याला आपण आपल्या जीवनाचा अलंकार मानतो “असे उद्गगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. कांपाल पणजी येथील बांदोडकर फुटबॉल मैदानातील जाहीर ‘महासांघिक’ कार्यक्रमात स्वयंसेवक तसेच नागरिकांना ते संबोधन करत होते.
दिनांक ३ जानेवारी पासून नागेशी फोंडा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(rss) अखिल भारतीय कार्यकारिणी बैठक चालू होती. याच पार्श्वभूमीवर गोवा विभागाने स्वयंसेवकांचे एकत्रीकरण ‘महासांघिक’ आयोजित केले होते. याठिकाणी उपस्थित नागरिक तसेच स्वयंसेवकांना प. पु. सरसंघचालकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी व्यासपीठावर कोंकण प्रांत सह संघचालक श्री.अर्जुन चांदेकर तसेच गोवा विभाग संघचालक श्री. राजेंद्र भोबे उपस्थित होते. आपल्या बौद्धिकातून प.पू.सरसंघचालकांनी अनेक विषयांवर विचार प्रकट केले.
भारत खूप प्राचीन सभ्यता आहे. राष्ट्र म्हणून भारताची संकल्पना पश्चिमी देशांपेक्षा वेगळी आहे. भारताने हजारों वर्षांपासून अनेक सभ्यता, संकृती, राष्ट्रे उदयास येऊन ध्वस्त होताना पाहिलेली आहे, पण राष्ट्र म्हणून भारत आज सुद्धा अस्तित्वात आहे, शाश्वत आहे पण इतर सभ्यता बद्दल आपण असे बोलू शकत नाही. अध्ययन, वाणिज्य, तसेच समाजातील सर्व क्षेत्रात हजारों वर्षांपासून अनेक बुद्धिमान लोक कार्यरत होते, आज सुद्धा आहे. पण तरीसुद्धा आपल्या देशावर आक्रमणे झाले आणि आपण अनेक वर्षे गुलाम होतो. त्यावेळी सुद्धा समाजात बुद्धिमान आणि कर्तृत्ववान लोकांची कमतरता नव्हती, पण समाजात काही समाजकंटक घटक होते त्यामुळे समाजाची प्रतिरोधक शक्ती कमी झाली. समाजाची उन्नती आणि देशाची उन्नती ही सदैव एकमेकांना समांतर असते, म्हणून समाज घडवला की देश घडतो आणि संघ हेच काम करत आहे.
प.पू. डॉ. हेडगेवार यांनी याच साठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघात आम्ही व्यक्ती निर्माणाचे काम करतो. संघाचे काम समाजात एक संघटन उभे करायचे नसून , संपूर्ण समाजाचे संघटन करावयाचे आहे. संघ संस्कारातून परिपक्व होऊन स्वयंसेवक समाजात जिथे गरज पडेल तिथे जाऊन काम करतो आणि याच धर्तीवर देशात जवळजवळ दीड लाख सेवाकार्य चालू आहेत. त्या स्वतंत्र, स्वायत्त आणि स्वावलंबी असून, या संस्थांचा ‘रिमोट कंट्रोल’ संघाच्या हातात असतो असे काही नसते, संघाला कुणालाही रिमोट ने कंट्रोल करायचे नाहीये.
आज संघाचे नाव जगभर लोक जाणताहेत. संघ जे काम करतो त्याला फक्त प्रेक्षक बनून बाहेरून वाह वाह न म्हणता, तसेच संघाबद्दल दुसऱ्यांचे म्हणणे न ऐकता प्रत्यक्ष संघाशी स्वतःला जोडून घेऊन, स्वयंसेवक व्हा आणि संघ समजा. घाबरट, स्वार्थी व्यक्तींनी संघापासून दूर राहावे, यात त्यांचा आणि संघाचाच फायदा आहे असे मा.मोहनजी म्हणाले. संघ काम करणे सोपे नसून यात धर्म, समाज आणि देशाप्रती काम आणि समर्पण करावे लागते. या देशात जन्म घेतल्यावर देव ऋण , पितृ ऋण आणि ऋषी ऋण आपणावर असते. त्यातील पंचमहाभूत तसेच सर्व निसर्ग हे आपल्या देव ऋणाचा भाग आहे. तेव्हा आपला विकास करताना पर्यावरणाचे शोषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, पर्यावरण पूरक विकासावर भर दिला पाहिजे, आपले आचरण पर्यावरण पूरक असावे कारण यावर सर्वांचाच अधिकार आहे , हे त्यांनी विशेषतः नमूद केले.
वसुधैव कुटुंबकम् मंत्राचे आचरण करताना समाज म्हणून आपण सक्षम झाले पाहिजे. सद्भभावनेचे नाटक करायचे नाहीये, स्वतः बलशाली बनून सर्वांप्रती आपलेपणाचा भाव मनात ठेवायचा आहे, जातीपातीचा भेद कधीही जीवनाच्या कुठल्याही स्तरावर येऊ न देता सद्भभावनेने आचरण करावयाचे आहे. त्यासाठी एक तासाच्या शाखेवर नित्यनियमाने जाणे आवश्यक आहे आणि त्यामुळे संघात या, संघाचे कार्यकर्ते व्हा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
१सायंकाळी ५ वाजता असलेल्या सभेला सरसंघचालक ४ वाजून ४८ मिनिटे झाली असताना पोहोचले.
२. सभेपूर्वी उपस्थित स्वयंसेवकांनी व्यायामाची विविध प्रात्यक्षिके केली.
३. सभेच्या प्रारंभी ध्वजारोहण करून भगवा ध्वज फडकवण्यात आला आणि त्यानंतर संघाची प्रार्थना झाली.
४. बैठकीचे सूत्रसंचालन कोकणी भाषेत झाले. त्यामध्ये संघाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संघाच्या स्थापनेला आणखी २ वर्षांनी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत अणि तोपर्यंत देशात एक लाख शाखा चालू करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे , असे प्रस्तावनेत सांगितले गेले.
५. सभेच्या ठिकाणी गोवा राज्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक, इतिहास, गोवा मुक्तीसाठी देशातील राष्ट्रभक्तांनी दिलेले योगदान याची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते.
६. सरसंघचालकांचे हे मागदर्शन कर्णबधिरांना समजण्यासाठी विशेष सोय करण्यात आली होती.
७)महासांघिकनिमित्त कार्यक्रमात गोसेवा गतिविधीतून तयार केलेली गोमय उत्पादनं तसेच गोव्याचा इतिहास यावर एक प्रदर्शनी आणि संघ साहित्य नागरिकांसाठी या ठिकाणी उपलब्ध होते.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन गोवा विभाग सहकार्यवाह श्री. एकनाथ मोरुडकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक,गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर हे संघाच्या गणवेशात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ.सुलक्षणा सावंत याही उपस्थित होत्या.
https://goa.news/join-rss-to-know-it-from-within-mohan-bhagwat-to-goans