जम्मू-काश्मीरमध्ये ५.९ दशलक्ष लिथियम साठ्याचा शोध…
मी भगवंताकडे कायमच एक खंत व्यक्त करत होतो.. भगवंता भारताला काय नाही दिलंस… भारताकडे संपन्न अशी भूमी आहे… आसेतू हिमाचल असलेलं हे भारत राष्ट्र दक्षिण दिशेला समुद्र, उत्तरेला हिमालय पश्चिमेला वाळवंट तर पूर्वेला सुंदरबन प्रदेश… ही सगळी भौगोलिक विशेषत: भगवंताने दिली पण भगवंताने पेट्रोल दिल नाही ही कायमच खंत माझ्या इवल्या मनात सलत होती होती…
आज मात्र “आंधळा मागतो तो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे” अशी माझी अवस्था झाली आहे… लिथियम उज्वल भारताच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे…
देशात प्रथमच अत्यंत महत्वाच्या सोन्यापेक्षा महाग “लिथियम” (Lithium) धातूचे मोठे साठे सापडले असून ते जम्मू-काश्मीरच्या ( jammu kashmir )रीयासी( reasi )नावाच्या भागात सापडले आहेत… लिथियम हा धातू बहुमूल्य असून तो विजेवर चालणाऱ्या कार किंवा दुचाकी वाहनांच्या रिचार्जेबल बॅटऱ्या तयार करण्यासाठी उपयोगात आणला जातो…
भारतात लिथियमचे साठे जवळपास नाहीत अशीच स्थिती होती… त्यामुळे वाहने तसेच इलेक्ट्रॉनिक साधने यांच्या बॅटऱ्यांची आयात भारताला चीनकडून करावी लागत आहे… त्यामुळे भारत यासंदर्भात परावलंबी बनला आहे… याचा मोठा लाभ चीनला होत आहे… मात्र आता भारततही लिथियमचे साठे सापडल्याने भारताचे चीनवरचे अवलंबित्व कमी होईल, यात शंकाच नाही…
नव्याने सापडलेल्या साठ्यांमध्ये लिथियम ५९ लाख टन इतके आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे… लिथियम प्रमाणेच सोन्याचेही साठे या परिसरात सापडले आहेत…
लिथियमची आयात कोणाकडून…
सध्या भारत लिथियमची आयात चीन आणि चिलीकडून प्रामुख्याने करतो… तर लिथियम अयॉन बॅटऱ्या आपल्या आवश्यकतेच्या ८०% या प्रमाणात चीनकडून आयात कराव्या लागतात… लिथीयमच्या संदर्भात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी भारत सध्या अर्जेंटिना, चिली, पेरू ( लिथियम ट्रँगल ), ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हिया यासारख्या लिथियमच्या संदर्भात श्रीमंत असणाऱ्या देशांतील खाणींमधील हिस्सेदारी खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे… मात्र आता भारतात हे साठे सापडल्याने भारत आत्मनिर्भर होण्यास मदतच होणार आहे…
जोपर्यंत भारत आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत भारत विश्व गुरु पदापर्यंत पोहोचू शकत नाही.. त्यात सगळ्यात मोठा अडसर होतं… पेट्रोल.
कोणी केले संशोधन
लिथियमचे संशोधन केंद्र सरकारच्या नियंत्रणात असणाऱ्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने (Geological Survey of India ) या संस्थेने केले आहे… या संस्थेने भारतात सापडू शकतील अशा विविध ५१ खनिजांचा अहवाल विविध राज्य सरकारांना सादर केला आहे… लिथियम आणि सोन्याप्रमाणेच पोटॅशियम, मोलेब्डिनम इत्यादी धातूंची क्षेत्रे आढळली आहेत… अशी ५१ क्षेत्रे असून तेथे बहुमूल्य धातूंचे मोठे साठे सापडू शकतात, असे सर्वेक्षणाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे…
कोणत्या राज्यांमध्ये आहेत विविध खनीजांचे साठे ?
विविध खनीजांचे हे साठे जम्मू-काश्मीर, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांमध्ये आहेत… विविध खनिजे या राज्यांमध्ये कोठेकेठे मिळू शकतात याचे नकाशेही अहवालात देण्यात आले आहेत… यांपैकी लिथियम आणि सोन्याचा शोध हा भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे…
कृषी, फलोद्याने, रोजगार, रस्ते ,पायाभूत सुविधा अशा कितीतरी आघाड्यांवर भारत सरकारने योजनापूर्वक काम काश्मीरमध्ये सुरु केले आहे…
‘कलम ३७०’ हटविल्यानंतर विकासाची गंगा जम्मू -काश्मिरात अवतरली आहे… २०२०-२१ सालापासून जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमच्या शक्यता पडताळण्याची सुरूवात झाली होती… त्याचाच परिणाम म्हणून आता ५.९ दशलक्ष टन लिथियम सापडले आहे… बोलिवियाकडे जगात सर्वाधिक २१ दशलक्ष टन लिथियमचे साठे आहेत… त्या खालोखाल अर्जेंटिनाकडे १७ दशलक्ष टन, ऑस्ट्रेलियाकडे ६.३ दशलक्ष टन, चीनकडे ४.५ दशलक्ष टन साठा आहेत…
लिथियमचे महत्त्व..
याचे उत्तर आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगातच सापडते… मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, सोलार पॅनेल्स ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत लिथियम नावाचा हा धातू बहुतांश उपकरणांमध्ये वापरला जातो… म्हणजेच इंधन आणि ऊर्जास्रोतांप्रमाणेच लिथियमही आजच्या ‘आयटी’ युगात तितकेच महत्त्वाचे आहे… पूर्वी ज्याप्रमाणे आखाती देशांना तेलाने श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचविले, तीच क्षमता आज या लिथियममध्ये आहे… म्हणूनच लिथियमला माहिती-तंत्रज्ञान युगातील आधुनिक इंधन म्हटले जाते… तेव्हा, जम्मू-काश्मीरमधील लिथियमच्या या साठ्याचा शोध सर्वार्थाने भारताच्या ‘डिजिटल’ क्रांतीला गतिमान करणारा ठरणार , हे निश्चित!…
एखाद्या धातूची खाण सापडली, तर त्याचे कौतुक ते काय, असे प्रथमदर्शनी कदाचित वाटणे साहजिकच… पण, आज या लिथियमला त्याच्या उपयुक्ततेमुळे जागतिक बाजारपेठेत सोने आणि तेलाहूनही अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे… जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेला हा लिथियमचा साठा भारतातील अशाप्रकारचा पहिला आणि एकमेव साठा… आज काश्मीरमधील या साठ्याच्या रुपाने उच्चप्रतीचा लिथियम साठा भूगर्भात गवसला आहे…
‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ (जीएसआय)च्या टीमने जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल गावाजवळ ही लिथियमची खाण शोधून काढली… त्यामुळे साहजिकच सलाल आणि आसपासच्या गावकऱ्यांही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत… त्यामुळे याच भागातील माता वैष्णोदेवीचे मंदिर, त्यामुळे निर्माण झालेल्या पर्यटनाच्या संधी, सलाल हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प, चिनाब नदीवरील रेल्वेचा जगातील सर्वात उंचावरील पूल आणि आता या लिथियमच्या खाणीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला तसेच पर्यटनाला चालना मिळेल… तसेच, एरवी खाणकाम अथवा विकास प्रकल्प म्हटले की, प्रकल्पबाधितांना पुनर्वसन, जमिनीचा मोबदला, पर्यावरणाचा र्हास यांसारख्या मुद्द्यांवरुन रान पेटवले जाते… पण, या बाबतीत तसे होऊ नये म्हणून पूर्ण खबरदारी घेत, स्थानिकांना योग्य मोबदला आणि पुनर्वसन याचेही आश्वासन सरकारने दिले आहे… त्यामुळे आगामी काळात येथील लिथियम उत्खननाचे काम सुरू होईलच… शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा साठा सापडल्यामुळे, लिथियमशी संबंधित इलेक्ट्रॉनिक उद्योगांचीही पसंती जम्मूला असेल, जेणेकरून मालवाहतुकीचा खर्चही कमी होईल…
Rare earth materials .. आणि डिजिटल भारत
‘Rare earth materials ’ या धातूवर्गात गणल्या जाणार्या लिथियमची महती वर्णावी तेवढी कमीच… परंतु, आज जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमच्या शोधाने एक वेगळीच ऊर्जा संचारली असली तरी हाच जल्लोष कदाचित २६ वर्षांपूर्वीही साजरा करता आला असता… कारण, ठीक २६ वर्षांपूर्वी, १९९५-९७च्या सुमारास ‘जीएसआय’ने संभाव्य लिथियमच्या साठ्याची शक्यताही तत्कालीन सरकारकडे व्यक्त केली होती… परंतु, त्याकडे फारसे गांभीर्याने न पाहता ‘जीएसआय’चा उत्खननाचा प्रस्ताव थंड बस्त्यात पडला होता तो कायमचाच…
राजकीय दूरदृष्टीचा अभाव आणि काश्मीरमधील घराणेशाही, सरकारी भ्रष्टाचार यामुळे बर्फाखालील लिथियम असेच पडून राहिले… पण, ‘कलम ३७०’(article 370) हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासाचा विडाच भारत सरकारने उचलला आहे.. परिणामी, ‘जीएसआय’चे लिथियमच्या शोधार्थ अभियान मागील २ वर्षांपासून पद्धतशीरपणे राबविले गेले आणि आज त्या अभियानाची फलश्रुती प्राप्त झाली आहे…
असे हे लिथियम सर्वार्थाने जम्मू-काश्मीरसह भारताची ‘डिजिटल’(digital) भाग्यरेषा बदलणारे ठरतील यात तीळमात्र शंका नाही… कारण, आजतागायत आपण लिथियमसाठी १००% इतर देशांवर अवलंबून होतो… खासकरुन दक्षिण अमेरिकेतील देश, जिथे जगभरातील ५० टक्क्यांहून अधिक लिथियमचे साठे आढळतात…
आज काश्मीरमध्ये सापडलेला हा लिथियमचा साठा हा जगातील ७वा मोठा साठा आहे… त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्राचा ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांतर्गतचा विकास वेगवान होणार असून, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची स्वदेशी निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल… इलेक्ट्रिक उपकरणांच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील… विदेशी अवलंबित्व कमी झाल्याने आयातही कमी होऊन परकीय गंगाजळीचीही बचत होईल… शिवाय भारत आपल्या गरजा पूर्ण करुन, लिथियमची भविष्यात निर्यातही करू शकतो…
या लिथियममुळे केवळ जम्मू-काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारत जगाच्या पटलावर विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल.. तो दिवस आता दूर नाही…
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो…