जेव्हा समर्थ रामदास गुरु हरगोविंद सिंहाना भेटतात…!
गढवाल टेकड्यांमधे अलकनंदा नदीच्या (alaknanda river) काठावर वसलेलं अत्यंत निसर्ग रम्य ठिकाण – श्रीनगर! (आताच्या उत्तराखंडातल्या पौडी गढवाल जिल्ह्यात). सोळाव्या शतकाच्या सुरूवातीला राजा अजय पाल यानं अनेक गढ्यांना एकत्र करून एकसंध अशा गढवाल राज्याचा पाया रचला. या राज्याची राजधानी म्हणजे हे श्रीनगर! इथेच इ.स. १६३४ च्या आसपास संतशक्तीच्या भेटीचा एक विलक्षण योग भारतीय इतिहासानं अनुभवला! एकिकडे होता वैराग्य आणी शौर्य यांचा अद्भुत संगम अर्थात् अनेक युद्धांत प्रत्यक्ष नेतृत्त्व करणारे शिखांचे गुरु…तर समोर होते १२ वर्षं कठोर तपश्चर्या करून उत्तर भारतात भ्रमंतीसाठी आलेले दक्खनच्या भूमितले सामर्थ्यशाली संतचैतन्य!
ही वरवर दोन व्यक्तींची वा सन्याशांची साधी भेट वाटून घेण्याचं कारण नाही. शमप्रधानेषु तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेज..!(क्षमाशील अशा तपोनिधीच्या अंतरात गूढ असं दाहात्मक तेजही असतं) या कालिदासाच्या उक्तीनुसार…अंगावर भगवी वस्त्रं आणि वृत्तीमध्ये वैराग्य असूनही अंतरात स्वधर्मनिष्ठेचं प्रखर तेज बाळगणार्या दोन राष्ट्रद्रष्टयांची ती भेट होती! त्यांच्यात घडलेला संवाद कितीतरी गोष्टींची उकल करून जातो!
सतराव्या शतकाची सुरुवात…! शीख पंथाचा वाढता प्रसार मुघलांना खुपत होता. अनेक लोक शीख पंथ अंगीकारत असल्यानं त्यांची शक्ती दिवसेंदिवस वाढत होती. या धर्माचं प्राबल्य कमी करण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून बादशहा जहागीरनं पाचवे गुरु अर्जुनदेव यांना इ. स. १६०६ मध्ये लाहोर इथे कैदेत टाकलं. इस्लाममध्ये धर्मांतरित होण्यासाठी त्यांचा अनन्वित छळ केला गेला. पण त्यांनी हौतात्म्य पत्करलं! त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र हरगोविंद( guru hargobind) अवघ्या अकराव्या वर्षी गुरुच्या गादीवर बसले. पित्याच्या बलिदानानं पेटून उठलेल्या गुरू हरगोविंदांनी शक्ती वृद्धिंगत करण्यावर आपलं लक्ष्य केन्द्रित केलं. बळकट शरीर कमावून स्वत: शस्त्र उचललंच याशिवाय शिखांच्या सांघिक शस्त्रप्रशिक्षणावरही भर दिला. शीख पंथात सशस्त्र सैन्याची परंपरा त्यांनी सुरू केली. गुरु हरगोविंद स्वतःदोन तलवारी धारण करत- एक (मिरी) ऐहिक आणि दुसरी(पिरी) आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक! मुघलांविरुद्ध रोहिला, करतारपूर, अमृतसर अशा अनेक लढायांमध्ये त्यांनी सैन्याचं नेतृत्त्व केलं. बादशहा शहाजहानला मोठा शह दिला. उत्तम शरीर कमवून अन्यायाविरुद्ध सशस्त्र लढा देण्याची त्यांनी निरंतर प्रेरणा दिली!
असे गुरु हरगोविंदसिंहजी नानकमत्ता (उत्तराखंड, जिल्हा-उधमसिंहनगर) इथे असणार्या शीखांच्या पवित्र तीर्थाला भेट दिल्यानंतर एका मोहिमेवरुन परत येत होते.तेव्हा या भागात भ्रमंती करणार्या समर्थ रामदासांशी (samarth ramdas swami) त्यांची भेट झाली! गुरु हरगोविंद सिंहजी घोड्यावर बसलेले होते, त्यांच्या हातात आणि कमरेला अशा दोन तलवारी होत्या. लढणारा मोठा ताफाही बरोबर होता. हे पाहून समर्थ आश्चर्य व्यक्त करत औत्सुक्यापोटी त्यांना म्हणाले, “आम्ही असं ऐकलं आहे की आपण सध्या गुरु नानकांची गादी चालवत आहात. गुरु नानक तपस्वी होते,त्यांनी वैराग्य धारण करून या संसाराचा त्याग केला होता. पण आपण तर शस्त्र धारण केलंय, घोड्यावर बसलात आणि ही लढाऊ फौज सुद्धा बाळगता! असं सगळं असून स्वतःला “सच्चा पादशहा” अर्थात् खरा राजा असंही म्हणवता! आपण कोणत्या प्रकारचे साधू आहात?”
यावर गुरु हरगोविंद सिंहजींनी तत्काळ उत्तर दिलं, “आम्ही अंतरात साधू पण बाह्यरूपानं राजकुमार आहोत. हे शस्त्र धारण केलंय ते सज्जनांच्या रक्षणासाठी आणि जुलुमी सत्तेच्या विनाशासाठी. गुरु नानकांनी या संसाराचा नव्हे तर मोहमायेचा त्याग केला होता.”
त्यांचे प्रत्यक्ष शब्द असे होते, “बतन फकिरी, जहिर अमिरी, शस्तर गरीब की राख्या, जरवान की भाकिया. बाबा नानक संसार नही त्याग्या,माया त्यागी थी!” गुरूंकडून त्वरित मिळालेला प्रतिसाद बघून आणि त्यांचे विचार ऐकून समर्थ अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी मोकळ्या मनानं गुरूंची प्रशंसा केली, “यह हमारे मन भावती है|” अर्थात् आम्हाला हा विचार अतिशय आवडला! भारताच्या इतिहासातली ही किती रोमांचकारी घटना वाटते!
पद्मभूषण डॉ.गंडा सिंह, सतबीर सिंह, हरबंस सिंह असे अनेक प्रसिद्ध शीख इतिहासकार त्यांच्या लेखनात आवर्जून उल्लेख करतात की अत्यंत दुर्मिळ असं पंजाबी हस्तलिखित (पोथी) “पंजाह साखीया” यात या भेटीचं आणि संभाषणाचं वर्णन आहे. त्यातूनच ते पुढे गुरु हरगोविंद सिंहांचं चरित्र तसंच शीख इतिहासाचा अविभाज्य भाग झालं. (समर्थांना मराठा संत समर्थ रामदास असं संबोधलेलं दिसून येतं). याचप्रमाणे श्री हनुमंत स्वामी यांनी लिहिलेली रामदास स्वामींची बखरही या भेटीला आणि संभाषणाला पुष्टी देते असाही तज्ञांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तथापि, हे दोन्ही मूळ संदर्भ आता दुर्मिळ असल्यानं यात नव्या दृष्टीनं अधिक संशोधनाची गरज आहे हे जाणवतं. कारण या व्यतिरिक्त या दोघांमध्ये काही वैचारिक देवाण घेवाण झाली असेल तर ती समजून घेणं म्हणजे मोठीच पर्वणी ठरेल!
सह्याद्रीच्या कानाकोपर्यात राष्ट्रधर्माचा वन्ही चेतवणार्या समर्थ रामदासांनी उत्तर भारतासह अनेक प्रांतांमध्ये भ्रमण केलं. हे भ्रमण म्हणजे केवळ इथल्या नद्या, दरीखोरे वा नुसते भौगोलिक प्रांत पादाक्रांत करणं नव्हे तर इथली लोकशक्ती, इथलं समाजमन त्यांनी जाणून घेतलं…इथल्या जिवंत राष्ट्रपुरुषाचं दर्शन त्यांनी केलं! यामुळे त्यांच्या चिंतनाला,राष्ट्रकार्याला एक अधिष्ठान प्राप्त झालं! या दरम्यान केलेलं प्रगाढ चिंतन त्यांच्या पुढच्या जीवनकार्यात प्रकटलेलं दिसून येतं!
मुघलांची जुलुमी राजवट सर्वशक्तिनिशी उलथवून टाकावी आणि कल्याणकारी स्वराज्याचा सूर्य उगवावा ही समर्थांची तीव्र इच्छा होती. अध्यात्म आणि शस्त्रसामर्थ्य यांच्या जोरावर हे स्वप्नं पूर्ण होईल ही दूरदृष्टी समर्थ आणि हरगोविंद या दोन्ही संतांमध्ये होती! राजकारण आणि धर्मकारणाची सखोल जाण असलेले समर्थ समाजाला शक्तीची उपासना करण्यासाठी प्रेरित करत होते. बलोपासनेद्वारे मनांमनांतलं आत्मबळ वाढवावं आणि स्वधर्म रक्षणाचा तसंच स्वराज्य संस्थापनेचा ध्यास त्यात आरोपित करावा यासाठी समर्थ निरंतर प्रयत्नशील होते!
गुरु हरगोविंदांनी प्रत्यक्ष युद्धं लढली. तर समर्थांनी आयुष्याच्या सर्वस्पर्शी मार्गदर्शनाबरोबरच समजातलं क्षात्रतेज पुनरुज्जीवित केलं. समर्थांनी सांगितलेला क्षात्रधर्म आजही अत्यंत प्रभावी ठरतो! समर्थ सुरुवातीलाच अत्यंत परखडपणे दटावतात –
जयास जीवाचे वाटे भय |तेणे क्षात्रधर्म करू नये ||
काहीतरी करून उपाय ||पोट भरावे ||
या व्यतिरिक्त युद्धाचा विजयमंत्र ठरावा अशा कितीतरी मूलभूत गोष्टी समर्थ सहजपणे सांगतात.
त्यातली काही उदाहरणं म्हणजे –
तुरंग शस्त्र आणि स्वार | पहिलाच पहावा विचार |
निवडुन जातां थोर थोर | शत्रू पळती ||
मारितां मारितां मरावे |तेणें गतीस पावावे |
फिरोन आलिया भोगावे |महद्भाग्य ||
काबू समजेना अंतरे |ते काय झुजेल विचारे |
युद्ध करावे खबर्दारे |लोक राजी राखतां ||
दोनी दळे येकवटे |मिसळता चिखल खाटे|
युद्ध करावे खणखणाटे |सीमा सांडूनि ||
अर्थात् – शास्त्र आणि शस्त्र यांच्या आधारे आधीपासून योग्य नियोजन करून त्यानुसार निर्णय घेतले तर मोठे मोठे शत्रूही पराजित होऊ शकतील. मृत्यू आज किंवा उद्या गाठणारच आहे, तोपर्यंत भ्याडपणे जगण्यापेक्षा स्वधर्मासाठी पराक्रम गाजवत जगावं. यात मृत्यू होऊन पुनर्जन्म लाभला तरी ते सद्भाग्य ठरेल असं समर्थ म्हणतात. प्रत्यक्ष युद्धात कसं लढावं, शत्रूच्या मनोबलाचं खच्चीकरण कसं करावं याचंही सूत्र समर्थ मांडतात. विजयासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं सोडू नये, सर्वस्व पणाला लाऊन शत्रूला सामोरं जावं, त्याला नामोहरम करावं, सावधान होऊन अत्यंत तत्परतेनं नियोजनबद्ध असं युद्धं करावं असा आग्रह धरत अत्यंत त्वेषानं समर्थांची तेजस्वी लेखणी तलवारीसारखी फिरते! “देशद्रोही तितुके कुत्ते | मारुनी घालावे परते” असे घणाघाती शब्द वाचून रक्त सळसळतं!
महाराष्ट्राचं पुनरुत्थान घडवणार्या समर्थांनी शारीरिक आरोग्याबरोबर सदाचार अर्थात् मानसिक आरोग्याचीही मोलाची शिकवण दिली. जगाच्या पाठीवर आपण कुठेही काम करत असू, सदाचाराचं कवच आपल्याला सदैव आत्मबळ देतं! आजही दौर्बल्य झटकून समाजात नवचैतन्य यावं एवढी प्रचंड शक्ती समर्थांच्या विचारांत आहे! या निमित्तानं प्रपंच आणि परमार्थ दोन्हींची उत्कृष्ट सांगड घालत आपल्या समाजाची वीण बळकट व्हावी आणि त्यायोगे राष्ट्रजीवन अधिकाधिक सुदृढ व्हावं हीच सदिच्छा आणि सद्गुरु समर्थ रामदासांना श्रद्धापूर्वक नमन!
जय जय रघुवीर समर्थ!
लेखिका :- मेजर मोहिनी गर्गे -कुलकर्णी