आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची देशभक्ती
जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी ही भीष्मप्रतिज्ञा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे( lahuji salve) यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना घेतली..लहुजींचे वडील राघोजी साळवे पेशव्यांच्या (peshwa) सैन्यामध्ये असताना इंग्रजांविरुद्धच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. त्याप्रसंगी देशभक्त लहुजी साळवे यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका व्हावी या प्रेरणेतून देशासाठी प्राण अर्पण करण्याची तयारी दाखवली.
त्याप्रमाणे इंग्रजांचा(british) युनियन जॅक खाली उतरवण्यासाठी व मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावे यासाठी क्रांतिकारकांच्या पलटणी तयार करण्याचे काम लहुजी वस्ताद साळवे करू लागले. मातृभूमीला पारतंत्र्यातून बंधमुक्त करण्याची महत्त्वकांक्षा बाळगून, त्याप्रमाणे अखंडपणे राष्ट्रकार्य करणाऱ्या लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 मध्ये झाला. पुणे प्रांतातील पुरंदर गडाच्या पायथ्याशी वसलेल्या पेठ गावातील पराक्रमाची परंपरा असणाऱ्या शूरवीरांच्या साळवे घराण्यात लहुजींचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात लहुजींचे पूर्वज गौरवास्पद कामगिरी करून नावारूपाला आले होते. त्यांचा पराक्रम व निष्ठेचा वारसा लहुजींच्या वडिलांनी राघोजी साळवे यांनी आयुष्यभर चालवला. राघोजी साळवे पुण्यात पेशव्यांच्या दरबारी दैदिप्यमान कर्तुत्वामुळे शूरवीरांच्या शृंखलेत विराजमान होते. पेशव्यांच्या शिकारखान्यात ते प्रमुखपद भूषवित होते.
साळवे घराण्यातील पराक्रमीवीरांच्या धाडसाने प्रभावित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी(chhatrapati shivaji maharaj) साळवे घराण्याला राऊत या पदवीने गौरवले.राघोजी साळवे बलदंड देहयष्टी असलेले, उंचपुरे व प्रखर बुद्धिमत्ता असलेले हिंदवी स्वराज्याचे धाडसी व निष्ठावान सरदार होते. एकदा राघोजींनी पेशव्यांच्या दरबारात जिवंत वाघ आपल्या खांद्यावर आणला. त्यांचे धाडस पाहून दरबारातील सरदार व खुद्द पेशवे अचंबित झाले. सगळेजण त्यांचा जयजयकार करू लागले. अशा धाडसी राघोजींचा मुलगा लहुजी वडिलांचा पराक्रम पहात लहानाचा मोठा झाला होता. वडिलांचे धाडस लहुजींकडे अनुवंशिकतेने आलेले.
लहानपणापासून डोंगरदऱ्यात चढणे, उतरणे, नियमित व्यायाम करणे ,शस्त्रास्त्रांचे वडिलांकडून प्रशिक्षण घेणे, त्याचा सराव करणे अशा दिनक्रमात वाढलेले लहुजी धीप्पाड, बलवान व धाडसी झाले. वयाच्या 23 व्या वर्षी वडिलांसोबत ५ नोव्हेंबर १८ १७ रोजी इंग्रजांबरोबर खडकी येथे युद्धात पराक्रम गाजवला. राघोजींनी मावळ्यांसोबत इंग्रज सैन्याशी कडवी झुंज दिली. खडकी पासून आजच्या वाकडेवाडी पर्यंत इंग्रज सैन्याशी बापलेक व मावळे शर्थीने लढले. याच युद्धात लहुजींचे वडील राघोजी धारातीर्थी पडले. तेव्हाच श्रद्धांजली वाहताना, लहुजींनी इंग्रजांचे पारिपत्य करण्यासाठी भीष्मप्रतिज्ञा केली.
https://www.facebook.com/VSKKokan/videos/695772795569239/
त्याप्रमाणे सक्रियतेने इसवी सन १८२२ मध्ये गंजपेठ पुणे येथे कुस्तीचा आखाडा व शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणची कार्यशाळा सुरू केली .आखाड्यात तरुणांना कुस्तीच्या डावात तरबेज करताना तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यांचेही प्रशिक्षण वस्ताद लहुजी देऊ लागले. आखाड्याजवळच एक विहीर खोदली व तत्कालीन अस्पृश्य बांधवांना विहीर खुली करून दिली. सामाजिक जाणीवेतून कृती करणारे वस्ताद लहुजी महात्मा फुलेंचे गुरु व मार्गदर्शक होते.
लहुजींच्या आखाड्यात व्यायामाचे धडे घेण्यासाठी व शरीर बळकट करण्यासाठी ज्योतिबा फुले, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, विठ्ठल वाळवेकर, नाना मोरोजी, नाना छत्रे ,उमाजी नाईक सखाराम परांजपे, सदाशिव बल्लाळ, गोवंडे गुरुजी आदींनी प्रशिक्षण घेतले. लहुजींच्या या शिष्यांनी भविष्यात आपापल्या आवडीनुसार, ध्येयानुसार सामाजिक ,राजकीय व क्रांतिकारी क्षेत्रात कार्य करून नावलौकिक मिळवला. लहुजींनी सर्व शिष्यांना कुस्ती , दांडपट्टा ,लाठीकाठी, नेमबाजीचे प्रशिक्षण दिले. शरीर बळकट करण्यास सहाय्य करताना सामाजिक व राष्ट्रीय कार्याबाबत चर्चा व मार्गदर्शन केले.
आयुष्यभर अविवाहित राहिले . भीष्मप्रतिज्ञाचे जीवनाच्या अंतापर्यंत पालन केले. इंग्रजांविरोधी क्रांतिकारकांची पलटण उभी केली. स्वतः भूमिगत राहून राष्ट्रकार्यासाठी अखंडपणे इंग्रजांशी झुंजत राहिले. वस्ताद लहुजी व त्यांचे शिष्य पुढच्या काळात भूमिगत होऊन क्रांतिकारी कार्य करीत होते. ज्यावेळी वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली व पुण्यात कैद करून ठेवले, त्यांच्याविरुद्ध खटला उभा केला. तेव्हा आपल्या शिष्याला सोडवण्यासाठी लहुजींनी शर्थीने प्रयत्न केले.
वासुदेव फडकेंना संगम पुलानजीक असलेल्या सरकारी इमारतीच्या एका कोठडीत कडक बंदोबस्तात कैद करून ठेवले होते. त्यावेळी लहुजींनी त्यांना भेटण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु इंग्रजांना याचा सुगावा लागल्यावर लहुजींच्या मागे धरपकडीचे सत्र सुरू केले, तेव्हा लहुजींनी भूमिगत राहून क्रांतिकारक शिष्यांना मार्गदर्शन केले. फडकेंच्या खटल्यातील सुनावणीस वेशांतर करून ते हजर राहिले व फडकेंना इंग्रजांच्या तावडीतून कसे सोडवता येईल याचा तासंतास विचार करत मुळा-मुठेच्या संगमाच्या ठिकाणी एका झाडाखाली बसून राहत. वयोवृद्ध झालेले लहुजी क्रांतिकारक शिष्यांचे दीपस्तंभ होते. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाने क्रांतिकार्य जोमाने सुरू राहिले. आजच्या तरुण पिढीलाही संघटन कसे करावे, देश कार्याची निष्ठा कशी जोपासावी ,समाजकार्य व राष्ट्रकार्यात स्वतःला वाहून कसे घ्यावे, या सर्वांचा बोध लहुजींच्या जीवनकार्यातून मिळतो आणि तो आजच्या पिढीलाही प्रेरणादायक ठरतो.
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 14 फेब्रुवारी 1881 रोजी पुण्याच्या संगमवाडी परिसरातील नदीकिनारी ,पुरातन महादेव मंदिराजवळ प्राणज्योत मालवली.एका महान युगपुरुषाचे पर्व संपले, परंतु आजही राष्ट्रकार्याने वस्ताद लहुजी साळवे अजरामर आहेत.
आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची समाधी संगमवाडी, पुणे येथे आहे. हे एक राष्ट्रभक्तीचे ज्वलंत प्रतिक असून युगेनयुगे राष्ट्रभक्तीची प्रेरणा या समाधीस्थळावरून भारतीयांना निरंतर मिळत राहणार.
वस्ताद लहुजींच्या आज तिथीनुसार (माघ कृ. द्वादशी) स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम…
“उत्तुंग असे लहुजींचे राष्ट्रकार्य,
संकटकाळी तयांचे अतुलनीय धैर्य,
हृदयी अंगार, राष्ट्रकार्य-क्रांती कार्याचा,
युगेनयुगे होईल गौरव क्रांतीपर्वाचा||”
|| जय लहुजी जय भारत ||
लेखिका:- डॉ. उज्ज्वला हातागळे