सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त “वीर सावरकर – ज्ञान योद्धा” व्याख्यानाचे अभिनव केसरी मित्र मंडळाद्वारे आयोजन

मुंबईतील अभिनव केसरी मित्र मंडळाच्यावतीने दि. २६ फेब्रुवारी २०२३ डोंगरी येथील बाल सुधारगृहाच्या प्रांगणात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त “वीर सावरकर – ज्ञान योद्धा” (veer savarkar) या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संतोष गांगण यांनी प्रास्ताविक केले आणि त्यानंतर शिवांश या लहान मुलाने ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अजरामर गीत सादर केले.
प्रमुख पाहुणे डॉ. मेजर सुरेंद्र पुनिया (निवृत्त) यांनी मराठी भाषेबद्दल बोलताना सांगितले की , भाषा कोणतीही असो सावरकरांचे विचार महत्वाचे आहेत. तसेच इतिहासकार आणि प्रमुख वक्ते मल्हार कृष्ण गोखले यांनी सावरकरांच्या आजपर्यंत न उलगडलेल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमास २५० सावरकर प्रेमींनी नोंदणी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी नोंदणीकृत जवळपास सर्वच २५० लोकांनी या व्याख्यानास हजेरी लावली. अभिनव केसरी मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन दरेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या उपक्रमाचे विविध स्तरातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.