रिसायकल प्लास्टिकच ठरवणार मानवतेचे भविष्य…
“प्लास्टिक“(plastic) ही जगमान्य भयावह समस्या आपणास ठाऊक आहेच. या समस्येचे उत्तर एकच ते म्हणजे पुनर्वापर म्हणजेच मराठीत “रिसायकलिंग”. आपण कायमच म्हणतो की या रिसायकल प्लास्टिकच( recycle plastic) करायचं काय ? याच प्रश्नाचं उत्तर सापडलेल्या “कपिल भाटिया” या पर्यावरणप्रेमी उद्योजकांना भेटणे ही एक आनंदाची पर्वणी असते.
कपिल भाटियाजी हे “Unirec” Sustainable Clothing Brand चे मालक आहेत. त्यांचे पर्यावरण स्नेही(environment) आणि रिसायकल प्लास्टिक बाटल्यापासून बनवलेले शर्ट ,टी-शर्ट,पॅन्ट .. बघून अक्षरशः आश्यर्यचकित व्हायला होते. आपण मोदीजींना(Narendra modi) रिसायकल प्लास्टिक बाटल्यापासून बनवलेले जॅकेट परिधान करताना बघितले आहे परंतु स्वतःहून रिसायकल प्लास्टिक बाटल्यांपासून बनवलेले शर्ट, पँट व इतर कपडे बघणे, पर्यावरणाबद्दल सजग असलेल्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते.
एका गर्भश्रीमंत व्यापारी परिवारात जन्मलेले कपिलजी, कोणत्याही आर्थिक नफ्या तोट्याचा विचार न करता निव्वळ सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या टाकाऊ प्लास्टिक पासून रिसायकल प्लास्टिकचे, खऱ्या पॉलिस्टर कपड्यांसारखे स्वस्त, सुंदर व टिकाऊ कपडे बनवतात.
चला तर मग जाणून घेऊया रिसायकल प्लास्टिक बाटल्यापासून बनवलेल्या कपड्यांबद्दल :-
प्लास्टिक रिसायकल करणे आवश्यक, पण का ?
पृथ्वीवरील(earth) प्रदूषण विविध कारणांमुळे झपाट्याने वाढत आहे, त्यापैकी सर्वात लक्षणीय म्हणजे प्लास्टिकचा अतिवापर. प्लास्टिक अत्यंत फायदेशीर आहे. विशेषतः त्याचा वॉटरप्रूफ (Waterproof) हा गुणधर्म त्याच्या लोकप्रियतेला व उपयोगितेला कारणीभूत आहे. आजच्या बहुतांश वस्तू प्लास्टिकच्या आहेत. आजच्या युगाला प्लास्टिक युग म्हटल्यास अतिशयोक्ती नाही. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर गगनाला भिडला आहे. प्लास्टिकचा वापर आता जवळजवळ प्रत्येक उद्योगात केला जातो.
लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते ऑटोमोबाईल आणि विमानापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिकचा वापर वाढल्याने प्लास्टिक कचरा ही समस्या अधिकच वाढली आहे. प्लॅस्टिक कचरा ही आजच्या जगात उपयुक्त असण्याबरोबरच सर्वात गंभीर समस्या बनली आहे.
प्लास्टिकचा शोध हा खरंतर मानवी इतिहासातील क्रांतिकारक शोध म्हणावयास हवा. कोणत्याही आकारात मोल्ड (mould) होऊ शकणाऱ्या, काचेसारख्या न फुटणाऱ्या, वजनाला हलक्या, वॉटरप्रूफ व आर्थिक दृष्ट्या किफायतशीर प्लॅस्टिकच्या शोधाने मानवाचे जगणे सुसह्य आणि सोपे केले यात तर शंकाच नाही. प्रत्येक गृहोपयोगी वस्तू प्लॅस्टिकमध्ये ‘गुंडाळल्या’ गेल्या. “बिस्लेरी“( bisleri) अर्थात बाटलीबंद पाणी हे प्लास्टिकच्या लोकप्रियतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. पण जसा भस्मासुराला वर देऊन भगवान शंकराने स्वतःवर आफत ओढवून घेतली होती त्याच प्रकारे प्लास्टिकचा शोध लावून, त्याच्या अतिरेकाने आता ते मानवासाठी आणि एकूणच आपल्या पृथ्वीची एक समस्या बनून राहिले आहे कारण प्लास्टिकचे विघटन होण्यास तब्बल १००० वर्षे लागतात. यावर उपाय म्हणून रिसायकल होणारे प्लास्टिक तयार करण्याच्या दिशेने शास्त्रज्ञांनी आपले संशोधन विकसित केले आणि प्लास्टिकचे रिसायकलिंग होण्यास सुरुवात झाली.
रिसायकल प्लास्टिक पासून बनणार शर्ट,पॅन्ट आणि जॅकेट…
एक काळ असा होता की वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक होत्या. आज, कपडे तयार करण्यासाठी याचा सकारात्मक पद्धतीने वापर केला जात आहे. खरं तर, वापरलेल्या पाण्याच्या बाटल्यांपासून बनवलेले हे कपडे स्वीकारणारे लक्षणीय संख्येने दिसत आहेत. प्लास्टिक प्रदूषणाच्या सध्याच्या परिस्थितीत, रिसायकल प्लास्टिक पासून बनवलेले कपडे निवडणे हे पर्यावरणाप्रती जबाबदार आणि संवेदनशील असण्याचे लक्षण आहे.
साक्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, रिसायकल प्लास्टिक पासून बनवलेले फिकट निळ्या रंगाचे जॅकेट घालून पर्यावरणासंबंधीची आपली संवेदनशीलता सगळ्या देशासमोर ठेवली आहे.
ग्रीनक्लॉथिंग म्हणजे बांबू किंवा रिसायकल केलेल्या प्लास्टिकसारख्या टिकाऊ सामग्रीपासून मिळवलेल्या कापडाचा प्रकार आहे. तसेच, हे कापड तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या पद्धती टिकाऊ आहेत. कच्चा माल, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी केल्यास कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल. फॅशनमध्ये कोणतीही तडजोड न करता अशा कपड्यांची खरेदी आपण करू शकतो.
रिसायकल केलेल्या प्लास्टिक पासून बनवलेले कपडे आणि सामान्यतः बनवलेले कपडे यांच्यात गुणवत्ता किंवा आकर्षकता यांच्या संदर्भात कोणताही फरक नाही. प्लास्टिकच्या पुनर्वापरामुळे हवा, पाणी आणि जमीन प्रदूषण कमी होते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. अशाप्रकारे, रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेल्या उत्पादनांची खरेदी केल्याने अप्रत्यक्षपणे एक शाश्वत जीवन आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण निर्माण करण्यात मदत होते.
एका अहवालानुसार, भारतामध्ये वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांपैकी ८६ % रिसायकल होतात.भारतामध्ये मध्ये दररोज सुमारे १ कोटी पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात, याचा अर्थ दररोज १४ लाख प्लास्टिक बाटल्या अश्याच नदीत, तलावात, नाल्यांमध्ये सरतेशेवटी समुद्रात पडून राहतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.याशिवाय, प्रत्येक प्लास्टिकची बाटली नष्ट होण्यासाठी ८०० ते १,००० वर्षे लागू शकतात.
सुदैवाने, जागतिक स्तरावर अनेक कंपन्या कचरा प्लास्टिकच्या बाटल्यांचा (plastic bottle) पुनर्वापर करण्यासाठी आणि शाश्वत रोजगार आणि पर्यावरण निर्माण करण्यासाठी पुढे येत आहेत. केवळ उद्योजकच नाही तर फॅशन डिझायनर्सही पर्यावरणाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेले टी-शर्ट फिफा (fifa) वर्ल्ड कप मध्ये घातलेले नऊ विश्वचषक संघ पाहणे उल्लेखनीय होते. शिवाय, यू.एस. आणि ब्राझिलियन संघाचे कपडे केवळ रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवले गेले होते.
प्लास्टिकच्या बाटल्यांचे फॅब्रिक्समध्ये कसे रूपांतर होते ते आपण जाणून घेऊया ;-
प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने, प्लास्टिकच्या बाटल्यांचे फॅब्रिक्समध्ये रूपांतर करता येऊ शकते.
सर्व प्रथम प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या जातात, त्या कंपनीत आणून त्यावर प्रक्रिया करून त्या पासून छोटे-छोटे ग्रॅनुअल्स तयार केले जातात. या ग्रॅनुअल्स पासून पुढे व्हिस्कोस यार्न बनते. या धाग्यांचा वापर कापड विणण्यासाठी केला जातो आणि शेवटी कपड्यांचा तागा तयार होतो . ही प्रक्रिया पारंपारिकपणे तयार केलेल्या पॉलिस्टरपासून बनवलेल्या ३० % कमी ऊर्जा वापरते.
या रिसायकल केलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून आपण टी-शर्ट(t shirt), जॅकेट, शर्ट , टोपी, ब्लँकेट,जॅकेट व्यायामासाठी कपडे बनवण्यासाठी केला जातो जे सहसा पॉलिस्टरच्या मिश्रणातून बनवले जातात. रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांसह उबदार, खिशाला परवडणारे (मराठीत “परवडेबल“), आरामदायक, हवामान लवचिक आणि दीर्घकाळ टिकणारे कपडे बनवणारे आज अनेक ब्रँड आहेत. शिवाय, रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून कपडे बनवल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यास मदतच होणार आहे.
तसेच, प्लास्टिक जाळताना हवेत सोडल्या जाणार्या विषारी द्रव्यांचे प्रमाण कमी होण्यासही मदतच होणार आहे. याशिवाय इतरत्र टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या बाटल्याही कमी होण्यास मदत होणार आहे. पुढे, लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा तसेच पर्यावरणातील कचरा काढून टाकण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
फॅशन जगताने देखील प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पुनर्वापर केलेल्या कपड्यांची संकल्पना स्वीकारली आहे. म्हणूनच, जगात कुठेही दुकानांमध्ये रिसायकल केलेले प्लास्टिकचे कपडे मिळणे सामान्य बाब झाली आहे. आज, पीसीआर (पोस्ट कंझ्युमर रेझिन) वापरून आणि पुरुष, महिला आणि मुलांसाठी कपड्यांचे उत्पादन करणारे उत्पादक तयार झाले आहेत. शिवाय, प्लॅस्टिकच्या धाग्याला इतर धाग्यांसोबत मिसळून प्रत्येक विभागातील लोकांसाठी विविध प्रकारचे कपडे तयार करता येतात.
रिसायकलिंग तंत्रज्ञानाच्या विकासामुळे, प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे रूपांतर आता हलके, मऊ आणि आकर्षक कापडात केले जाऊ शकते जे स्टाइलिश पोशाखासाठी सर्वोत्तम आहेत.
रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्स, खेळाडू अगदी संगीतकारही या ‘ग्रीन अर्थ’ मोहिमेत सामील होत आहेत.
स्वच्छ,आत्मनिर्भर भारतासाठी( aatmnirbhar bharat) प्लास्टिकचे १०० % रिसायकलिंग होणे अत्यंत आवश्यक आहे.
प्लास्टिक चे भयावह दुष्परिणाम ओळखून भारत सरकारने १ जुलै २०२२ ला संबंध भारतात प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे.
सरते शेवटी प्लास्टिक हा प्रश्न सरकारी नव्हे तर सामाजिक आहे.आज प्लास्टिक ला मोठ्या प्रमाणावर पर्याय समोर आले आहेत. एक सजग नागरिक म्हणून आपण प्लास्टिकचा वापर कमीच करायला हवा.आणि त्याहून महत्वाचे म्हणजे १००% प्लास्टिक कसे रिसायकल होईल या कडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कपिलजींसारख्या उद्योजकाच्या दूरदृष्टीचे व आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी त्यांनी रिसायकल प्लास्टिक साठी घेतलेल्या पुढाकाराचे आपण कौतुकच करायला हवे. अशा अनेक कपिलजींची आज संपूर्ण विश्वाला गरज आहे. या लेखाद्वारे समाजात लपलेल्या कपिलजींना प्रेरणा मिळो हीच प्रभु चरणी प्रार्थना.
प्लास्टिक चा वापर कमी करणे म्हणजे धरणी मातेवर उपकारच..
“Plastic pollution free world is not a choice but a commitment to life – a commitment to the next generation.” – Amit Ray,